शालिनी जोशी
विविधा
☆ आनंद ☆ शालिनी जोशी ☆
बालकवी म्हणतात,
आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे
सगळीकडे आनंदच भरलेला आहे. येथे आहे. तेथे आहे. घरात आहे. बाहेर आहे. पण तो आपल्याला बोलवायला येत नाही. तर आपण त्याला शोधावा लागतो. शोधा म्हणजे सापडेल हेच आनंदाचे तत्व. मग तो झाडा, फुलात सापडतो. कधी पशु, पक्षांत सापडतो. आकाशातही असतो. जमिनीवरही असतो. फक्त बघायचे दृष्टी हवी. ज्याला जे आवडते, मन स्थिर होते तो त्याच्यासाठी आनंदाचा ठेवाच होतो.
एखादा चित्रकार असेल, निसर्गाचे चित्र काढण्यात जेवढा तल्लीन होतो तेवढाच मांजराबरोबर खेळणाऱ्या पिल्लाचे चित्र काढण्यात किंवा एखाद्या भिकाऱ्याचे चित्र काढण्यात होतो. समोर जे आहे ते हुबेहूब कागदावर उतरवणे म्हणजे त्याच्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण करणेच असते. त्यात तो तासनतास रमतो. त्याच्यासाठी तो आनंदाचा ठेवाच असतो. दुसरा एखादा वाद्य वाजवण्यात, तर कोणी नृत्यात असाच रमून जातो. तोच त्याचा आनंद ठरतो. तर कोणी ऑफिसच्या कामात जीव लावलो. कोणी कथा लिहितो तर कोणी घर नीटनेटके ठेवतो. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या विषयात, वेगवेगळ्या ठिकाणी पण आनंद तोच. मिळवण्याची पद्धत वेगळी असते. पोटापाण्यासाठी काहीवेळा मिळेल ते काम करावे लागते पण तेच तत्परतेने केले तर आनंद. दिरंगाई केली, कशाला उद्या पाहू, अशी उडवा उडवी कधी समाधान देत नाही. काही लोक नोकरी सांभाळून संध्याकाळी अंध लोकांना, गरजूंना मदत करण्याचे, सेवाभावे वृद्धसेवा करण्याचे, रुग्णसेवेचे काम तसेच मंदिर सेवा मनापासून करतात. तेव्हा दोघांनाही सारखाच आनंद होतो, करणारा आणि ज्याची करतो त्याला म्हणजे आनंद द्विगुणीत होतो.
जेथे माणूस स्वतःचे अस्तित्व विसरून रमतो. देहाचे दुःख, सुख विसरतो तोच आनंदी होऊ शकतो. आनंद म्हणजे पूर्ण समाधान, तृप्ती. तो पैशाने विकत घेता येत नाही. वाटता मात्र येतो. तेव्हा भूतकाळाचा शोक आणि भविष्याची चिंता विसरून वर्तमानाचा आनंद लूटावा. समर्थ रामदास म्हणतात,
संत आनंदाचे स्थळ l संत सुखची केवळ l नाना संतोषाचे मूळ l ते हे संत ll
(दा. १/५/१६)
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





