श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ रंग प्रेमाचा… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
“माझा चॉईसच चुकला”
‘प्रेमा तुझा रंग कसा’ या वसंत कानेटकारांच्या नाटकामध्ये बबडी जेव्हा स्वतःच्या वडिलांना असे म्हणते तेव्हा ते उत्तरतात..
“रोमियो ज्युलीयटने सुद्धा लग्न करून संसार थाटला असता तर त्यांनाही असंच वाटलं असतं की आपला चॉईसच चुकला”
जगातील अनेक मोठमोठ्या प्रसिद्ध प्रेमकथा सांगितल्या जातात त्या बहुतेक प्रेमकथांमध्ये त्या दोन्ही प्रेमिकांचे लग्न आणि संसार झाल्याचा त्यात उल्लेख नाही.
… आम्ही ४८ वर्षे आमच्या आयुष्याचा सहप्रवास एकत्रितपणे केला. हुssश्शsss…
जवळपास पहिली चाळीस वर्षे आमची (अर्थात दोघांचीही) सुद्धा बबडीच्या मानसिकतेमध्येच गेली.
चाळीसाव्या वर्षानंतर हळूहळू बदल घडत गेला. आता आम्हाला सहवासाची, एकमेकांच्या बरोबरच रहावे अशी जाणीव प्रकर्षाने होऊ लागली… प्रेमाचा साक्षात्कारच झाला म्हणा ना!
बहुधा अजून दोन वर्षे अशीच प्रेमाच्या साक्षात्कारात जातील.
.. त्यापेक्षा जास्त प्रेम उचंबळून येऊ नये म्हणूनच बहुतेक ५० व्या वर्षानंतर, त्याच दोन्ही नवरा बायकोने पुन्हा लग्न करण्याची पद्धत असते असे म्हणे!
ठीक आहे.
… वाट पाहू अजून चार वर्ष.
… मग पुन्हा चॉईस चुकल्याची भावना आणि भांडणे यांना तोंड द्यायचं आहे? नवीन लग्न झाल्यासारखं?
ठीक आहे. त्याआधी लग्नापूर्वीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून घेऊ!
☆
© श्री सुनील देशपांडे
फोन :९६५७७०९६४०
ई मेल : sunil68deshpande@outlook.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈



