श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “चायना हो या कोरिया… गणपती बाप्पा मोरया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
रे गाडीवाल्या वाईच जरा हळू चालव तुझो खटारो टेम्पो… माका मागे हौद्यात बसान धक्यावर धक्के बसता… हाडा किती खिळखिळी केलीस ता…आनि ते खड्डे इले तर बघान घे रे… ते ढोल ताशे चा पोरीबाळींंचा पथक खयं रव्हला… टेम्पो समोर वाजवूक नाय ता… सगळे आधी रिल करूच्या मागे असततं… नि गरजेच्या ऐनवेळेला भितूर पळत़त… रे गाडीवाल्या तुझ्या खटाऱ्या टेम्पोच्या टपावरची ती ताडपत्री मात्र तड तड ताश्यासारखीच वाजान रव्हली रे… तुझ्या त्या टेम्पो बसलो त्यावेळे पासान माझे हे सुपासारखे कान पन किटले रे… पाऊस यंदा बरो पडलेला दिसता… तेवाच रस्त्याच्या दोन्ही बाजूक कसो हिरवळीचा तोरण बांधलेला दिसता… रे काय रे तुझ्या गाववालांका यंदाच्या वर्षी फुरसा चावला कि काय केव्हढी मोठी माझी मुर्ती हाणलयनं… तेव्हढो मोठो मंडप बांधलेला असा ना रे… मी सपनात पन बघूक नाय कि माझी एव्हढी मोठी अगडबंब मुर्ती तुमी बनविशाल म्हणून…अरे मूर्ती लहान असा दे नाय तर मोठी गणपती तर तेव्हढाच असता.. मगे कित्याक असलो अट्टाहास ता.. विसर्जनाच्या वेळी किती पंचायत व्हता.. आनि ता रव्हलाच… ता मंडपात लाईटींग कसो झकपक असाना रे… ता काय ता डी. जे. फि. जे लावा नका रे.. तुमचे नाय तर माझे कान किटान जाता… लोगा काय गार्हाणा घालतंत ता ऐकू येना नायं.. मंगे मी त्येंका पावयचा कसा… अरे किती महाप्रसाद घालतत नि हे हार नारळ नि उदबत्त्याचो धूर करतत त्याचा प्रदूषण होऊन माका खोकलो येता…ता अनंत चतुर्दशीला जवा देव लोकात मी परत जातयं ना तर माका एकविस दिवस क्वारंटाईन करतंत…का तर मी थयसून कसलो ना कसलो व्हायरल इन्फेक्शन नक्कीच हाणला असणार आनि त्याची लागण सगळ्या देवलोकास व्हतली म्हणून खबरदारी घेततं..आनि दुसरा मागच्या वरसापर्यंत तुम्ही सगळोच भेसळीचा नैवेद्य दाखवत व्हते त्याची माझ्या या पोटाला चांगलीच सवय झाली व्हती पण या वर्षी तुमका काय इपरीत बुद्धी झाली कळंना नाय तो बिना भेसळीचा नैवैद्य घश्याखाली उतरा नाय ता…मंगे मी निम्माहून उपाशीच रव्हलो…काय करतलो….तुम्ही मातर माका छप्पन भोग दाखवून सोताचा तुडुंब पोटा भरून घेत रव्हले…ता सकाळ संध्याकाळ ती आरती तुम्ही करतत ता जरा पुस्तकातली नीट वाचून करा रे… कोनाक वंदना व्हयी तर कोनाक सजना.. फळीवर काय? कायेव बी पदरचा घालुन घसा फोडून आरती करतत… रे कानाक कसा वाटता ते… शांत सुरात चालीत दोनच आरती करा पन ता कानाक गोड लागाक व्हयी… तुमच्या भक्तीचा उदंड पीक दिसता माका… आता तर काय तालुक्याचा राजा म्हणून माका प्रसिद्धी दिलीय तुम्ही…चौसष्ट कलांचा अधिपती मी म्हणून माझ्यासमोर तुम्ही तुमच्यातली ता हिडीस कला माका दाखवू नका… आमच्या कडच्या रंभा उर्वशी नि मेनका या मदनाच्या अप्सरा पन आपली कलेची मानमर्यादा राखून इंद्र दरबारात नृत्याचे पदन्यास दाखवतात.. नटराजाला प्रसन्न करून घेततं.. नाहीतर तुमचा कोन तो नटराजन बाईलवेडा पिसाटल्या सारखा रूपये उधळत राहतो… चांगले कार्यक्रम काय तुमच्या लोकांना बघायला आवडूक नाय का… गाणं, प्रवचन, किर्तन, नाटक, चर्चा,परिसंवाद ह्या तुम्ही ऐकलेला पाहिलेला नसेल ना… जरा याची एकदा झलक बघून घ्या… ता तुमच्या कडेचा दशावतार, दह्यकालो, सोंगाचा, भारूड ह्या तर कुठे रद्दी टाकलान तुम्ही… माका तसला आवडता रे… ता तुम्ही एक टाईम करा रे… गावातले कलाकार जरा प्रकाशात आले तर त्येंचा नशिब का नाही फळायचा…
… आला का रे गावाचा मंडप.. बराच लांबचा प्रवास झाला म्हणायचा.. तरी बरा आतल्या रस्याने आणलंस ता हायवेवर नं आलो असता तर ट्रफीक मधेच अडकान गेलो असतो… मग या वर्षी ची काय चतुर्थी मिळाली नसती पुढच्या चतुर्थी पर्यंत पोहचलो असतो कि नाय कोणास ठावं… ते कोकणातले रस्ते खड्डे मुक्त बांधायची बुद्धी तर मी कंत्राटदारांना कधीची दिली होती.. पण त्येंच्या बुद्धीत स्वार्थाचा नि भ्रष्टाचाराचा कलीचा व्हायरस पुढे मी मात्र शरण गेलो बाबानु… आता त्येच्यावर एकच उपाय असा आमच्या पिताजीनी म्हणजे महादेवानी तांडवनृत्य करान तिसरो डोळो उघडान त्या रस्त्या बांधणाऱ्या सगळ्या ठेकेदारांका भस्मिभूत करून टाकतले तेव्हा कुठे पुढे भविष्यात रस्त्याची समस्या संपून जाईल… तोवर तुझो नि माझो ह्यो वनवास सुटना नाय…
चल आता लेझीम वाले आणि ढोल ताशे वाले वाजाक लागलेले दिसता… हळूहळू आता मंडपाजवळ घेऊन जाशील रे माका… हि सर्विस मनापासून दिल्याबद्दल तुका पुढच्या चतुर्थी पर्यंत आनि दोन चार टेम्पो मालकीचे होतील असा आर्शिवाद देतयं… नि माका विसर्जनाच्या वेळी तूच येशील रे बाबा… आता पहिल्या दिवशी आपली चांगली दोस्ती कशी जमान गेली हा…आणि माका कसा न्यायचा याची तुका आयडिया असा.. तेवा तेव्हढा कर माझ्यासाठी…. तुझो मी चांगला भला करतलो… ता जुन्या जमान्यातील घासून गुळगुळीत झालेली गणपती बाप्पा मोरया घोषणा करू नका.. तर ता डिजिटल जमान्यातील
चायना हो या कोरिया… गणपती बाप्पा मोरया ह्या नवी गर्जना व्हयी…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






