कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ झपूर्झा ! गडे झपूर्झा! ☆ कल्याणी केळकर बापट ☆
(सात आक्टोबर : पुण्यतिथी निमित्त)
कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
साहित्य वाचायची, समजून घ्यायची एकदा सवय झाली की मग आपोआप लिहायची पण सवय होते. लिहायच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि म्हणूनच मग आपल्याला प्रत्येक लिखाणात वेगवेगळी गोडी, खुमारी जाणवायला लागते.
आपले विचार, मत हे विस्तृत स्वरूपात मांडायच ठरवलं की ते भरपूर उदाहरण, दाखले देऊन वर्णन पर लिहिले की ते गद्य प्रकारात मोडतं आणि हेच आपले विचार, भावना अतिशय कमी शब्दात व्यक्त करता आल्यात तर ते पद्य ह्या प्रकारात मोडतं.
गद्य म्हणजे दैनंदिन बोलण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील, व्याकरणाचे नियम पाळून साध्या व सरळ भाषेत केलेले लेखन . यात कथा, कादंबरी, निबंध, नाटक, चरित्र, आणि पत्रे यांसारख्या साहित्य प्रकारांचा समावेश असतो. तर पद्य म्हणजे छंद, लय, यमक आणि विशिष्ट अक्षररचना किंवा मात्रेच्या नियमात बांधलेली कविता, अभंग, ओवी किंवा श्लोक-रूपी रचना होय हे गद्याच्या विरुद्ध असते, कारण यात भावनांना नाद आणि यमकाद्वारे काव्यात्मक रूप दिले जाते.
गद्य प्रकारात लिहिण्यापेक्षा पद्य प्रकारात मांडणं हे जास्त कठीण कारण किमान शब्दांत कमाल भावना वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात.
एकदा साहित्याची आवड निर्माण झाली की मग आपोआप आपलं लक्ष, नजर ही त्यातील सौदर्यावर पडते. मग ते सौंदर्य कथा, कादबं-या, कविता, लेख चारोळ्या इत्यादी प्रकारांमध्ये आपल्याला आढळतं. मग आपल्याला आवडत्या प्रकारांमधील आपला अजूनअजून शोध सुरु होतो.
आजची तारीख म्हणजे ह्या साहित्यातील कठीण प्रकार आपल्या वेगळ्या आधुनिक काव्याच्या शैलीत मांडणाऱ्या केशवसुतांची जयंती. कवी केशवसुत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असून त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक मानले जाते.
इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त 135 कविताच आज उपलब्ध आहेत. त्यांच्या कवितांमध्ये अनेक प्रकारचे नानाविध विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी अगदी सहजपणे हाताळले आहेत. इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो.
त्यांची साहित्य, कविता ह्या बाबतीत स्पष्ट आणि परखड मतं होती. प्रत्येक कवीची प्रतिभा ही त्यांची स्वतःची स्वतंत्र असावी असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हे कायम उत्स्फूर्त असावे ते कुठल्याही हुकूमानुसार नसावे असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण ह्या प्रभावाने त्यांच्या भारतीय शैलीच्या मध्ये आला नाही हे पण खरे. ‘आम्ही कोण?’, ‘झपुर्झा’, ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’ या त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध व गाजलेल्या कविता आहेत.
भगवतगीतेतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचा मुक्त आविष्कार आपल्याला त्यांच्या झपूर्झा ह्या कवितेत वाचायला आणि अभ्यासायला मिळतो. ह्या कवितेतील चार ओळी पुढीलप्रमाणे,
हर्षखेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रु पळाले।
कंटक-शल्यें लव वठली; कांहीं न दिसे दृष्टीला l
प्रकाश गेला, तिमिर हरपला
काय म्हणावें या स्थितिला ?—
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
अशा ह्या प्रतिभावान कवींचे दिनांक 7 नोव्हेंबर 1905 रोजी दुःखद निधन झाले.
© कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





