श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “क्ष…” – भाग – ३ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
क्ष… 481
अक्षर ओळख करतांना अगदी क्ष किरणासारखा शिरलेला हा क्ष तंबूत शिरलेल्या उंटासारखा ठाण मांडून बसला आहे. अनेक शब्दात तो येतो.
सुरुवातीला सुटे, दशक…… लक्ष, दशलक्ष यापासून अंकात आला, मग क्ष ची किंमत काढा अस म्हणत गणितात शिरला. लक्ष देण्यावरून मनात बिंबला. पुढे पुढे तर भाषा बदलत एक्स आणि वाय अक्ष असा क्ष आणि य करत आलेखाच्या कागदावर पण अवतरला. आणि इथेच आमचा वाढत जाईल अस वाटणारा आलेख क्ष आणि य या दोन्ही अक्षावर क्षय ग्रस्त झाला. य अक्षावर तो वाढला नाही. क्ष अक्षावर तो पसरलाच नाही.
गणितात या क्ष ची किंमत शोधावी लागली. तर मित्रांमधे बरीचशी गुपितं सांगणारी व्यक्ती ही क्ष च असायची. क्ष व्यक्तीने सांगितल असं म्हणत त्या व्यक्तीच नांव गुप्त ठेवलं जायचं.
क्षमा या शब्दात तो नम्रता आणि मोठेपणा घेऊन आला, तर क्षोभ या शब्दात जहालपणा शिकवून गेला. क्षय या शब्दात अस्ताकडे जाणारा वाटला, तर क्षीण मधे तो कमजोर झाला. क्षेमकुशल विचारतांना प्रेमासोबत भावनांसह वावरला. तर क्षमता सिध्द करतांना सगळ्या गोष्टींवर मात करण्याची हिंमत देणारा ठरला.
तो साक्षरात आहे, निरक्षरातही आहे. क्षणात आहे, लक्षणात आहे. विलक्षणातही आहे. लक्ष आणी लक्ष्य यात आहे, पण सगळीकडे अर्थ वेगळा आहे. तो एकटा आला तसाच जोडाक्षरात पण आला. तीक्ष्ण मधला टोकदार वाटला, सुक्ष्म मधला शोधावा लागला.
तो पक्षात जाणवला, भक्षात गिळंकृत करून गेला. कधी कधी तो लक्षात आला नाही. आणि भक्तीत साक्षात दिसलाच नाही. संस्कृत मधे क्षीर या पदार्थाच्या नावाने आला, तर पदार्थ विज्ञानात क्षार नावाने मिसळला. क्षेत्रीय आणि क्षत्रिय यातही आला. वृक्षात सावली धरली, रुक्षात निरस वाटला, क्षितीजात विस्तीर्ण जाणवला.
अशा पध्दतीने क्ष हा अक्षर ओळखीपासून ओळखापाहू या वेगवेगळ्या सदरात वेगवेगळ्या पध्दतीने येतच राहिला.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





