डॉ. नेहा भटकर
विविधा
☆ गोमटे वैराग्य… ☆ डॉ. नेहा भटकर ☆
पिलमपोयामधून (बासरीमधून) गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा मधुर हलकासा सूर बऱ्याच लांबून कुठून तरी कधी आड जंगलाच्या गवताळ वाटेने तर कधी दगड गिट्टीच्या खडबडीत रस्त्यावरून घरातील लोकांच्या कानी पडे आणि तो मधुर मंद सूर हळूहळू अधिकाधिक स्पष्ट होऊन जवळ येत असे तेव्हा समजायचं की गोमट्या आला. गोमट्या दारात दाखल होईपर्यंत रस्त्यात खेळणारी गावातील कितीतरी छोटी मुलं कुतूहलाने त्या जादुई सुरांसोबत त्याच्या मागोमाग घरापर्यंत येऊन ठेपत. मुलांचा घोळका घरासमोरून पांगण्याआधी तो राधे कृष्ण राधे कृष्ण हे सूर बासरीतून वाजवीत त्यांच्यासोबत फेर धरायचा व नंतरच घरात मध्ये यायचा.तो इकडे त्याच्या लांबच्या आत्याकडे पाहुणा म्हणून आलेला असायचा. तिला तो फुई म्हणत असे (अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये जुन्या काळी तिथल्या स्थानिक बोली भाषेमध्ये आत्याला फुई म्हणायचे). त्याच्या या लांबच्या फुईच्या यजमानांची फिरतीची नोकरी त्यामुळे दर तीन-चार वर्षांनी ते कुटुंब कुठल्यातरी नवीन गावाला स्थलांतरित होत असे. निरक्षर गोमट्या प्रत्येक नवीन गावचा ठावठिकाणा कधी आणि कसा जाणून घेई माहिती नाही पण दर तीन एक वर्षातून एकदा तरी त्या नेमक्या गावी दाखल व्हायचा. गाडी मोटारीची वेळ सांभाळायची गोमट्या ला गरज नव्हती, मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर पायी पायी बासरीवर सुरेल भजन गात कधी शेताभातांमधून जाणाऱ्या पांदणवाटा तर कधी कच्च्या सडकेने रस्ता कापत निघायचा.रस्त्यात भेटलेला कुणी एखादा बैलगाडीवाला दोघांच्या वाटा वेगळ्या होईपर्यंत त्याला बसूनही घ्यायचा. गोमट्या कायम फिरस्तीवर असायचा. त्याचं नेमकं नाव काय होतं हे काही ठाऊक नाही पण सगळे बहुतेक गोमट्या म्हणूनच ओळखायचे तर कोणी गोमट्या साधू किंवा गोमटाजी म्हणून हाक मारायचे.कुठल्याही नावाने हाक मारली तरी त्याला काही फरक पडत नसे.छोट्या चणीचा बांधा, सडपातळ शरीरयष्टी, निर्मळ मनाची साक्ष पटविणारे डोळ्यातील निरागस भाव,कपाळावर वैष्णव वळणाचं गंध, अंगावर जाडंभरड धोतर, पांढरा अंगरखा, डोक्यावर काळे कुळकुळीत मानेशी हलकेच सलगी करण्याइतपत लांब असलेले विरळ केस, खांद्यावर अडकवलेली जरा लांबच कसे (बंध) असलेली कापडी पिशवी त्यामध्ये एक कपड्यांचा जोड आणि आणखी दोन-तीन पिलमपोया (बासऱ्या) मावतील एवढी नक्षीदार विणकाम केलेली एक बटवा सदृश्य छोटी पिशवी, असा हा गोमट्या आला की घरातील लहान मुलांना भारी मजा वाटे. दिवस जर का उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे असले तर त्यांच्यासाठी गोमट्याचे येणे हे मौज,मस्ती आणि आनंद याची पर्वणीच असायचे.रात्री मोकळ्या अंगणात झोपण्यासाठी टाकलेल्या खाटांवर शेजारची आणि घरातील सगळी मुलं जमायची आणि गोमट्याचा विविध कलागुणांनी नटलेला प्रयोग सुरू व्हायचा. कधी त्यामध्ये निरनिराळ्या मानवी स्वभावांच्या छटा आणि त्यानुरूप घडणारे व्यवहार टिपणाऱ्या वेगवेगळ्या दंतकथा तर कधी लोकगीतांतून लोकजीवन उलगडणाऱ्या विलक्षण लोककथा,रम्य परीकथा,राजाराणीच्या गमतीदार कथांचा खजिना असायचा. उमद्या राजपुत्राचा कुठलेसे भूक लाडू तहान लाडू सोबत घेऊन अतिदुर्गम प्रदेशातील चित्तथरारक खडतर प्रवास ऐकताना फार मजा वाटायची आणि उत्सुकताही शीगेला पोहचायची आणि हे सगळं साभिनय सादर व्हायचं तर कधी मध्येच आकाशातील एखादा तारा निखळातांना दिसला की तो बघता बघता आकाशातील चांदण्या आणि त्यांच्या कथांचा अध्याय सुरू व्हायचा. चांदण्यांमध्ये गोमट्याच्या आवडीची कथा, सप्तर्षीची. मला आठवतं, त्यावेळी गावाकडे या तारकापूंजाला सर्रासपणे बुढीचं खाटलं म्हणूनच ओळखायचे. मग त्याचीही कथा वाऱ्याच्या थंडगार झुळकेसह कुणाच्यातरी आग्रहास्तव सुरू व्हायची. या गप्पा गोष्टींमध्ये पौराणिक कथांचाही समावेश असायचा त्यामध्ये कालिया मर्दन, कृष्ण सवंगडी पेंद्या, गोवर्धन पर्वत पूजा, मारुती भीम भेट,सीता स्वयंवर, नवनाथांच्या कथा, सप्तचिरंजीवांच्या कथा आणि अशा अनेक कथा. सप्तचिरंजीवांच्या कथांमध्ये अश्वत्थामा आणि मारुती यांच्या कथा सांगायला गोमट्याला फार आवडे. यांच्या सोबतीला स्वतःच्या भ्रमंतीतील वेगवेगळे अनुभव तर कायमच ऐकवायचा. हा सगळा कथाकथनाचा खेळ तेव्हाच संपवायचा जेव्हा गोमट्याची फुई घरातलं सगळं आवरून अंगणात यायची आणि गोमट्याला म्हणायची गोमट्या रात्र फार झालीय. आता पुरे, उद्या उठायचं आहे पहाटे, तेव्हा लगेच शहाण्यासारखा गोमट्या चिडीचूप व्हायचा आणि सगळ्यांना खुणेनेच तसा इशारा करायचा.
दुसऱ्या दिवशीची पहाट गोमट्याच्या कोंबड्यासारख्या हुबेहूब आरवण्याच्या आवाजानेच व्हायची. गोमट्या कितीतरी प्राणी आणि पक्षांचे आवाज काढण्यात पटाईत होता. गोमट्या आवरून लगेच पिलमपोया सोबत घेऊन घराबाहेर पडायचा आणि गावभर फिरून दुपारच्या जेवणाला घरी परतायचा. या गावफेरीमध्ये लोकांच्या रोज बसण्याच्या बहूतेक सर्व कट्ट्यांना गोमट्या आळीपाळीने भेटी देत असे.कधी झाडाखालच्या पारावर, दुकान वा मंदिराच्या समोरील ओट्यावर, न्हाव्याच्या मोकळ्या मैदानातील बैठ्या दुकानाच्या पथारीवर, कधी कधी तर चौकातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणाऱ्या घोळक्यातही पिलंमपोयातून वाजणाऱ्या भजनाच्या तालावर नाचताना दिसायचा. वाजवून आणि नाचून झाले की तिथल्याच एखाद्या उत्साही बाईंच्या घागरीतील पाणी पिऊन तृप्त व्हायचं आणि पुढे चालू लागायचा सोबत बालगोपालांचा मेळा हा असायचाच.गोमट्या एकटाच जरी पिलमपोयातून भजन आळवित बसला तरी हळूहळू भोवती लोक गोळा होतं.एकदा तर गंमतच झाली त्याचा खेळ बघून खुष झालेल्या एका आजीबाईंनी घरातून भाकरी आणि तीवर थोडी भाजी वाढून त्याच्या हाती द्यायला लागली तर गोमट्या अत्यंत विनयाने त्यांना म्हणाला भिकारी नाही मी दादी, मी माह्या फुईच्या घरी पावना आलो, तेव्हा ओशाळलेल्या आजीबाईंनी त्याला म्हटले हो का, ते ठीक आहे पन मी तुह्या नावानं हे भाजी भाकर काढली, तं आता घरात ये, बस जरासा आन् खाऊन घे कसा. तुह्या फुईले मी सांगंन म्या आग्रो केला मनुन आमच्या घरची भाजी भाकर खाल्ली वं तुमच्या पावन्यान. आज पाहुण्यांना आम्ररस वर्ज्य आहे असे कोणी काहीतरी भलतेच सांगावे तर गोमट्या अगदी सहजपणे पानातली रसाची वाटी बाजूला काढून ठेवी, जर का झालेला प्रकार त्याच्या फुईच्या लक्षात आल्यास त्याला ती रसाची वाटी परत पानात घ्यायला सांगे आणि वरून त्याच्या कमालीच्या निरागसतेची टिंगल करणाऱ्या मुलांना दमही भरे.
आठवडी बाजाराच्या दिवशी गोमट्या बाजारातल्या वेगवेगळ्या दुकानांपुढे काही ना काही कला सादर करे आणि दुकानदार त्याच्या कलाकारीवर खुष होऊन दुकानातील जिन्नस देत असंत.बक्षिशीत मीळालेलं संपूर्ण साहित्य अंगावरील लांबलचक शेल्यामध्ये गोळा करून, थेट मजूर वस्तीमध्ये जाऊन तेथील लोकांमध्ये सर्व साहित्याचे वाटप केल्यानंतरच हा वैरागी घराची वाट धरायचा.अशाप्रकारे गोमट्याच्या मुक्कामाचा आठवडा तर कधी पंधरवाडा भर्कन संपायचा आणि या अवलियाला बहुतेक दुसऱ्या कुण्या नवीन गावचे वेध लागायचे.
पुढल्या वर्षी परीक्षा संपून पुन्हा एकदा उन्हाळ्याची सुट्टी लागली की शेजारची मुलं विचारायची यावर्षी पण येणार न काकू, तुमच्याकडे गोमटाजी साधू, नाहीतर पत्र पाठवून बोलावून घ्या न त्यांना. यावर गोमट्याची फुई म्हणायची,पत्र धाडायला त्याचा नेमका ठावठिकाणा तर माहिती असायला हवा.तो काय आज इथे तर उद्या तिथे, सारखा पायाला भिंगरी बांधलेला फिरस्ता वैरागी.
┉❀꧁꧂❀┉
© डॉ. नेहा विनोद भटकर
अमरावती
मो ९९७५०३०६२७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




