सुश्री ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– छकुला बालकृष्ण – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆
(वृत्त — पादाकुलक (८|८))
☆
शांत झोपला कान्हा बाई
डोक्याखाली++ हात घेतले
गोड गोजिऱ्या वदनावरती
मुग्ध मनोहर हास्य दाटले ||
*
काळ्या कुरळ्या कुंतलातुनी
मोरपीस हे साजिरे दिसे
कान्हाच्या या बालरुपाचे
प्रत्येकाला लागते पिसे ||
*
तलम रेशमी वसने लेई
बाजूबंद अन् करी मनगटी
शोभिवंत ते वदन साजिरे
ललाटावरी केशरी वटी ||
*
गोकुळ सारे बने कृष्णमय
वेड लावितो नटखट कान्हा
बालकृष्ण जरि डोळ्यापुढती
वाटे माझा छकुला तान्हा ||
*
कुंजवनीची सावळबाधा
मोहविते या अवघ्या जगता
ओवाळुनिया कुरवंडी मी
शरण जातसे त्या भगवंता ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





