श्री मकरंद पिंपुटकर
इंद्रधनुष्य
☆ ज्योत से ज्योत जगाते चलो… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
सुश्री गीता नलावडे
ती प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली त्यालाही १०-१२ वर्षं होऊन गेली होती. पण तिच्या कामामुळे, व्यासंगामुळे आणि विद्यार्थ्यांचे भले करण्याच्या तळमळीमुळे आजही तिला अनेक ठिकाणी शिक्षण क्षेत्रसंबंधातली कार्यक्रमांना मार्गदर्शन करण्यासाठी अथवा परीक्षक म्हणून बोलावलं जायचं. शालेय विद्यार्थी हा तिचा जीव की प्राण, त्यामुळे तीही आवर्जून अशा कार्यक्रमांना जायचीच.
आजही असंच तिला मुंबईतील खूप जुन्या प्रख्यात शाळेत, मुलांच्या व शिक्षकांच्या एका वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून बोलावले होते. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाची मुले व शिक्षक स्पर्धेत होते.
आलेल्या शिक्षकांपैकीच एकाने एवढी मोठी लायब्ररी याच शाळेची आहे असे सांगितले.
असंही ती एरवी कधी मेकअप वगैरेच्या भानगडीत पडायची नाही, आजही पडली नव्हती.
त्या शाळेत गेल्यावर, अन्य परीक्षक जिथे बसले होते तिथे ती गेली. दुसऱ्या एका शाळेची माजी मुख्याध्यापिका असलेली तिची मैत्रीण तिला तिथे भेटली. मराठीतून दोघींच्या मनसोक्त गप्पा रंगल्या.
अन्य शिक्षक बहुधा इंग्रजी माध्यमात, cbse, icse शाळांत, कॉलेजांत शिकवणारे होते, “हल्लीचा विद्यार्थीवर्ग वाचनच करत नाही” या विषयावर त्यांची इंग्रजीतून तावातावाने चर्चा सुरू होती.
साड्या नेसलेल्या, मराठी बोलणाऱ्या या दोघींकडे त्या ग्रुपने क्षणभर नजर फिरवली, पण त्याचा पेहराव व मराठीतून संभाषण ऐकून त्यांनी त्या दोघींची काही दखल घेतली नाही.
“आमच्या शाळेत, शाळेच्या वाचनालयात तब्बल ९०० पुस्तकं आहेत. मुंबईतील शाळांमधला हा रेकॉर्ड आहे, ” ज्या शाळेत स्पर्धा आयोजित केली होती त्या शाळेतलेच एक शिक्षक एकजण फर्ड्या इंग्रजीत शेखी मिरवत होते, मग मात्र हिला रहावले नाही.
“Excuse me a moment, may I say something?” म्हणत तिनं संभाषणात प्रवेश केला, “मी गोरेगावच्या सन्मित्र मंडळाच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होते, आणि आमच्या मंडळाच्या शाळेत वाचनालयात एक हजाराहून जास्त पुस्तकं आहेत, हे मी अभिमानानं सांगू इच्छिते. “
पुढील चर्चेतून ही शाळा ssc स्टेट बोर्डाची शाळा आहे, आणि मराठी माध्यमाची शाळा आहे हे ऐकल्यावर त्यांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.
“तुम्ही मगाचपासून विद्यार्थी पुस्तकं वाचत नाहीत म्हणून तक्रार करत आहात, आणि खरंही आहे ते. पण निव्वळ तक्रार करण्याच्या पलीकडे जाऊन, याचं कारण काय आणि याच्यावर उत्तर काय याची चर्चा करणं जास्त महत्त्वाचं नाही का ?” ती शांतपणे पण ठामपणे बोलत होती.
“आज या मुलांच्या अवतीभवती असलेले सगळेच सतत मोबाईलमध्ये नाहीतर अन्य कोणत्या स्क्रीनमध्ये गुरफटलेले असतात. काही व्हॉट्सॲप, इंस्टाग्राममध्ये तर काही फेसबुकवर मग्न असतात. कोणी रील्स् बघत असतं, कोणी गेम्स खेळत असतं, आणि बाकीचे नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओत मश्गूल असतात. शिवाय कामासाठी कॉम्प्युटर, टॅब्लेट हे आहेतच.
या मुलांच्या अगदी लहानपणापासून, त्यांनी खाणं खावं, आपल्याला गप्पा मारू द्याव्यात अथवा काम करू द्यावं यासाठी आपणच त्यांच्या हातात मोबाईल देतो.
ज्यांच्याकडे बघून पुस्तकं वाचायची प्रेरणा घ्यावी असे त्यांचे शिक्षक आणि अगदी आईवडिलसुद्धा मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. मग अनुकरणप्रिय मुलांनी पुस्तकं सोडून मोबाईलची वाट धरली, तर याला जबाबदार आपणच आहोत ना ?”
या भडीमाराने सगळे स्तिमित झाले. त्यातला एकजण, बहुधा चाळीशीतला असावा तो, रमेश नाव होतं त्याचं, पुढे आला, आणि त्यांच्याशी स्पष्ट, स्वच्छ, शुद्ध मराठीत बोलू लागला, “कळतंय पण वळत नाही, अशी काहीशी सगळ्यांची परिस्थिती आहे. मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी, खरंच, काय करता येईल ?” हा रमेश कारंथ icse मध्ये अकरावी बारावीला गणित शिकवत होता.
“अनेक संत महंत आणि थोर व्यक्तींनी म्हटलं आहे आणि आपल्या आचरणातून सिद्धही केले आहे, तेच आपल्यालाही करावे लागणार आहे. ‘आधी केले, मग सांगितले’. आपण स्वतःच, एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून, रोज नियमितपणे वाचन करू लागलो, तर मुलांसमोर एक आदर्श वस्तुपाठ सादर होईल, ” ती सांगू लागली.
मुलांच्या वयोगटानुसार, वकुबानुसार, आवडीनिवडींनुसार, चांगली पुस्तकं कोणती, चांगले लेखक कोणते याबद्दल त्यांना मार्गदर्शन करता येईल, तशी पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देता येतील.
माझ्या परिचयाचे एक दंतवैद्य आहेत. त्यांच्या घरी सगळेजण घरी आले, की आपापले मोबाईल एका टेबलावर ठेवून देतात. कोणाचा काही कामानिमित्त फोन आला तरच फोनला हात लावायचा असा त्यांच्याकडे नियमच केला आहे घरात.
काय असतं ना, मुलं आपले बारकाईने निरीक्षण करत असतात. आपल्या उक्ती आणि कृतीत फरक पडला की ते त्यांच्या लगेच लक्षात येतं. मग तुम्ही तोंडाने त्यांना पुस्तकं वाचायला सांगत असलात आणि स्वतः मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला असलात तर ही विसंगती ते चट्कन जाणतात, आणि पुस्तकांच्या वाटेलाही जात नाहीत.
आपण जर ठरवून पुस्तकं वाचली, मुलांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांनाही वाचनाची गोडी लागते, त्यांचा व्यासंग वाढतो. “
ती बोलत होती, बाकी सगळे लक्ष देऊन ऐकत होते. रमेशच पुन्हा पुढे बोलू लागला. “आज जणू शाळेतल्या निवृत्त शिक्षिकेशी नव्हे, तर खुद्द आईने समजाऊन सांगितल्याचा भास झाला. I promise you, माझ्या शाळेत तर मी हे अंमलात आणेनच, पण घरीसुद्धा मुलांच्या समोर कधीच मोबाईल हाताळणार नाही. “
ती समाधानाने हसली, निदान एकाने तरी प्रेरणा घेतली होती.
“ज्योत से ज्योत जगाते चलो” हे तिचं ब्रीदवाक्य आजही अविरत सुरू राहिलं होतं.
ती आहे राष्ट्रपती पुरस्कार विजेती, गोरेगाव, मुंबईच्या बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळेची निवृत्त मुख्याध्यापिका – सौ गीता वासुदेव नलावडे.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





