उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ मदत आणि सहकार्याची सूक्ष्म सीमारेषा – लेखक : अनिल उदावंत ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆
अलीकडेच पोलीसात भरती झालेल्या एका गिऱ्हाईकाची कटिंग सुरू होती, ते गिऱ्हाईक न्हाव्याच्या चांगल्या ओळखीतलं असावं. कटिंग करता करता न्हावी त्या गिऱ्हाईकाशी मनमोकळं बोलत होता. त्याला हिताच्या चार गोष्टी सांगत होता.
बोलता बोलता न्हावी म्हणाला, “हे बघ, तू आता पोलीसात आहेस. अनेक लोकं तुझ्याकडं मदत मागायला येतील. काहीजण तुझं सहकार्यही मागतील. पण तू हे कायम लक्षात ठेव. मदत सर्वांना करायची; पण एखाद्याला सहकार्य करताना मात्र खूप काळजी घ्यायची. उठसूठ कुणालाही सहकार्य करायचं नाही. अन्यथा एखाद्या दिवशी तू स्वतःच अडचणीत येशील! ”
न्हाव्याच्या या शब्दांनी मी चकित होऊन विचारात पडलो. मदत आणि सहकार्य हे दोन्ही शब्द आपल्या नेहमीच्या वापरातले. वरकरणी दोन्हींचा अर्थ जवळजवळ एकच वाटतो. मग त्या न्हाव्याने मदत आणि सहकार्य यांच्यात एवढा फरक का केला असेल?
मदत आणि सहकार्य हे दोन वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत का? आणि असतील, तर त्यांच्यात नेमका फरक काय आहे? हा फरक नव्यानं समजून घेण्याची गरज आहे.
मदत आणि सहकार्य या दोन्ही संकल्पना परस्परावलंबन, सामाजिक संवेदनशीलता आणि सामूहिक जीवन यांवर आधारलेल्या आहेत. मदत ही प्रामुख्याने एखाद्याच्या गरजेच्या वेळी दिलेला आधार असतो, तर सहकार्य हे एखाद्या समान उद्दिष्टासाठी केलेले सक्रिय सहभागाचे काम असते.
मदत म्हणजे अडचणीत असलेल्या व्यक्तीला त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हात देणे, आधार देणे किंवा तिची गरज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे. ही मदत भावनिक, आर्थिक, शारीरिक किंवा वैचारिक स्वरूपाची असू शकते. एखाद्या शेजाऱ्याच्या आजारपणात औषध आणून देणे, संकटात असलेल्या कुटुंबाला अन्न देणे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाच्या नोट्स देणे ही मदत होय.
सहकार्य मात्र त्यापेक्षा वेगळे आहे. दोन किंवा अधिक व्यक्तींनी एखादे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येणे, जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि आपल्या सामर्थ्याचा एकत्रित उपयोग करणे म्हणजे सहकार्य.
उदाहरणार्थ, गावातील एखाद्या कुटुंबावर संकट आले असता शेजाऱ्यांनी त्यांना जेवण देणे, औषध आणून देणे किंवा आर्थिक आधार देणे ही मदत. पण त्याच गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करण्यासाठी, विहीर साफ करण्यासाठी, रस्ता दुरुस्त करण्यासाठी किंवा दूध-संकलनाची व्यवस्था उभी करण्यासाठी एकत्र काम करणे हे सहकार्य.
म्हणून साध्या शब्दांत सांगायचे तर, मदत म्हणजे दुसऱ्याच्या अडचणीत आपण दिलेला हात; तर सहकार्य म्हणजे एखाद्या कामात आपण दिलेला हातभार. दोन्हीमध्ये दुसऱ्याच्या गरजेकडे लक्ष देणे हा समान धागा आहे. दोन्हीमुळे आपुलकी, विश्वास, सलोखा आणि माणुसकी वाढते. मात्र मदत अनेकदा तात्कालिक असते; सहकार्यामध्ये सहभाग, समन्वय आणि जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याचे जीवन एकाकी नसून कुटुंब, समाज, संस्था आणि राष्ट्र यांच्या सहवासात घडत असते. त्यामुळे सहानुभूती, परस्परावलंबन, सुरक्षिततेची गरज आणि समूहात जगण्याची प्रवृत्ती यांमधून मदत आणि सहकार्य या दोन्ही वृत्ती विकसित होतात.
मदत माणसाला संकटातून सावरण्यासाठी आधार देते; सहकार्य सामूहिक प्रगतीचा मार्ग मोकळा करते. सहकार्यामुळे सामाजिक ऐक्य, समस्या-निवारण, आर्थिक स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि सामाजिक जबाबदारी वाढते. म्हणूनच व्यक्ती, कुटुंब, गाव आणि राष्ट्र या सर्व स्तरांवर या दोन्ही मूल्यांची गरज आहे.
मदत करण्यामागे काही मानसशास्त्रीय प्रेरणा असतात. दुसऱ्याचे दुःख पाहून निर्माण होणारी सहानुभूती, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये, कर्तव्यभावना आणि संस्कार यांमुळे माणूस मदतीसाठी पुढे येतो. काही वेळा मात्र स्तुती, सामाजिक मान्यता, अपराधीपणापासून सुटका किंवा भविष्यात आपल्यालाही मदत मिळेल अशी अपेक्षा यांसारख्या प्रेरणाही त्यामागे असू शकतात.
म्हणून प्रत्येक मदत पूर्णपणे निःस्वार्थ असेलच असे नाही.
मानसशास्त्रात मदत करणाऱ्या वर्तनाला व्यापकपणे ‘समाजाभिमुख वर्तन’ म्हटले जाते; त्याच्या अधिक निःस्वार्थ स्वरूपाला परोपकारी वर्तन म्हटले येते. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी—मदत म्हणजे काहीही करून, कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याच्या पाठीशी उभे राहणे नव्हे. जसं की, एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला त्याच्या व्यसनासाठी पैसे देणे ही मदत नव्हे.
एखाद्याच्या चुकीच्या कृत्यावर पांघरूण घालणे ही माणुसकी नव्हे. एखाद्याला अडचणीतून बाहेर काढताना आपण त्याला पुढच्या अडचणीत ढकलत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. याच ठिकाणी मदत आणि सहकार्य यांच्यातील सूक्ष्म सीमारेषा अधिक स्पष्ट होते.
सहकार्याची संकल्पना दुधारी आहे. ‘सहकार्य’ हा शब्द ऐकला की आपल्या मनात लगेच चांगल्या गोष्टींचीच प्रतिमा तयार होते. पण प्रत्येक सहकार्य सकारात्मक असेलच असे नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी एकत्र येणे हे सकारात्मक सहकार्य; तर चुकीच्या किंवा गुन्हेगारी कामात कळत-नकळत, संपूर्ण किंवा अंशतः सहभागी होणे हे नकारात्मक सहकार्य असते.
उदाहरणार्थ, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे हे सकारात्मक सहकार्य आहे. पण एखाद्याने केलेले गैरकृत्य लपवण्यासाठी काही लोकांनी एकत्र येणे हेही एका अर्थाने सहकार्यच आहे; मात्र ते नकारात्मक आणि समाजघातक सहकार्य आहे.
म्हणून सहकार्य करताना केवळ ‘आपण कोणाला सहकार्य करतो आहोत? ’ एवढाच प्रश्न पुरेसा नाही. त्याबरोबर ‘आपण नेमक्या कशाला सहकार्य करतो आहोत? ’ हा प्रश्नही विचारला पाहिजे.
एखाद्या व्यक्तीशी सहकार्य करणे आणि त्या व्यक्तीच्या चुकीच्या कृतीशी सहकार्य करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
आता लेखाच्या सुरुवातीला आलेल्या न्हाव्याच्या बोलण्याचा अर्थ आपल्याला सहज लक्षात येतो. पोलीसाच्या नोकरीत असलेल्या त्या तरुणाकडे अनेक लोक मदतीसाठी येतील. कुणाला हरवलेली कागदपत्रे मिळवून देण्यासाठी मदत हवी असेल, कुणाला कायदेशीर मार्गदर्शन हवे असेल, कुणाला संकटाच्या वेळी आधार हवा असेल. अशा वेळी मदतीचा हात देणे हे त्याचे कर्तव्यच आहे.
पण एखादा माणूस त्याच्याकडे एखादे चुकीचे काम करून देण्यासाठी, नियम बाजूला सारण्यासाठी, पुरावा लपवण्यासाठी किंवा एखाद्याला अन्यायाने वाचवण्यासाठी सहकार्य मागत असेल, तर तेथे त्याने थांबले पाहिजे. कारण माणसाला मदत करणे आणि चुकीच्या कृतीला मदत करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसंच, माणसाशी सहकार्य करणे आणि त्याच्या गैरकृत्याशी सहकार्य करणे यांतही मूलभूत फरक आहे.
‘एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ’ असं म्हणत एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं जातं. ‘विना सहकार नाही उद्धार’ असं म्हणत सहकार्याची गरजही अधोरेखित केली जाते. या दोन्ही विचारांचा आशय सकारात्मक आहे. समाजहिताच्या, माणुसकीच्या आणि विकासाच्या कामासाठी एकत्र येण्याची प्रेरणा त्यातून मिळते. मात्र इथे एक गोष्ट आपण विसरता कामा नये—सहकार्य स्वतःमध्ये चांगले किंवा वाईट नसते; ज्या उद्दिष्टासाठी ते केले जाते, त्यावर त्याचे नैतिक मूल्य ठरते.
म्हणूनच, मदत माणसाला करावी; पण चुकीच्या कृतीला नाही.
सहकार्य माणसाशी करावे; पण अन्यायाशी नाही. कदाचित म्हणूनच त्या साध्या न्हाव्याला आपल्या पोलीस गिऱ्हाईकाला “मदत सर्वांना कर; पण सहकार्य करताना विचार कर! ” असं सांगावंसं वाटलं असेल.
न्हाव्याच्या त्या सहज बोललेल्या वाक्यात माणुसकीची अन् कर्तव्याची शिकवण होती. मदतीची दारे उघडी ठेवायची; पण विवेकाचे दार कधीच बंद करायचे नाही. आपण कुणाला मदत करतो आहोत? आणि कशाला सहकार्य करतो आहोत? या दोन प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधून माणुसकी आणि विवेक यांचा योग्य समतोल साधणं आवश्यक आहे. हेच त्याच्या बोलण्याचं खरं सार आहे आणि तेच अधिक महत्त्वाचं आहे.
☆
लेखक : अनिल वत्सला आत्माराम उदावंत
संग्रहिका / प्रस्तुती – उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





