श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “काकूंचा गणपती…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
तब्बल दहा वर्षांनी गणपतीसाठी सहकुटुंब भारतात आलो.घरचे बाप्पा विराजमान झाल्यावर आईसोबत गप्पा मारताना वाड्यातल्या गणपतीचा विषय निघाला.तेव्हा वाड्यात जायची इच्छा झाली.तिथं पोचलो तर खूप सारं बदललेलं.वाड्यांच्या जागी बिल्डिंग झालेल्या तरी दोनचार वाडे जुन्या काळाची साक्ष देत उभे होते. आम्ही रहायचो त्या वाड्याच्या जागी झालेल्या बिल्डिंगकडे पाहताना खूप साऱ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या.इतक्यात समोरून साठीपार केलेल्या बाई गणपती घेऊन येताना दिसल्या.कोणीही सोबत नव्हतं.वयानुसार फरक झाला असला तरी मी प्रमीलाकाकूंना ओळखलं.हाक मारल्यावर काकू थांबल्या.
“गणपती बाप्पा मोरया!!”मी उत्साहानं म्हणालो
“मोरया,आपण??”ओळख सांगितल्यावर काकू एकदम खूष.आग्रहानं घरी घेऊन गेल्या.पंधरा बाय वीस फुटांची खोली होती.“अजूनही एकटीचं गणपती मंडळ चालूयं.”
“अध्यक्ष आणि कार्यकर्ती मीच.शक्य आहे तोपर्यंत चालवायचं.नंतरचं माहीत नाही.तुला तर माझा स्वभाव माहितीये.तुसडी म्हणून फेमस आहे.जरा जास्तच स्पष्ट बोलते.प्रत्येकाशी भांडलेय.लोक अंतर ठेवून वागतात.जास्त नादी लागत नाही.कोणी येत पण नाही ”
“आता उतरत्या वयात एकटेपणाचा त्रास होत असेलच”
“कसला त्रास उलट आयुष्यभर तोच सोबतीला राहिलाय”काकू भकास हसल्या.
“असं का बोलता.बहिणी आहेत की..”
“नावापुरती असलेली रक्ताची नाती म्हणजे अवघड जागेची दुखणी.सहन होत नाही अन सांगता येत नाही.”
“मूर्ती छान आहे”मी मुद्दाम विषय बदलला.
“आवडली ना.आई-वडील गेले.बहिणी संसारात रमल्या.नशिबात लग्नाचा योग नसल्यानं मी एकटी राहिले.तेव्हापासून वडिलांची गणपती सेवेची परंपरा चालवतेय.”
“वाडा जाऊन बिल्डिंग आली तरी तुम्ही मात्र तशाच आहात.”
“आणि शेवटपर्यंत अशीच राहणार.जी काही जमापुंजी आहे त्यात छान चाललंय.”
“तरीपण सोबत पाहिजे ना”
“आता दहा दिवस साक्षात गणपती सोबतीला आहेत.अजून काय पाहिजे.इतरवेळी नाही पण गणपतीत माझं दार सर्वांसाठी खुलं असतं.संध्याकाळची आरती तर मुलांच्या हस्तेच आणि रोज वेगवेगळा प्रसाद असतो.”
“हो.आठवतंय.लहानपणी मीसुद्धा दोनदा आरती केलीय.”
“पूर्वी वाड्यातली मुलं करायची आता बिल्डिंगमधली मुलं करतात.”
“तुमची गणपतीवर खूप श्रद्धा आहे.”
“तोच माझा एकमेव आधार.हा एकच पाहुणा नियमितपणे माझ्याकडं येतो.दहा दिवसाच्या मुक्कामात वर्षभराची ऊर्जा देतो.आमच्यात खूप गप्पा होतात म्हणजे मी बोलते आणि बाप्पा ऐकतात.मन मोकळं केल्यानं छान वाटतं.”
“नातेवाईक जाऊ दया.तुम्हांला मैत्रिणसुद्धा नाही.”
“खरं सांगू,आलेल्या वाईट अनुभवांमुळे कोणावरच विश्वास राहिला नाही.बहीणींनी फसवलं आणि वडिलांची प्रॉपर्टी आपसात वाटून घेतली अन हे घर मला दिलं.त्यालाही वारस म्हणून स्वतःचीच नाव लावली.मतलबी माणसांपेक्षा एकटेपणा बरा.”काकू बोलायच्या थांबल्या.मलाही काय बोलावं असा प्रश्न पडलेला.काहीवेळ शांतता होती. काकू म्हणाल्या “आवर्जून भेटलास,
बोललास खूप बरं वाटलं.शक्य झालं तर आरतीला ये” मी नकार देऊ शकलो नाही.नमस्कार करून निघालो.जाताना वळून पाहिलं तर तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पाहणाऱ्या काकूंचा चेहरा निर्वीकार होता पण डोळे मात्र पाणावलेले.
“पाऊस” एकच पण प्रत्येकासोबत त्याचं नातं वेगवेगळं असतं – गणपतीचं बाप्पांचं सुद्धा तसंच !!
मंगलमूर्ती मोरया
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







वाह, सुंदर अनुभव!