संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ गजानन — एका नावात सामावलेले आकाश… ☆ संगीता कुलकर्णी ☆

काही नावे उच्चारण्यासाठी ओठांची गरज नसते ती मनाच्या खोल तळाशी उतरतात आणि तिथे एखाद्या शांत सरोवरावर उमटलेल्या वर्तुळांसारखी बराच वेळ हलत राहतात. ‘गजानन’ हे असंच एक नाव… चार अक्षरांचा हा उच्चार पण त्याच्या अंतरंगात कित्येक जन्मांची श्रद्धा, असंख्य प्रार्थनांची ओल, न बोललेल्या अश्रूंची भाषा आणि अनंत आकाशाची निळाई सामावलेली.

‘गजानन’ म्हटलं की प्रथम डोळ्यांसमोर येतं ते त्याचं प्रसन्न मुख. हत्तीचं मस्तक, विशाल कपाळ, करुणेने ओथंबलेले नेत्र, मोठे कान आणि वक्र सोंड.. या रूपाकडे केवळ देवतेचं रूप म्हणून पाहिलं तर कदाचित आपण त्याच्या प्रतीकांच्या is गाभ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही कारण गजाननाचं खरं रूप कदाचित दगडात, मातीत किंवा धातूत नसून आपल्या अंतर्मनात लपलेलं आहे…

देवळातला गजानन आपण रोज पाहतो पण मनातला गजानन आपण कितीदा शोधतो ?

हा प्रश्नच कदाचित अध्यात्माची पहिली पायरी आहे..

जीवनाच्या गर्दीत आपण सतत बाहेर काहीतरी शोधत असतो यश, मान, समाधान, प्रेम, प्रतिष्ठा, सुरक्षितता हातात आलेल्या गोष्टी मोजत राहतो आणि हातातून निसटलेल्या गोष्टींची गणितं करत राहतो. दिवस सरतात, ऋतू बदलतात, चेहरे बदलतात पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र एक पोकळी तशीच राहते.. त्या पोकळीच्या दारावर गजानन शांतपणे उभा असतो.. तो काही मागत नाही. तो फक्त विचारतो

‘तू स्वतःपासून किती दूर गेलास?’

आणि हा प्रश्न ऐकण्यासाठी बाहेरची सारी गर्दी शांत करावी लागते..

गजाननाच्या मोठ्या कानांकडे पाहताना मला नेहमी वाटतं देव आपल्याला ऐकण्यासाठी इतका सज्ज आहे पण आपण स्वतःला ऐकण्यासाठी कधी थांबतो का? जगाच्या आवाजांना उत्तर देताना आपण आपल्या अंतरात्म्याची हाक कित्येकदा दडपून टाकतो.. दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये जगताना स्वतःच्या इच्छेचा आवाज हरवतो.. चेहऱ्यावर हसू ठेवताना मनातील थकवा लपवतो..

गजाननाचे कान जणू सांगतात

“जग तुला ऐकून घेईलच असं नाही पण तू स्वतःला ऐक.’” कारण स्वतःला ऐकण्याची सुरुवात झाली की अंतर्मनातली प्रार्थना जन्म घेते.. त्याचं विशाल मस्तक म्हणजे केवळ बुद्धीचं प्रतीक नाही ते विचारांच्या विशालतेचं आकाश आहे.. आपण किती लहानसहान गोष्टींमध्ये अडकून पडतो..! कोणीतरी काय म्हणालं, कोणीतरी काय केलं, कोण पुढे गेला, कोण मागे राहिला या क्षणभंगुर गोष्टींमध्ये मन गुंततं. आणि मग गजानन जणू आपल्या कपाळावर हात ठेवून सांगतो

“दृष्टी मोठी कर.

ज्या गोष्टी आज पर्वत वाटतात,

त्या काळाच्या आकाशात कदाचित धुळीच्या कणांइतक्याही नसतील.’”

अध्यात्म म्हणजे जग सोडून जाणं नव्हे तर जगाच्या मध्यभागी उभं राहून त्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होणं…

गजाननाच्या सोंडेंत मला जीवनाचं अद्भुत तत्त्व दिसतं. ती सामर्थ्यवान आहे पण कोमलही आहे. ती जड वस्तू उचलू शकते आणि नाजूक फुलालाही स्पर्श करू शकते. मनुष्यानेही असंच असावं.. परिस्थितीसमोर कठोर पण माणसांशी वागताना कोमल…

आयुष्य आपल्याला अनेकदा कठीण बनवतं.. फसवणूक, अपयश, विरह, अपेक्षाभंग, एकटेपण हे सगळं मनाभोवती अदृश्य कवच चढवत जातं. आपण स्वतःला वाचवताना स्वतःतील कोमल माणूसच हरवून बसतो.. तेव्हा गजाननाची सोंड जणू सांगते

“सामर्थ्यवान हो, पण संवेदनाहीन होऊ नकोस”.’

त्याच्या एका हातातील पाश मला आपल्या आसक्तींची आठवण करून देतो माणूस वस्तूंना, व्यक्तींना, आठवणींना, अपेक्षांना, स्वतःच्या प्रतिमेलाही घट्ट धरून ठेवतो आणि मग ज्याला धरून ठेवणं प्रेम वाटतं, तेच कधी कधी दुःखाचं कारण बनतं.. दुसऱ्या हातातील अंकुश मात्र अंतर्मनाला दिशा देतो…

मनाला हवं ते मिळणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे मनाला हवं तेव्हा थांबवता येणं हे खरं स्वातंत्र्य…

गजाननाचा अंकुश जणू आपल्या चंचल मनावर ठेवलेला एक मूक प्रश्न आहे

‘तू तुझ्या इच्छांचा स्वामी आहेस की त्यांचा दास?’

त्याच्या पायाशी बसलेला मूषक पाहताना ही जाणीव अधिक गहिरी होते. मूषक म्हणजे चंचल मन, सतत इकडून तिकडे धावणाऱ्या इच्छा, क्षणाक्षणाला बदलणाऱ्या आकांक्षा.. गजानन त्याच्यावर आरूढ आहे म्हणजेच विवेकाने वासना आणि चंचलतेवर स्वार व्हावं त्यांच्यापुढे शरण जाऊ नये…

कदाचित म्हणूनच गजानन हा विघ्नहर्ता आहे पण विघ्नहर्ता म्हणजे आपल्या वाटेतील प्रत्येक अडथळा दूर करणारा देव, एवढाच त्याचा अर्थ नाही. कधी कधी तो अडथळा दूर करत नाही उलट आपल्याला त्या अडथळ्यापेक्षा मोठं करून जातो कारण नदीला समुद्राकडे जाण्यासाठी दगड नसलेली वाट मिळाली तर तिच्या प्रवासाला अर्थ किती ? दगडांवरून उड्या मारत, वळणं घेत, स्वतःचा मार्ग शोधत ती जेव्हा समुद्राला भेटते, तेव्हा तिच्या प्रवासाची कथा पूर्ण होते… तसंच जीवनाचंही आहे.
गजानन आपल्या संकटांना नेहमी दूर करेलच असं नाही पण त्या संकटांतून अर्थ शोधण्याची दृष्टी देतो आणि मग प्रार्थनेचा अर्थही बदलतो.. आपण म्हणतो ‘देवा, माझं दुःख दूर कर.’”

नंतर कधीतरी मन परिपक्व होतं आणि म्हणतं

‘”देवा, दुःख समजून घेण्याइतकी बुद्धी दे.’” मग आपण म्हणतो “माझ्या इच्छा पूर्ण कर.’

नंतर मन म्हणतं

‘माझ्यासाठी योग्य काय आहे, हे ओळखण्याची दृष्टी दे.’” हीच कदाचित भक्तीची परिपक्व अवस्था…

गणेशोत्सवात आपण गजाननाला घरात आणतो. फुलांनी सजवतो, आरती करतो, मोदक अर्पण करतो. काही दिवस घरात चैतन्य भरून राहतं पण विसर्जनाच्या क्षणी मन अचानक ओलावतं… मूर्ती पाण्यात विलीन होते

आणि त्या क्षणी एक गूढ सत्य जाणवतं ज्याला आपण आणलं होतं तो कुठे गेला ?

माती मातीमध्ये मिसळते.. रूप विरतं… रंग वाहून जातात.. सजावट नाहीशी होते पण श्रद्धा ? ती कुठे विसर्जित होते ?

कुठेच नाही कारण देवाचं विसर्जन पाण्यात होत नाही देवाचं रूप आपल्या अंतर्मनात विरघळतं म्हणूनच गजाननाचं आगमन आणि विसर्जन ही केवळ परंपरा नाही ती जीवनाचीच उपमा आहे . आपणही मातीपासून येतो आणि मातीमध्ये विलीन होतो.. मध्ये जे काही घडतं ते यश, अपयश, प्रेम, विरह, संपत्ती, कीर्ती ते सगळं क्षणभंगुर..
शेवटी उरतं ते काय ?

काही चांगले स्पर्श.

काही दिलेली माणुसकी..

काही न बोललेले प्रेम..

काही क्षमा.

काही प्रार्थना..

आणि अंतर्मनात साठलेला शांत प्रकाश..

गजानन म्हणजे कदाचित हाच प्रकाश..

देव्हाऱ्यातील ज्योतीकडे पाहताना आपण अनेकदा बाहेरचा अंधार विसरतो पण खरी ज्योत तेव्हा पेटते, जेव्हा मनातील अहंकार, मत्सर, भीती आणि असुरक्षिततेच्या सावल्या हळूहळू विरघळू लागतात.

गजाननाला नमस्कार म्हणजे केवळ हात जोडणे नाही… तो आपल्या अहंकाराला थोडं खाली ठेवणं आहे..

तो आपल्या चुकांकडे करुणेने पाहणं आहे..

तो दुसऱ्याला क्षमा करणं आहे..

तो स्वतःलाही क्षमा करणं आहे..

तो गर्दीत असूनही स्वतःच्या अंतरंगाशी संवाद साधणं आहे.

आणि कदाचित म्हणूनच ‘गजानन’ हे नाव उच्चारताना मनात एक अनामिक शांतता उतरते..

ग — गतीला दिशा देणारा,

जा — जागृतीचा दीप पेटवणारा,

न — नादातून निःशब्दतेकडे नेणारा,

न — नश्वरतेतून शाश्वताची जाणीव करून देणारा.

ही अक्षरांची फोड कदाचित व्याकरणात नसेल पण भक्तीच्या भाषेत प्रत्येक अक्षराला एक विश्व असतं..

गजानन म्हणजे आकाश… पण बाहेर पसरलेलं आकाश नव्हे

आपल्या आत उघडणारं आकाश..

जिथे विचारांना सीमा नाही,

करुणेला तळ नाही,

शांततेला शब्द नाहीत आणि आत्म्याला कोणताही आकार नाही..

कधी कधी जीवनाच्या कोलाहलात आपण थांबावं.. डोळे मिटावेत.. श्वास आत घ्यावा आणि मनाच्या अगदी तळाशी उतरावं..

तिथे कदाचित कुठलीही मूर्ती नसेल.. नसेल घंटानाद… नसेल फुलांचा साज…

नसेल धूपाचा सुगंध.

फक्त एक शांत शून्य असेल..आणि त्या शून्यातून हळूच एक नाव उमटेल

“गजानन”…’

त्या एका नावासोबत मनातील अनेक गाठी सैल होतील.. प्रश्न संपणार नाहीत पण प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल.. दुःख नाहीसं होणार नाही; पण दुःखाला सामोरं जाण्याची करुणा मिळेल.. जग बदलणार नाही पण जगाकडे पाहणारा आपला अंतर्मनाचा आरसा स्वच्छ होईल.. तेव्हाच कदाचित उमगेल

गजानन बाहेर शोधायचा देव नाही

तो आत जागवायची जाणीव आहे…

तो संकटं टाळण्याची प्रार्थना नाही.. तो संकटांतून स्वतःला ओळखण्याचा प्रकाश आहे…

तो इच्छा पूर्ण करणारा चमत्कार नाही.. तो इच्छांच्या पलीकडे नेणारा विवेक आहे…

तो एका मूर्तीत सामावलेला देव नाही.. तो एका नावात सामावलेले अनंत आकाश आहे आणि त्या आकाशाकडे पाहताना शेवटी मनात एकच भावना उरते

‘”देवा, माझ्या आयुष्याला काही देण्यापूर्वी

माझं मन इतकं विशाल कर,

की जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहता येईल

जे निघून गेलं त्याला शांतपणे निरोप देता येईल आणि जे अजून आलेलं नाही

त्याची वाट पाहतानाही

मनातला दिवा तेवत ठेवता येईल”.’

कदाचित हाच गजानन…

कदाचित हाच अध्यात्म…

आणि कदाचित

एका छोट्याशा नावात सामावलेलं हेच ते अनंत आकाश…

 

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted