मंजुषा सुनीत मुळे
☆ “मी तरी अशी कशी???” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
*
मी तरी अशी कशी???
– – एकादशी दुप्पट खाशी… तरीही म्हणे मी उपाशी???
… आज “ पापमोचनी “ एकादशी म्हणून जराशीच लवकर उठले… पटापट आवरून पूजेला बसले. हार फुलांनी विठूला सजवले… पण…
.. पण लक्ष सगळं चुलीशी… पोट ओरडतंय ना… मी तर कालच्या रात्रीपासून आहे की उपाशी… ॥
… मग पूजा पटापट उरकून केली भगर नि दाण्याची आमटी उलुशी …चविष्ट खिचडी जराशी… अन् पित्त नको म्हणून गोडशी लापशी…अंमळ जास्तच झालं म्हणत… सुपारीही खाल्ली की चुकून जराशी…
तरी का वाटतंय् मला… मी आहे उपाशी… ॥
… आज भजनाचा स्पेशल क्लास… आहे ना ही ‘ पापमोचनी’ एकादशी..
मग वामकुक्षी सोडून उठले पटदिशी… मेकअप आवरला अगदी झटदिशी.. साडी नेसले ठेवणीतली झकासशी…
पण निघतांनाही वाटत होतं… आहे मी उपाशी॥
… संध्याकाळी ‘फक्त’ थालीपीठं खमंगशी… चापून खाल्ली लोणकढ्या तुपाशी…
मागचं आवरून टाकलं अगदीच चटदिशी…
टी. व्ही. पहायला अन् आडवारले जराशी…
तरी अजून का वाटतंय् असल्यासारखं उपाशी? … ॥
… नकळतच डोळा लागला अन् मनाला जाग आली जराशी
… पोटात अडकलेले विचार… हळूच निसटून गेले मनात… अन् दचकलेच जराशी
… मनाचा देव्हारा तर रिकामाच होता… विठूरायाचा त्यात मागमूसही नव्हता…
… त्यालाच नेमकी विसरले कशी? खंत फार दाटून आली मनाच्या तळाशी… ॥
… अन् अचानक कुणीतरी बोललं कानाशी… उठून बसले मी खट्टदिशी…
… ‘‘उपास उपास म्हणत दुप्पट की खाल्लंस… आणि माझ्याकडे नेमकं दुर्लक्ष केलंस…
… असू देत आता यावेळी… तसंही ‘पापमोचन’ नाहीच होणार.. पण तरी माफ करून टाकतो तुला…
… मात्र खाण्याच्या नादात पुन्हा मला विसरलीस तर… तर जन्मात मी कधीच भेटणार नाही तुला…
… माझ्याखेरीज मनात सारखं इतर भरताड करतेस कशाला? ..
… तिथे असू दे जागा… फक्त माझ्या नामाला…
… मन भरून सतत आठव मला … विसरून जा जरा स्वत:ला…
… मग मात्र नक्की म्हणशील… मन स्वानंदाने गच्च भरलंय्…
… नंतर खुशाल असं म्हण ना की… एकादशी दुप्पट खाशी…
… पण.. पण आता मात्र मी मुळीच नाही उपाशी… ॥
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



सुंदर लिहिता मंजूषा ताई!