श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “नशीब आणि कर्तृत्व…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
मिळणं आणि मिळवणं या गोष्टी नशीब आणि कर्तृत्व यावर अवलंबून असतात. पण आम्ही (म्हणजे मी. हल्ली आदराने कोणी बोलतच नाही. एकेरी नावानं बोलण्यातच आदर आहे अस समजून घ्याव लागत. त्यामुळे स्वत: बद्दल बोलतांना तरी अनादर नको म्हणून आम्ही.) आम्ही जे काही मिळवलं त्यात आमचं कर्तृत्व काय? हाच प्रश्न समोरच्याच्या चेहर्यावर दिसला. आणि आम्हाला जे काही मिळालं त्यात याचं कर्तृत्व काय! हाच विचार समोरच्याच्या चेहर्यावर होता. (वाचाल तर वाचाल हे फक्त लिहिलेलं वाचण्यासाठी नसून चेहरा सुध्दा वाचता यायला पाहिजे याचसाठी लिहीलं असाव असा माझा विचार आहे.) म्हणजे मोठेपणी आम्हाला जे मिळालं किंवा जे मिळवलं त्यात आमचं कर्तृत्व शून्य होत. (आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांच्यामुळे कर्तृत्व याच्यापुढे शून्य तरी होतं. नाहीतर नशीबात काय काय ऐकाव लागल असत काय माहीत.) इतरांंच्यामते आमच्या पदरात जे काही पडलं त्यात नशीबच जास्त होत हा समज अगदी सर्वत्र व्यवस्थित पसरला आहे. नशीब आपलं, दुसर काय…
मिळणं आणि मिळवणं या गोष्टी नशीब आणि कर्तृत्व यावर अवलंबून असल्या, व आमच्या बाबतीत हे दोघेही काही प्रमाणात खो खो सारखा खेळ एकाच संघाकडून खेळत होत्या. म्हणजे एका जागेवर एक बसला कि दुसरा ऊभा रहायचा. तरी, आम्हाला काहीच मिळालं नाही अस अजिबात नाही. मिळालं भरपूर. पण मिळवलं काय… तर ते काही जास्त नसलं तरी कमीही नाही.
लहानपणी आम्हाला जे मिळालं ते नशीबाने नाही तर ते आमचं कर्तृत्व होत. मिळणारा मार, खावी लागणारी किंवा ऐकावी लागणारी बोलणी, भोगलेली शिक्षा यासाठी आम्ही दिलेला त्रास, केलेली भांडणं, मस्ती, दंगा हेच कारणीभूत होत. (भोग आपले.)
आमच्या वर्गशिक्षकांनी दिलेले किंवा मारलेले शेरे हा नेमका कोणाच्या नशीबाचा भाग होता सांगता येत नाही. कारण नशीबाने ते आमचे वर्गशिक्षक होते, आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी. अस म्हंटल तरी त्या शे-यावर प्रतिक्रिया देण्याबाबत आमच्या पालकांनी त्यांच्या कर्तृत्वात कसूर दाखवल्याच आठवत नाही. कधी कधी तर शेरा मिळण्याआधीच पालक तोंडी समज देऊन त्यांच कर्तृत्व पार पाडायचे. यावेळी वक्तृत्व आणि कर्तृत्व यांची जुगलबंदी चालायची आणि ती जुगलबंदी आपल्या नशीबात आहे अस समजत होतो.
आम्ही जे काही कर्तृत्वाने मिळवणार होतो त्याला दरवेेळी नशीबाची साथ नव्हती. आणि नशीबाने काही मिळेल इतक कर्तृत्व आमच सतत कधीच नव्हत. त्यामुळेच मिळणं आणि मिळवणं या गोष्टींसाठी कुंडलीत आमचा गुरू तेवढा प्रबळ वाटला नाही तरी त्यात शनीची बाधाही नव्हती. सगळ अगदी सौम्य मंगळासारख मंगल होत. त्यावरचे उपाय आणि अपाय दोघांनी आपले पाय घट्ट रोवले होते.
नशीबाने मित्रही चांगलेच मिळाले. पण या बाबतीत मी त्यांच्या नशीबाचा विचार कटाक्षाने टाळतो. सगळ्यांच नशीब सारखं नसत हे मला त्यांच्याकडे पाहिलं की जाणवतं. काहींनी मला टिकवून ठेवण्यात धन्यता मानली, तर काहींनी माझ्यासोबत टिकून राहण्यात. यात मात्र नशीब आणि कर्तृत्व माझं का त्यांच यात गोंधळ होतो.
मिळणं आणि नशीब या बाबतीत नवरा आणि बायको यांचापण विचार मनात डोकावलाच. पण तो फक्त डोकावला. काहीही काम किंवा गरज नसतांना इतरांच्या बाबतीत आपण डोकावतो तस्साच, किंवा प्रवासात शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या वर्तमानपत्रात आपण डोकावतो तसा, आणि तेवढाच. कारण आता त्या बाबतीत दोघांपैकी कोणाचही नशीब बदलेल अस वाटत नाही. आणि आम्ही नशीब बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वत:च बदललो आहे हा दावा दोघांचाही तेवढ्याच ठामपणे असतो. अर्थात नवरा किंवा बायको नशीबाने कसेही मिळाले असले तरी त्यांच्याकडून आपल्याला हवं ते, हवं तस, आणि हवं तेव्हा मिळवून (करुन) घ्यायला मात्र कर्तृत्व लागत हे नक्की. यात बर्याचदा आपल्या कर्तृत्वाला नशीबाची साथ मिळत नाही. आणि त्यांच नशीब जोरात असत, त्यामुळे त्यांच कर्तृत्व सिध्द होत. अनेकवेळा या बाबतीत आम्हाला घरचा आहेरच नशीबात असतो असा दोघांचाही समज. आजकाल लग्नपत्रिकेत आहेर किंवा पुष्पगुच्छ आणूनये अस लिहील्यावर सुध्दा काही थेट घरी येऊन आहेर देतात आणि काहीवेेळा तो टाळता येत नाही. तसाच हा घरचा आहेर. स्विकारावाच लागतो. तो मिळतोच.
नशीब आणि कर्तृत्व एकमेकांच्या सोबत असले तर काय विचारता… पण आमच्या बाबतीत या नाण्याच्या दोन बाजू वाटल्या. दोन्ही एकाच वेळी कमीवेळा दिसल्या. पण तरीही नशीबाने कर्तृत्वाला, आणि कर्तृत्वाने नशीबाला साथ दिलेली समजतं.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





