श्री सुधीर करंदीकर
☆ “जागतिक कन्या दिवस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार जगभर international daughter’s day / जागतिक कन्या दिवस म्हणून साजरा होतो.
माझ्या मनात सहज विचार आला की असा दिवस साजरा करण्याचे कारण काय असावं! आणि याची सुरुवात कशी झाली असावी!
यावर विचार करता करता यावरच्या कारणाचा मला उलगडा झाला तो असा —
चांगल्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला नेहमी कुठल्यातरी पुराण कथेत घेऊन जातो. पूर्वी राजे मंडळी / श्रीमंत मंडळी, आपली गादी / वारसा पुढे चालवण्याकरता देवाला मुलगा देण्याची प्रार्थना करायचे. आणि इतर लोक पण आपल्याला कामकाजात मदत करण्याकरता / अर्थार्जन करण्याकरता मुलगा होवो, अशीच देवाला प्रार्थना करत. सगळे आजी आजोबा पण मुलाला सुनेला आशीर्वाद देताना पुत्रं भवतू असाच आशीर्वाद देत. अशी सगळी मंडळी नेहमी याकरता शंकराचीच प्रार्थना करत. कारण शंकर भगवान लगेच प्रसन्न होतात हे सगळ्यांना माहित असायचं. आणि शंकर भगवान तथास्तु म्हणून आशीर्वाद देत. आणि त्यामुळे सगळ्यांनाच मुलं व्हायला लागली. मुलींची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आणि बहुतेक घरात मुलंच दिसायला लागली.
हे चित्र बघून सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव चिंतीत झाले. कारण सृष्टी मधल्या सगळ्या मुली संपल्या तर पुढे मुलं मुली होणार कसे! आणि पुढे सगळेच ठप्प होणार. यावर काहीतरी उपाय काढावा याकरता ब्रह्मदेव श्री विष्णू यांच्याकडे गेले. त्यांची प्रार्थना केली आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. आणि यावर आपणच काहीतरी उपाय शोधावा अशी प्रार्थना केली.
सृष्टीचे चालक श्री विष्णू यांनी लगेच उपाय काढला आणि तो अमलात आणला.
एका विचारवंताच्या डोक्यात त्यांनी ‘पहिली बेटी धन की पेटी’ ही कल्पना उतरवली. आणि आता याचा प्रत्यय बऱ्याच जणांना येतोय अशा उदाहरणांची जाहिरात बाजी सुरू केली. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आपला विचार बदलून पहिली मुलगी पाहिजे अशीच प्रार्थना शंकराला करायला सुरुवात केली. आणि शंकर देवाच्या आशीर्वादाने अशी प्रार्थना करणाऱ्यांना मुलीचे वरदान मिळायला सुरुवात झाली.
विष्णू देवतेने काही विचारवंतांच्या डोक्यात मुलगी ही म्हातारपणची काठी, अशी कल्पना पण रुजवली. आणि बऱ्याच वयस्कर मंडळींची म्हातारपणी मनापासून सेवा करणारी मुलगीच असते अशी उदाहरणे समाजामध्ये लोकांच्या समोर येतील अशी व्यवस्था केली. त्यामुळे नवीन लग्न झालेल्यांच्या शंकराकडे मुलगीच पाहिजे अशा प्रार्थना सुरू झाल्या.
पूर्वी मुलींना शिक्षण देणे, नोकरी करू देणे, हा प्रकार जवळ जवळ नव्हता. त्यामुळे पण मुलींना दुय्यम स्थान असायचे आणि सगळ्यांची पहिला मुलगाच पाहिजे / दुसरा पण मुलगाच पाहिजे, अशी इच्छा असायची. यावर पण विष्णू देवतेने एक उपाय काढला. आणि मुलींना शिक्षण द्या अशी कल्पना बऱ्याच जणांच्या मनात रूजवली. आणि तशा प्रकारची सगळीकडे बॅकग्राऊंड पण तयार केली. लोकांनी मुलींना शाळा कॉलेजमध्ये पाठवायला सुरुवात केली. मुली मुलांच्या बरोबरीने शिक्षण घ्यायला लागल्या. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षण क्षेत्र, सरकारी ऑफिसेस मध्ये मोठ्या पदांवर आणि राजकारणात पण स्त्रिया वरपर्यंत पोहोचल्या. मुलींची ही अशी प्रगती बघून, सगळेच नव वर -वधू आम्हाला पहिली मुलगी दे अशी प्रार्थना शंकराकडे करायला लागले. शंकर देवाच्या तथास्तु मुळे मुलींची संख्या वाढायला लागली.
अशा रीतीने आपल्याला मुलगी आहे याचा अभिमान सगळ्यांनाच वाटायला सुरुवात झाली.
आता एका कल्पक परदेशी माणसाच्या डोक्यात विष्णू देवतेने मुलींचे कौतुक करण्याकरता वर्षामध्ये एखादा दिवस ठरव असा विचार पेरला. तो महिना होता सप्टेंबर.
त्या कल्पक माणसाने दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला चौथा रविवार हा सगळ्यांनी आपल्या मुलींचे कौतुक करण्याकरता आणि इतरांच्या मुलींचे कौतुक करण्याकरता international daughter’s day म्हणून पाळावा याकरता योग्य ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्यात त्याला यश मिळाले.
तेव्हापासून सगळेजण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवार मुलींचे कौतुक करण्याकरता जागतिक कन्या दिवस म्हणून जगभर साजरा करतात आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करतात.
चला तर मग या दिवशी ब्रह्मदेवता, विष्णु देवता आणि शंकर देवता, यांना नमस्कार करूया. या घडामोडींमधल्या सर्व कल्पक व्यक्तींना वंदन करूया या. आणि सर्वच मुलींना शुभेच्छा देऊया…
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





