उज्ज्वला केळकर

??

☆ तुमचा फिल्टर गेलाय का?… लेखिका : संध्या घोलप ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

 – – तुम्हीच तपासा.

नुकतीच घडलेली घटना आहे. एका परिचितांनी रस्त्यात थांबवून मला विचारलं, “तुमच्या नवऱ्याची केमिकलची फॅक्टरी आहे म्हणे? ” मी म्हटलं, “हो. “

“मग आता कोण चालवतं? “

“माझा मुलगा”

“तो केमिकल इंजिनियर आहे? “

“हो”

“तुम्हाला सांगू का? केमिकल ही सगळ्यात फालतु ब्रँच समजली जाते! आमच्यावेळी मेकॅनिकलला सगळ्यात जास्त भाव असायचा. तिकडे ॲडमिशन नाही मिळाली, तर मुलं केमिकलला जायची”

मी म्हटलं, “बरं” आणि हसून तिथून निघाले. मनात म्हटलं, फिल्टर गेलाय यांचा!

माझ्या डॉक्टर भाच्याचे शब्द आठवले. त्याने मला एकदा सांगितलं होतं की वय वाढलं की माणसाचा फिल्टर जातो!

फिल्टर जाणे किंवा नसणे म्हणजे वय झाल्यावर, आपल्या बोलण्यावर, विचारांवर किंवा वागण्यावर नियंत्रण न राहणे! असं बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींच्या वागण्यात दिसून येतं. समोरच्या माणसाच्या मनस्थितीचा विचार न करता, स्वतःला वाटेल ते बोलून टाकायचं! जर आपण त्यांना त्यांची चूक दाखवून दिली तर ते म्हणतात की मी आता कोणाला घाबरत नाही! माझं मत मांडतो. काही वेळेला तर “मी असं बोललोच नाही” असंही ते म्हणतात.

का? कशासाठी दुसऱ्याला दुखवायचं? मीच कसा बरोबर आहे किंवा मलाच कसा जास्त अनुभव आहे, हे सांगत बसायचं? यावर माझा भाचा म्हणाला की आपण असे वागतो आहे हेच या लोकांना समजत नाही म्हणूनच ‘फिल्टर गेला आहे’ असं म्हणतात. उतार वयात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांचा हा परिणाम असतो. यात मनात जे काही आलेलं असतं, ते विचार न करता थेट बोलून टाकलं जातं. राग वाढलेला असतो. दुसऱ्याचं बोलणं ऐकून न घेता, आपणच सतत बोलत बसणं हा बदलही दिसून येतो. ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुप मध्ये एकतरी व्यक्ती अशी दिसते की ती इतरांपेक्षा जास्त किंवा सतत बोलत असते. आणि एखादा विषय सुरू केला की गाडी कुठल्या विषयाकडे जाईल ते सांगता येत नाही. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं, अशी एक धारणा या वयात झालेली असते. त्यामुळे राजकारणाकडून सुरू झालेली गाडी, किडनी स्टोन पर्यंत कधी येऊन पोहोचते ते त्यांनाही समजत नाही!

आमच्याकडे एक आजोबा, आजूबाजूला माणसं दिसली की बोलायला सुरुवात करतात. तुम्ही ऐका, नका ऐकू, उत्तर द्या, नका देऊ! त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे ते काही मानसिक रोगी नसतात. कोणत्याही विषयावर “चर्चा” करायची आणि त्यात माझच कसं बरोबर हे पटवून द्यायचा प्रयत्न करायचा! हे ही फिल्टर गेल्याचं लक्षण आहे.

वय खूप वाढलेलं असेल तर त्या व्यक्तीला हे कळत नसेलही. पण जेव्हा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असता आणि “अती ज्येष्ठ” वर्गात गेलेले नसता, तेव्हा तुम्हाला हे नक्कीच समजत असतं. त्याच वेळेला, आपल्या वागण्यावर किंवा बोलण्यावर ताबा ठेवायचा प्रयत्न केला तर अती ज्येष्ठ वर्गात गेल्यावरही फिल्टर जात नाही. यात अर्थातच डिमेन्शिया सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंटना धरता येत नाही.

एक सहज गंमत आठवली. जवळची घटना आहे. एका सुनेने सासूला विचारलं की गाजर हलवा कसा झाला आहे? सून सुगरण आणि ज्येष्ठ नागरिक, सासू अती ज्येष्ठ!

सासू म्हणाली, ” चांगला कसा होणार? डाएट म्हणून तुम्ही साखर कमी घालणार, खवा वापरणारच नाही! केशर नाही, वेलदोडा कमी! मग काय चव येणार? ” आपले टेस्ट बड्स सुद्धा गेले आहेत हे सासूने मान्य केलेलं नाही. आणि ते मान्य न करता, सुनेला दुखावलं! काय मिळालं? सुनेनी परत कधीही पदार्थ कसा झाला आहे हे विचारलं नाही. निदान आपण ज्या व्यक्तीवर शारीरिक दृष्ट्या अवलंबून आहोत त्यांना दुखावू नये एवढा फिल्टर पण राहत नाही.

एक वयस्कर बाई (मी वयस्करच आहे. पण त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या! ) एका “लेडीज ओन्ली” ट्रीपला आल्या होत्या. वयाचा आधार घेऊन त्या सगळ्यांना सतत धारेवर धरत होत्या. त्या टूर मॅनेजरला तर त्यांनी वेठीस धरलं होतं. बसमध्ये मी मला हवं तिथेच बसणार, मला सांभाळायचं तुझंच काम आहे, माझं सामान उचल, मला तुझा “हॉटस्पॉट” दे, इतर बायकांना हे काय घातलय, तिथे कशाला बसलात असं करून भंडावून सोडलं होतं. शेवटी मी सगळ्या मैत्रिणींना “फिल्टर जाणे” म्हणजे काय ते सांगितलं आणि तो त्यांचा परवलीचा शब्द झाला. आजी दिसल्या की त्या एकमेकांना सांगायच्या, “पळा पळा, फिल्टर आला! “

थोडक्यात काय तर सामाजिक शिष्टाचार सुद्धा विसरले जातात.

आपला फिल्टर आपल्या ताब्यात ठेवणं आपल्याच हातात आहे. आम्ही मैत्रिणी एकमेकांना सांगत असतो, “माझा फिल्टर गेला असं वाटलं तर मला सांग बरं का! “

तुमचा फिल्टर तुमच्या ताब्यात आहे का? तुम्हीच तपासा.

 

लेखिका : संध्या घोलप

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted