कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २९८ – विजय साहित्य
☆ मला तुझ्यात शोध तू….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(वृत्त कलिंदनंदिनी.)
☆
चुकेन मी, तरी पुन्हा, वसेन माणसात मी
मला तुझ्यात शोध तू, दिसेन काळजात मी. . . . !
*
मनास सागणे नको, जपावयास गोडवा
हसून गोड बोल तू, फसेन आरशात मी. . . . !
*
उगाच फूल लाजले , तुला उन्हात पाहता
पहा जरा स्वतःकडे, असेन त्या फुलात मी . . . !
*
मनामनात होतसे , क्षणाक्षणात कालवा
हवेत थांब मोकळ्या , घुसेन कुंतलात मी. . . !
*
निघून दूर चालली, प्रवास दूरचा जरी
अबोल प्रीत छेड तू, शिरेन अंतरात मी
*
खुशाल वाट चाल तू, चुकू नको नव्या पथा
नसेन सोबतीस मी, बसेन आठवात मी. . . !
*
विशाल त्या पथावरी, जपून टाक पावले
नसेन मी तुझा जरी, उरेन आसवात मी. . . . !
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



