शुभा रूद्र 

🌸 विविधा  🌸

☆ व्यर्थ अवडंबर केवढे प्रथांचे ते… ☆ शुभा रूद्र  ☆

☆

संस्कृती आणि परंपरेचा मूळ हेतू निसर्गाप्रती कृतज्ञता, आत्मिक समाधान आणि समाज एकत्र आणणे हा होता. दुर्दैवाने, आज सणांमधील हा खरा भाव हरवला असून केवळ दिखावा, स्पर्धा आणि अनिर्बंध अवडंबर शिल्लक राहिले आहे.

दसर्‍याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने लुटली जातात, पण दुसऱ्या दिवशी तीच पाने आणि झेंडूची फुले रस्त्यावर पायदळी तुडवली जातात; झाडे मात्र बोडकी होतात. ती पाने तोडण्यापेक्षा प्रत्येकाने एक जिवंत रोपटे लावण्याची परंपरा का सुरू करू नये?

नवरात्रात रंगीबेरंगी साड्यांचे फॅड आले, पण भोंडल्याच्या जुन्या गाण्यांमधील अर्थहीन सासुरवास आजच्या स्वतंत्र स्त्रीशी विसंगत वाटतो.

हत्तीच्या प्रतिकाभोवती खिरापतीऐवजी लहान रोपांची देवाणघेवाण करून ही प्रथा अधिक अर्थपूर्ण करता येईल.

प्रत्येक सण आज कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा दणदणाट, वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांपुरता मर्यादित झाला आहे. आवाजाचे हे प्रदूषण आजारी आणि वृद्ध माणसांचा श्वास कोंडते. आरोग्याबाबत बोलायचे तर भेसळयुक्त मावा, अतिरिक्त साखर आणि मैदा सणाच्या नावाखाली पोटात ढकलून स्वतःला आजारांच्या खाईत लोटले जाते. बाजारात वर्षभर सर्व पदार्थ सहज उपलब्ध असताना सणाचा खरा कौटुंबिक आनंदच संपला आहे.

मोबाइलच्या छोट्या पडद्यात अडकलेला माणूस निसर्गाच्या विशाल सौंदर्यापासून तुटला आहे. स्टिकर्सच्या रांगोळ्या आणि तोडलेल्या फुलांचा सडा यांत निसर्गाचा सन्मान नाही. आता गरज आहे ती पोकळ प्रथांना नाकारून, विवेकाची कास धरून, निसर्गपूरक व अर्थपूर्ण बदल अंगीकारण्याची वेळ आलेली आहे.

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted