मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “माझे राष्ट्र??”🇮🇳 ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
हे राष्ट्र राजकारण्यांचे? .. हे राष्ट्र माफियांचे?
तो चंद्र-सूर्य पाहे .. वेळावून मान पाहे ।।
*
कर्तव्यविहीन भूमी .. ही उपटसुंभियांची
रामायणे घडावी .. नित नवीन घोटाळ्यांची
हिमवंत पर्वताची .. फासात मान आहे
तो चंद्र-सूर्य पाहे, हळहळ नि करत राहे ।।
*
येथे परंपरांचा, तो त्याग नित्य आहे
लोकांस वगळुनीया, ही लोकशाही आहे
पायाविणा कळस हा, डगमगत रोज आहे
तो चंद्र-सूर्य पाहे, मनी खंत करत राहे ।।
*
शिवबा नि बुद्ध, गांधी .. पस्तावुनी की गेले
यासाठी वेचलेले .. आयुष्य व्यर्थ गेले
लाज-चाड आणि तत्व .. गाडून खुर्ची राहे
तो चंद्र-सूर्य पाहे .. मनी दु:खी होत राहे ।।
*
येथे न खंत मुळीही .. कुठल्या पराभवाची
कोळून लाज प्यावी .. चव जणू ती अमृताची
माघार घेई कृष्ण .. ऐकण्या न कुणी राहे
तो चंद्र-सूर्य पाहे .. असहाय्य बघत राहे ।।
*
.. .. वाली न कोणी उरला .. ना काळजी कुणाला
हे राष्ट्र माझे आहे .. का पटत ना मनाला??
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

