श्री जगदीश काबरे

☆ “विचार…. सर्वांगीण विचाराचा☆ श्री जगदीश काबरे ☆

एखाद्या मुद्याचा सर्वांगीण विचार का करायचा? कारण एकांगी विचारानं जगताना दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे आपली समाजासोबत जगण्याची क्षमता कमी होते. एकांगी राहिलो तर एकसारखा विचार करणाऱ्यांचीच टोळी बनेल, मग दुसरा एकांगी विचार करणाऱ्यांची दुसरी टोळी बनेल, मग टोळी-टोळी खेळण्यातच वेळ जाईल. म्हणून सर्वांगीण विचार करायचा प्रयत्न करणारे लोक वाढतील तशी समाजाची समज वाढल्यानं एकूण सामाजिक आनंद-समाधान वाढेल.

म्हणून करायलाच हवा हा सर्वांगीण विचार! पण खरंच सर्वार्थानं येतो तरी का तो करता? नाहीच बहुधा. पण तसा प्रयत्न तर सतत सुरू ठेवायला हवा. कसा करायचा मग हा सर्वांगीण विचाराचा प्रयत्न? एक सर्वात सोपं उत्तर म्हणजे वेगवेगळ्या लोकांसोबत राहणं, त्यांची गोष्ट, त्यांचा प्रवास ऐकणं. त्यांचा धर्म, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा यावर चर्चा करत राहणं. या सगळ्यांच्या एकमेकांना समजून घेण्यासाठी मदत करणाऱ्या असतात.

पण आपली सध्याची सामाजिक बांधणी अशी होत चालली आहे की डावे, उजवे, सोशलिस्ट, लिबरल, कम्युनिस्ट, गांधीवादी, हिंदुत्ववादी, ब्राह्मण, फेमिनिस्ट, सेक्सिस्ट, रेसिस्ट, कॅपिटलिस्ट… वगैरेंपैकी कुठलंतरी बिरुद चिकटवून आपलं आणि इतरांचं वर्गीकरण आणि त्यानुसार ध्रुवीकरण केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. लोकांचे जीवनप्रवास मनापासून ऐकून घेताना हे हमखास समजतं, की ह्यातली कितीतरी परस्परविरोधी बिरुदं आपल्यात गुण्यागोविंदानं नांदत असतात. मग टोळी-टोळीचा खेळ तितकासा सार्थक वाटत नाही. आपली कवाडं आणखीन उघडतात. समज वाढते.

बरेचदा असं होतं, की आपण अनेक गोष्टी करतो तेव्हा फारसा विचार न करता करतो… इतर सगळे करतात म्हणून लोक काय म्हणतील या भीतीपोटी देखादेखी करत असतो, आणि कळपात सुरक्षितता शोधत असतो. नंतर मागे वळून पाहताना त्यानुसार एक सुसंबद्ध वैचारिक मोट बांधली जाते. मग त्यात ठराविक वर्तुळातच आपण फिरत राहतो.

जेव्हा आपण सर्वांगाने विचार करू लागतो तेव्हा आपल्या लक्षात येते की, एकांगी विचारामुळे माणूस स्वतःला… स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ सांगायला लागलेला असतो. खरे तर सगळ्याच समाजाप्रती आपल्या सगळ्यांचंच काही एक कर्तव्य असतं. आपण आपला खारीचा का होईना पण वाटा उचललाच पाहिजे. नाहीतर आयुष्य आपलं नुसतं जातच राहतं गळक्या मडक्यासारखं..

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted