श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “तुळशीबाग…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
लग्नाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सौंना स्पेशल गिफ्ट द्यायचं मनात होतं. नातेवाईक, मित्रमंडळी यांना बोलावून जंगी सेलिब्रेशन करायचं ठरवलं पण विनाकारण खर्च करण्यापेक्षा तेच पैसे मुलीच्या कॉलेजसाठी उपयोगी होतील. असं सौंच मत अर्थात मलाही ते पटलं तरीही तिला काय गिफ्ट दयावं हे समजत नव्हतं. साडी, दागिने, ट्रीप सगळ्यालाच तिनं नकार दिला.
“तुला नक्की काय गिफ्ट पाहिजे? ”मी विचारलं.
“चिडणार नसाल तर सांगते”
“नाही चिडणार. बोल”
“आपण तुळशीबागेत जाऊ. खूप दिवसात गेलो नाही. ”सौंच्या अत्यंत अनपेक्षित मागणीनं मी पार क्लीन बोल्ड. काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजलं नाही. म्हणून होकारार्थी मान डोलावली. दुसऱ्या दिवशी गर्दी आणि पार्किंग प्रॉब्लेमचा विचार करून रिक्षानं दुपारी तुळशीबागेत पोचलो. आजकाल सगळीकडे सगळं काही मिळतं तरीही तुळशीबागेतल्या खरेदीची सर कशालाच नाही. जसं हॉटेलमधलं जेवण कितीही चांगलं असलं तरी घरचं जेवण ऑल टाइम बेस्ट! ! तसंच काहीसं.
नेहमीप्रमाणे तुळशीबागेत तुडुंब गर्दी. कडकडीत उन्हातही खरेदीचा अफाट उत्साह होता त्यात सौ हरवल्या आणि मी आजूबाजूला बघत उभा राहिलो. सर्व महिला भान हरपून तुळशीबागेतल्या मोहमयी दुनियेत हरवतात हा सार्वत्रिक अनुभव…
… खरंतर पुरुष मंडळींना ‘काय घ्यायचं ते घे अन पटकन चल’ असं ओरडून सांगायचं असतं पण स्पष्टपणे सांगता येत नाही. कितीही कंटाळा, वैताग आला तरी शांत रहावं लागतं. भरिसभर म्हणजे बायका हे कसं दिसतं, ते कसं दिसतं, हे घेऊ की ते घेऊ असं विचारून हैराण करतात. त्यामुळे पुरुषांना खास करून नवऱ्यांना सतत अलर्ट मोडवर रहावं लागतं.
… माझीसुद्धा अवस्था अशीच झालेली. अगदी ‘एक रुपया’ अशी किंमत सांगितली तरी महिलामंडळींना महाग वाटते आणि मग सुरू होतो बार्गेनिंगचा खेळ. दुकानदारानं सांगितलेल्या किमतीला वस्तू घेणं महिला मंडळींना कमीपणाचं वाटतं याच्या नेमकं उलट पुरुषमंडळी “किती” एवढंच विचारतात आणि पैसे देऊन मोकळे होतात.
तास-दीड तास झाला तरी सौंची खरेदी सुरूच होती. उभं राहून पाय आणि डोकं दुखयाला लागलं. जाम कंटाळलो.
“ए, चल बास आता”
“दोन मिनिटं. हे कानातलं बघा. किती छान आहे”
“हा मस्तयं. घेऊन टाक”
… मी निघण्याचा आग्रह करत होतो पण सौ खरेदीत गुंग होत्या. इतक्यात तिचं लक्ष गेलं माझा आविर्भाव पाहून ती म्हणाली “सॉरी! ! माझ्यामुळं तुम्हांला ताटकळावं लागलं. इच्छा नसताना इथं यावं लागलं. ”
“अगं, तसं काही नाही”
“माहितीये. तुम्ही काही बोलणार नाही. चला निघू या. आता थेट लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसालाच येऊ. तेसुद्धा जमलं तर “इच्छा नसताना उतरलेल्या चेहऱ्यानं सौ निघाली. मला कसतरीचं वाटलं. बायकोची इतकी साधी इच्छा.
त्यातसुद्धा तिनं तडजोड केली.
… मनात कालवाकालव झाली. तिचं वागणं खूप खोलवर भिडलं. विनाकारण अपराधी वाटायला लागलं.
“कितीही घेतलं तरी कमीच आहे. चला” सौंच्या बोलण्यानं विचारांची तंद्री तुटली.
“अजून आपण त्या साईडला गेलो नाही. तिकडं खूप व्हरायटी आहे. ”
“नको”
“अगं खरंच, तुला हवी तेवढी खरेदी कर मी सोबत आहे”
“चेष्टा करताय”
“नाही. खरंच! ! तुझी शप्पथ”
“माझा खूप राग आलाय ना”
“नाही गं राणी. आज सगळी तुळशीबाग फिरल्याशिवाय घरी जायचं नाही. बिनधास्त खरेदी करू”मी हसलो तेव्हा सौंचा चेहरा उजळला. पुढचे दोन-अडीच तास तुळशीबागमय होते. प्रत्येक खरेदीत मी सक्रिय सहभाग घेतला. बार्गेनिंगसुद्धा केलं त्यामुळे सौ प्रचंड नव्हे अतिप्रचंड खुष झाली.
– – – किमती, ब्रॅंडेड वस्तूंपेक्षा आपल्या माणसांना ‘वेळ देणं’ यापेक्षा मोठं गिफ्ट नाही.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






