डॉ. तेजस्विनी वाळिंबे
मनमंजुषेतून
☆ आशेचे किरण… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆
☆
युद्धाच्या आगीत काही देश होरपळत आहेत..
उद्रेकाच्या ज्वालेत निष्पाप जीव भस्म होत आहेत..
धर्मांधांच्या बंदुका निरपराधांचे बळी घेत आहेत..
हिंसेचा अजगर जगाला विळखा घालून बसला आहे..
हिजाब न घालण्याच्या गुन्ह्यावरून कोणी नोबेल पुरस्कारार्थी आजही अटकेत आहे..
अत्याचाराने पिडीत दुर्दैवी अबला अजूनही तडफडते आहे..
श्रद्धा -अंधश्रद्धा, हिंसा- अहिंसा, आणि क्रौर्य-मानवतेचं ओझं लीलया पेलून पृथ्वी उभी आहे..
… आणि याच वेळी…
पहाटेचा सूर्य तसाच विलोभनीय भासतो आहे..
निरभ्र आकाशाचा निळा रंग तसाच शांत आहे..
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जादुई दुनिया ज्याला त्याला खुणावते आहे..
गगनाला गवसणी घालण्याची स्वप्ने बघणारेही असंख्य आहेत..
अंधाराच्या गर्भात रवी किरणे विसावली आहेत..
नववर्षाची पहाट आशेची किरणे घेऊन उगवलेली आहे..
***** नवे स्वप्न नवी आशा
मनी फुलली नवी आकांक्षा
नववर्षाची पहाट उगवली
पुन्हा एकदा आनंदाची उधळण झाली *****
☆
© डॉ. तेजस्विनी वाळिंबे
(नेत्रतज्ञ)
(एक डॅाक्टरची आई)
पुणे मो. ८८८८८३१९०५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





