सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डॉ मीना श्रीवास्तव
🌺 अ भि नं द न 🌺
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव यांना मानाचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथपुरस्कार…
डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या “एक चिरंतन चित्रपट : मुग़ल ए आज़म” या पुस्तकाला गझलनिष्ठ प्रतिष्ठानचा २०२६ सालचा ग्रंथपुरस्कार जाहीर झाला आहे.
ललित लेखन या साहित्य-प्रकारासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराकरिता या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठानातर्फे विविध साहित्यप्रकारांतील गुणवत्तापूर्ण ग्रंथांचा दरवर्षी गौरव करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारांमध्ये डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या चित्रपटविषयक ललित लेखनाला मानाचे स्थान मिळाले आहे.
लोकव्रत प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले “एक चिरंतन चित्रपट : मुग़ल ए आज़म” हे डॉ. मीना श्रीवास्तव यांचे पहिलेच मराठी पुस्तक आहे. १९६० साली प्रदर्शित झालेला “मुग़ल ए आज़म” हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील कलात्मक वैभवाचे प्रतीक मानला जातो. भव्य निर्मिती, प्रभावी अभिनय, भावपूर्ण संवाद, संगीत, नेत्रदीपक दृश्यरचना आणि प्रेम व सत्तासंघर्षाचे प्रभावी चित्रण यांमुळे या चित्रपटाने रसिकांच्या अनेक पिढ्यांवर आपली मोहिनी कायम ठेवली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वी पडद्यामागे किती संघर्ष घडला, किती स्वप्ने विणली गेली आणि किती कलाकारांनी आपल्या कलेचे समर्पण केले, याचे भावपूर्ण दर्शन या पुस्तकातून घडते.
या पुस्तकाला यावर्षी मिळालेला हा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ-सन्मान आहे. यापूर्वी ६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या तितिक्षा कला साहित्य संमेलनात “तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार २०२६” प्रदान करून या पुस्तकाचा गौरव करण्यात आला होता.
डॉ. मीना श्रीवास्तव यांचे आपल्या सर्वांतर्फे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील अशाच यशस्वी साहित्यप्रवासासाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈






