श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “फोन बुक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
मोबाईल आले आणि फोन बुक नावाचे नविन काहीतरी समजले. आज पर्यंत इतरांनी लिहीलेले आम्ही वाचले. पण फोन बुकमध्ये आम्हीच लिहितो आणि गरज पडेल तसे आम्हीच वाचतो.
फोन बुकचे एक बरे असते, आपणच हवं ते नांव निवडतो आणि सेव्ह करतो. वारंवार ते बदलता देखील येते. आपल्या शाळेच्या दाखल्यासारखे ते कायम नसते.
फार फार वर्षांपूर्वीचे असे नाही, पण काही वर्षांपूर्वी जवळपास प्रत्येकाजवळ आणि प्रत्येक घरात (घरी फोन नसला तरीही) एक डायरी असायची. यात महत्वाचे फोन नंबर नावासह लिहिलेले असायचे. अशी एक छोटी डायरी खिशात देखील असे. हा लॅंडलाईन फोनचा जमाना होता.
नंतर काळ झपाट्याने बदलला, आणि मोबाईल फोन आला. या फोनमध्येच नांव लिहून ठेवण्याची सोय झाली. मग काय? माझे फोन बुक अस्तित्वात आले.
हिटलर माझी आई, वय वर्षे ८५. तिला देखील मोबाईल आला. तिला मोबाईलवरुन फोन करता येत नाही, पण आलेला घेता येतो. आता वयोमानानुसार तिला कमी ऐकू येते. काही गोष्टीत तिचा हट्ट असतो, तर काहीत मी सांगते म्हणून अशी हुकूमशाही. म्हणून तीचे नांव मी हिटलर असे सेव्ह केले आहे.
आता आईला देखील मोबाईल आला म्हटल्यावर बायको, मुले, भाऊ यांच्याजवळ देखील मोबाईल असणार हे ओघाने आलेच.
मुलांचे नंबर मी मागणी पुरवणी नंबर १ आणि मागणी पुरवणी नंबर २ असे सेव्ह केले आहेत. याचे कारण मी कितीतरी वेळा कितीतरी कारणांनी त्यांना फोन केले असतील. पण त्यांना काही हवे असल्यास त्यांचा मला फोन येतो, एरवी कमी. त्यांचे बजेट मंजूर झाल्यावर देखील ही मागणी जास्तीची (आणि त्यांच्या दृष्टीने रास्त असते.) असल्याने त्यांची नांवे मागणी पुरवणी अशी सेव्ह केली.
आता नंबर बायकोच्या फोनचा. तिचा स्वतःचा एक आणि ऑफिसने दिलेला एक, असे दोन नंबर तिचे आहेत.
फोन बुकमध्ये तिचे नांव मी बऱ्याचदा बदलले आहे. आपण तिला नाही तर किमान नावाला बदलवू शकतो याचे समाधान. (तिचेही माझ्या बद्दल हेच मत असेल याची खात्री आहे.)
आमच्या लग्नाचा वेळी मोबाईल नव्हते. नाहितर तिचे नांव लग्नाआधी राणी लग्ना नंतर महाराणी, आणि खूssssssप नंतर गा-हाणी किंवा संतवाणी असे कदाचीत सेव्ह केले असते.
सध्या तिचे नांव मी आकाशवाणी आणि वन वे असे सेव्ह केले आहे.
रेडिओ लावला तर आपल्याला त्यावर काय सुरू असेल ते आणि तेच ऐकावे लागते. आपल्याला आपले मत बोलून लगेच सांगता येत नाही. तसेच हिचा फोन आला किंवा आपण लावला तरी अगोदर ऐकावेच लागते. अगदी आपण फोन केला तरी, बरे झाले, तुमचा फोन आला. आत्ता तुम्हालाच फोन लावत होते. या वाक्यानेच सुरुवात होते. आपले सगळे ऐकून म्हणजे तिचे सांगून झाल्यावर (तिच्या लक्षात आले तर……..) ती विचारते…… हां…… फोन कशासाठी केला होता…….
आकाशवाणीचा कार्यक्रम आवडला नाही तर, निदान रेडिओ बंद तरी करता येतो. पण आपण फोन बंद केला तर तिकडून परत फोन येतो(च), आणि कार्यक्रमाचा उर्वरित भाग (माझी आवड) या सदराखाली ऐकावा लागतो.
आता तिचा दुसरा नंबर कोणत्या नावाने सेव्ह करावा? हा प्रश्न होता. (बायको असे म्हटले तरी पुरुषांना विनाकारण काही प्रश्न पडतात, तसाच हा प्रकार……) तो प्रश्न मी एकेरी वाहतूक या वाहतूक नियमांच्या फलकावरुन वन वे असा सेव्ह करून सोडवला. कारण परत तेच……. एकेरी वाहतूक या रस्त्यावर एकाच दिशेने जाता येते तसेच या फोनवर देखील फक्त ऐकावे लागते. बोलण्याची संधी कमीच…… एकेरी वाहतूक याचा अर्थ मला रस्त्यापेक्षा जास्त इथे समजला.
आता काही भावांचे आपसात पटते, किंवा काही वेळा पटत नाही. पण आमचे पटते आणि सगळ्या गोष्टीत त्याला माझ्या पेक्षा जास्त इंटरेस्ट असतो. थोडक्यात तो खाणेपिणे, गाणे यातला दर्दी आहे, आणि या गोष्टी करायची त्याला घाई म्हणजेच गर्दी असते. म्हणून भाऊगर्दी या वरुन मी त्याचे नांव भाऊदर्दी असे सेव्ह केले आहे.
बहिणीला फोन झाला की गप्पांमध्ये घरचा विषय निघतोच, त्यावर ती, आई काय करणार? तिचं वय झालंय, तिचं बरोबर आहे. माझ्या बद्दल बोलताना तज असं का केलंस? बायको बद्दल बोलतांना तिचं काय चुकले? असे आपल्यालाच प्रश्न करत आपले म्हणणे खोडून काढते……… म्हणून तिचे नांव खोडरबर म्हणून सेव्ह केले आहे. तिच्याशी बोलताना, बोलतोय का प्रश्नपत्रिका सोडवतोय तेच समजत नाही.
एक बहिण परदेशात असते. तिथल्या परिस्थिती बद्दल बोलतांना ती भरभरून बोलते. पण आपलं म्हणणं ऐकताना आपण जे काही भरभरून बोलत असू त्यामुळे तिला भडभडून येत असावे. पण फोनच्या माध्यमातून आम्ही सांस्कृतिक देवाणघेवाण करतो आणि परदेशाशी चांगले संबंध ठेवतो. तिचे नांव मी फाॅरेन एक्सचेंज असे सेव्ह केले आहे.
आता आपला भाऊ तसेच बायकोचे देखील भाऊ आहेतच नां…….. आता तिच्या मोठ्या भावाचा फोन आला तर घ्यावाच लागतो. कारण कौटुंबीक घडामोडी त्याच्याकडून समजतातच. पण इतरही अनेक गमतीजमती असतात. तो फोन घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण कामात असलो तर तिच्या लहान भावाला मी थोड्यावेळाने करतो, असे सांगता येते. म्हणून मोठ्या भावाचा जंतरमंतर तर लहान भावाचा मध्यंतर म्हणून सेव्ह केले आहेत. दोनच भाऊ आहेत. तिसरा असता तर कदाचित त्यांच्या वागण्यानुसार गत्यंतर किंवा अवांतर असे म्हणून सेव्ह केला असता.
तशीच मित्रांची देखील आहेत. सगळीच सांगत नाही, वकील मित्राचा मिलाॅर्ड. डाॅक्टर मित्राचा जेवणानंतर, जेवणाअगोदर. व्यापारी मित्राचा आज रोख, कल उधार असे आहेत. पण काही मित्रांचे फोन नंबर मी संध्याकाळी ७ नंतर, गार… व्हा, आकाशी झेप घे, द्राक्षासव असे सेव्ह केले आहेत. अशा नावांच्या स्पष्टीकरणांची गरज नसावी. कारण यांच्याशी भेट झाल्यावर नंतर स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न होतो. (सुज्ञास सांगणे नलगे)
आता घरातील मंडळींनी देखील फोन नंबर सेव्ह केले असतीलच. तर मुलीने मुलाचा (तिच्या भावाचा) इडियट. तर मुलाने मुलीचा (त्याच्या बहिणीचा) कटकट म्हणून सेव्ह केल्याचे समजले.
मी सहज सगळ्यांना विचारले. काय, तुम्ही माझा नंबर काय म्हणून सेव्ह केला आहे.
सगळ्यांनी एकदम आणि एका स्वरात उत्तर दिले आश्वासन…
काय करणार… मी माझ्या मोबाइलवर सेव्ह केलेली नांवे बदलायला घेतली, आणि त्यांच्या खऱ्या नावाने नंबर सेव्ह केले…
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





