शुभा रूद्र
विविधा
☆ एकल पालकत्व आणि चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होणारी बालमनं… ☆ शुभा रूद्र ☆
☆
एकल पालकत्व
आणि
चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होणारी बालमनं
शाळेतील नोकरीच्या काळात एकल पालकत्वाचे वास्तव मला फार जवळून अनुभवता आले.
एक चित्रकला शिक्षिका म्हणून मी नेहमीच विद्यार्थ्यांना चित्र आणि रंगांच्या माध्यमातून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले. निबंध कोणीही वाचू शकते, पण मुलांच्या रंगरेषांमागील खरा अर्थ आणि त्यांच्या मनातील भावना फक्त मलाच वाचता येतात, असा विश्वास मी त्यांच्यात निर्माण केला.
या प्रक्रियेत मुलांच्या जगण्यातील संघर्ष आणि त्यांची अस्वस्थता माझ्यासमोर उघडी पडली.
एकदा मुलांना ‘घर’ हा विषय दिला असताना, पाचवीतल्या एका मुलाने काढलेले चित्र अत्यंत बोलके होते. त्याने घराचे चित्र खूप लहान काढले होते आणि त्याला कुलूप मात्र अफाट मोठे दाखवले होते. चौकशी केल्यानंतर समजले की त्याची आई रंगाच्या दुकानात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत काम करते. ती रात्री उशिरा घरी परतते, तोपर्यंत पाचवीतले ते मूल आपल्या दप्तरावरच डोकं ठेवून झोपी गेलेले असते. या एका चित्राने त्या बालमनावरील एकाकीपणाची आणि आईच्या विरहाची भीषण जाणीव करून दिली.
दुसऱ्या एका प्रसंगी, स्लम एरियात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला शेजारच्या मुलाने सिगरेट आणण्यासाठी पाठवले होते. एकल पालकत्वामुळे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी ही मुले नकळत चुकीच्या मार्गाला लागतात किंवा कुणीही त्यांचा वापर करून घेतो. मी त्याला प्रेमाने समजवले की, “तुला ‘नाही’ म्हणायला शिकलं पाहिजे. अभ्यासाची वेळ आणि स्वतःचे भवितव्य महत्त्वाचे आहे. “
आठवीत शिकणारा आणखी एक मुलगा कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांनी हाकलून दिल्याने झाडाखाली गुडघ्यात डोकं घालून बसल्याचे चित्र काढला होता. अशा वेळी रागीट पालकांचे धोरण त्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते.
कला हे मन मोकळे करण्याचे आणि व्यक्त होण्याचे अत्यंत सुंदर माध्यम आहे. मुले या माध्यमातून निःसंकोच बोलतात. या सगळ्या अनुभवातून मला प्रकर्षाने वाटते की, मुलांमध्ये योग्य संस्कार रुजवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी आधी ‘पालक शाळा’ घेणे गरजेचे आहे, जेणेकरून पालकांना मुलांचे वयानुसार बदलणारे विश्व समजून घेणे सोपे होईल.
☆
© शुभा रूद्र
मो. 9657189569
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





