सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ कोठे शोधू… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
(वृत्त – पतितपावन 8-8-8-2)
☆
रमून गेले कशी सहज मी नवीन संसारी
जशी विरघळे साखर दुधात तशी पडल्यावरी
*
वाटे ना मज परके कोणी मला ना सासरी
जुळली नाती अशी जशी की जन्मजन्मांतरी
*
दीर सासरे नणंद सासू गोकुळ भरलेले
येती जाती सगे सोयरे अंगण फुललेले
*
शेतीवाडी जमीन जुमला अमाप दुध दुभते
माणुसकीच्या आपुलकीच्या शब्दांना भरते
*
अडी नडीला येती सारे समजून आपुले
गावाकऱ्यांचे भांडण तंटे इथे किती सुटले
*
आता कोठे शोधू वाडा ती गाय वासरे
काळ बदलला गाव हरवला उडाली पाखरे
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




