श्री जगदीश काबरे

🌸 विविधा  🌸

☆ “डीजे, नाचणारे, आणि आवाज…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

डीजे, ढोलताशाच्या ठाणाणा आवाजात नाचणाऱ्या लोकांना आवाजाचा त्रास कसा होत नाही? –जगदीश काबरे

धार्मिक सण हे लोकांना त्रास देण्यासाठी नाही, तर लोकांनी एकमेकांना भेटण्यासाठी आणि आनंदाने वेळ घालण्यासाठी असतात. पण सध्या सणांशी काडीचाही संबंध नसलेले डीजे, ढोलताशे वाजवून आणि लेझरचे झोत टाकून आपण सणापेक्षा धर्मांधताच साजरी करतो आहोत असे खेदाने म्हणावे लागतेय. समाजातील बाव्हंशी लोक शांततेने सण साजरे करू इच्छित असतात; पण उन्मादी उत्सवखोरांमुळे सामान्य जनांना ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण आणि प्रकाशप्रदूषणाला नाईलाजाने सामोरे जावे लागते. म्हणूनच एका मिरवणुकीतील डीजे किंवा ढोलताशांचा प्रचंड आवाज एखाद्या व्यक्तीला असह्य होतो, तर दुसरी व्यक्ती त्याच आवाजात तासन्‌तास बेभान होऊन नाचत असते.

याचा अर्थ नाचणाऱ्या व्यक्तीच्या कानांना आवाजाचा त्रास होत नाही, असा मुळीच नाही. आवाजामुळे होणारा शारीरिक त्रास आणि त्या आवाजाचा मनाला होणारा आनंद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मानवी मेंदू आवाजाची केवळ तीव्रताच अनुभवत नाही, तर त्या आवाजाशी जोडलेल्या भावना, आठवणी, अपेक्षा आणि सामाजिक संदर्भ यांचाही विचार करतो. एखाद्या व्यक्तीला आवडणारे संगीत मोठ्या आवाजात ऐकताना आनंद होतो, तर तेच संगीत न आवडणाऱ्या व्यक्तीला त्रासदायक वाटू शकते. विशेष म्हणजे, एखाद्या व्यक्तीला स्वतः निवडलेल्या मोठ्या आवाजाचा तुलनेने कमी त्रास जाणवतो; परंतु तिच्यावर लादलेला तितकाच मोठा आवाज अधिक त्रासदायक वाटू शकतो. मानसशास्त्रात याचा संबंध व्यक्तीच्या भावनेशी आणि आवाजाबद्दलच्या दृष्टिकोनाशी निगडीत असतो.

यात समूहमानसशास्त्राचाही मोठा वाटा असतो. शेकडो लोक नाचत असताना एखाद्या व्यक्तीला स्वतःचा उत्साह आणखी वाढल्यासारखा वाटू शकतो. इतरांच्या हालचालींचे अनुकरण, समूहात सामावून घेण्याची इच्छा आणि मित्रांचा आग्रह यांमुळे ती स्वतःच्या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करू शकते. काही मिरवणुकांमध्ये मद्यसेवनामुळेही व्यक्तीची निर्णयक्षमता आणि धोक्याची जाणीव कमी झालेली असू शकते. अर्थात, प्रत्येक नाचणारी व्यक्ती मद्याच्या प्रभावाखाली असते असे नाही. तसेच ती आनंदाने विभोर होऊन नाचत असली तरी तिच्या कानावर आणि हृदयावर अत्याचार होतच असतो. त्यामुळे काही व्यक्ती डीजेच्या तालावर नाचत असताना किंवा नाचून घरी आल्यावर हार्ट अटॅकने मेल्याच्या बातम्या येतात. पण लक्षात कोण घेतो?

माणसाच्या आतील कानात ध्वनिलहरी ग्रहण करणाऱ्या अत्यंत संवेदनशील पेशी असतात. अतितीव्र आवाजामुळे त्यांना इजा होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार १०० डेसिबल आवाजाच्या संपर्कात आठवडाभरात सुमारे २० मिनिटे राहणेदेखील सुरक्षित श्रवणमर्यादेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. आवाज ११० डेसिबल असेल, तर ही मर्यादा अवघ्या अडीच मिनिटांपर्यंत कमी होते. म्हणून अनेक नाचणाऱ्या तरुणांना मिरवणूक संपल्यानंतर कानांत शिट्टी वाजणे, कान जड होणे किंवा काही काळ कमी ऐकू येणे असा त्रास होऊ लागतो, आणि वारंवार अशा तीव्र आवाजाच्या संपर्कात राहील्यामुळे बऱ्याच तरुणांना कायमस्वरूपी बहिरेपणाला सामोरे जावे लागते.

याची दुसरी बाजू अशीही आहे की, बरेचदा गरीब तरुणांना डीजेच्या तालावर नाचण्यासाठी आणि ढोलताशे वाजवण्यासाठी पैसे मिळतात, जेवण आणि दारूही मिळते. म्हणून त्यांनी मिरवणुकीत स्वेच्छेने त्या आवाजात राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. मिरवणुकांमध्ये मद्यसेवनामुळे काही व्यक्तीची निर्णयक्षमता आणि धोक्याची जाणीव कमी होते. पण पैसे मिळतात म्हणून आपल्या आरोग्याशी खेळ करत आपण विकतंच दुखणं घेत आहोत, हे या तरुणांच्या लक्षातच येत नाही. आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

मात्र त्याचवेळी रस्त्यालगतच्या इमारतीत राहणारी वृद्ध व्यक्ती, लहान मूल, आजारी माणूस किंवा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी यांना तोच आवाज नाईलाजाने सहन करावा लागतो. त्यामुळे उत्सवखोरांच्या उन्मादी मिरवणुकीतील आनंद हा खरा निर्भेळ आनंद नसून विकृत आनंद म्हणायला हवा. मिरवणुकीच्या रस्त्यालगत राहणाऱ्या माणसांना या डीजेचा आणि ढोलताशांचा त्रास एवढा असहाय्य होतो की ते बरेचदा या काळात घराबाहेर लांब दुसरीकडे जाणे पसंत करतात.

थोडक्यात, नाचणाऱ्या लोकांना आवाजाचा त्रास होतच नाही असे नाही; पण आनंदाच्या भरात त्यांना तो जाणवत नसतो. त्यांचा मेंदू आनंदात असला, तरी त्यांचे कान ध्वनिप्रदूषणापासून सुरक्षित असतातच असे नाही. तेव्हा उत्सवखोरांनो सावधान! देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून स्वतःबरोबरच इतरांना त्रास होऊ नये यासाठी ध्वनीपातळी कमी ठेवून आनंद घेण्यास जेवढ्या लवकर शिकाल तेवढे तुमच्या आणि समाजाच्याही आरोग्यासाठी भले आहे. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted