श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ मराठी शुद्ध बोलतांना ऐकून आपल्याला आश्चर्य का वाटते? ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
अलीकडे विद्यानंद बापट नामक एका सर्वसामान्य पुणेकराचे अस्खलित, स्पष्ट आणि समृद्ध मराठी महाराष्ट्राने ऐकले आणि अनेकांना आश्चर्य वाटले.
“इतकं शुद्ध मराठी आजही कोणी बोलतं?”
मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांनी त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे कौतुक केले. माध्यमांत त्याची चर्चा झाली. काहींनी तर त्या भाषेची टवाळी करणारी रिळेही प्रसारित केली.
टवाळा आवडे विनोद!
पण या प्रसंगाने विनोदापेक्षा मोठा प्रश्न उभा केला—
शुद्ध मराठी ऐकून आपल्याला आश्चर्य का वाटते?
बापट एकटे नाहीत. पुण्यात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही उत्तम मराठी बोलणारे असंख्य लोक आहेत. प्रश्न त्यांच्या संख्येचा नाही. प्रश्न आहे तो अशा भाषिक परंपरेचा वारसा आपण पुढे नेतो आहोत की गमावतो आहोत, हा.
भाषा केवळ शब्दांचे साधन नाही. ती संस्कृतीची स्मृती आहे. विचारांची वाहिनी आहे. एका पिढीचा अनुभव दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचविणारा सेतू आहे.
म्हणून भाषेची उपेक्षा ही केवळ भाषेची उपेक्षा राहत नाही.
हा प्रयत्न नवा नाही
मराठी शुद्ध, समर्थ आणि स्वाभिमानी व्हावी, यासाठीचे प्रयत्न आजचे नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राजव्यवहारकोश निर्माण झाला. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीचा आग्रह अत्यंत प्रखरपणे धरला. त्यांच्या प्रयत्नांची प्रारंभी टवाळी झाली; पण कालांतराने त्यांच्या प्रयत्नांतून रूढ झालेले अनेक शब्द व्यवहाराचा भाग झाले.
इतिहास एक गोष्ट शिकवतो—
आज अपरिचित वाटणारा शब्द उद्या आपलासा होऊ शकतो; आज टवाळीचा विषय ठरलेला आग्रह उद्या भाषेच्या संवर्धनाचा पाया ठरू शकतो.
म्हणून भाषेचा विचार केवळ आजच्या सोयीने करता येत नाही.
‘चालते’ पुरेसे आहे का?
आजच्या भ्रमणध्वनी-संदेशसंस्कृतीने एक नवी सवय लावली आहे—
आतपुढे म्हणजे – –
आले तसे पुढे पाठवायचे.
स्वलिखित असो वा अग्रेषित—शब्ददोष, व्याकरणदोष, सदोष वाक्यरचना, चुकीचे शब्दप्रयोग आणि विरामचिन्हांकडे झालेले दुर्लक्ष सहज दिसते.
‘कळतंय ना काय म्हणायचंय ते, मग झालं!’
‘काय फरक पडतो?’
‘चालते!’
हीच तर अडचण आहे.
चूक वारंवार दिसली की ती रूढ होते; आणि रूढ झालेले आपण योग्य समजू लागतो. हेच पहा ना, व्यक्ती हा स्रिलिंगी शब्द पण सध्या ‘ तो व्यक्ती ‘ असंच म्हणू लागले आहेत लोक.
शुद्ध म्हणजे कठीण नव्हे
शुद्ध भाषा म्हणजे अवघड भाषा नव्हे. संस्कृतप्रचुर शब्दांची गर्दी करणे म्हणजे भाषाप्रभुत्व नव्हे. दुर्बोध शब्द वापरणे म्हणजे भाषाशुद्धी नव्हे.
शुद्ध भाषा म्हणजे व्याकरणसम्मत, अर्थ स्पष्ट करणारी, प्रसंगानुरूप, नेमकी आणि सहज आकलन होणारी भाषा.
भाषा साधी असावी; पण अशुद्ध नसावी.
भाषा सहज असावी; पण सवंग, निष्काळजी नसावी.
सहजता आणि निष्काळजीपणा यांत भेद आहे.
लेखकाचे दायित्व
आपण जे लिखाण इतरांच्या वाचनासाठी पाठवतो, त्यात वाचकाचा वेळ आणि श्रम गुंतलेले असतात.
म्हणून लेख पाठवण्यापूर्वी तो एकदा नीट वाचणे, शब्द तपासणे, वाक्यरचना पाहणे, विरामचिन्हे लावणे—हे लेखकाचे कर्तव्यच नव्हे तर वाचकाप्रतीचे दायित्व आहे.
वाचकाने आपल्या लेखाचा अर्थ लावण्यासाठी श्रम करू नयेत; अर्थ स्पष्ट करण्याचे श्रम लेखकाने घ्यावेत.
भाषा आणि विचार
भाषा केवळ विचार व्यक्त करत नाही; ती विचारांना आकारही देते.
शब्द नेमके असतील तर विचार नेमका होतो. वाक्यरचना स्पष्ट असेल तर विचारांची मांडणी स्पष्ट होते.
म्हणून भाषेची शिस्त ही केवळ व्याकरणाची शिस्त नाही.
ती विचारांचीही शिस्त आहे.
परभाषिक शब्दांचा प्रश्न
मराठी अनेक भाषांच्या सहवासातून समृद्ध झाली आहे. त्यामुळे प्रत्येक परभाषिक शब्द अशुद्ध आहे, असे म्हणणे योग्य नाही.
प्रश्न आहे तो अनावश्यक परावलंबित्वाचा.
जिथे मराठीत नेमका, रूढ आणि अर्थवाही शब्द उपलब्ध आहे, तिथे केवळ सवयीने परभाषिक शब्द योजण्याची आवश्यकता काय?
आणि जिथे पर्यायी शब्द नाही, तिथे नवा शब्द निर्माण करण्याची क्षमता आपल्या भाषेत नाही का?
भाषाप्रेम म्हणजे परभाषाद्वेष नव्हे; स्वभाषासामर्थ्याची जाणीव होय.
भाषा जपायची की जगवायची?
भाषा काचेच्या पेटीत ठेवून जपायची नसते.
भाषा वापरली की जगते.
नेमकी वापरली की समृद्ध होते.
नव्या अनुभवांना सामावून घेतली की विकसित होते.
नवे विज्ञान, नवे तंत्रज्ञान, नवे व्यवहार, नवे विचार—या सर्वांसाठी नवे शब्द लागतील. ते निर्माण करण्याचे दायित्व आपलेच.
वाचन : भाषेची मुळाक्षरे
शब्दसंपदा एका दिवसात निर्माण होत नाही.
वाचनातून शब्द भेटतात. उत्तम वक्त्यांचे बोलणे ऐकण्यातून वाक्यरचना मनात साठते. चांगले साहित्य वाचल्याने भाषेची लय, अर्थछटा आणि अभिव्यक्ती समृद्ध होते.
म्हणून भाषाशुद्धीचा आरंभ केवळ व्याकरणाच्या पुस्तकापासून होत नाही.
तो वाचनापासूनही होतो.
वाचनाला पर्याय नाही.
विद्यानंद बापट यांच्या भाषेच्या संदर्भात त्यांच्या वाचनाच्या सवयीचा उल्लेखही पुढे आला आहे.
उद्याची मराठी कोणती?
आज प्रश्न असा नाही की मराठी टिकेल का.
मराठीची परंपरा विशाल आहे. ती टिकेल.
खरा प्रश्न आहे—
आपण पुढच्या पिढीला कोणती मराठी देणार?
शब्दसंपन्न?
नेमकी?
सुसंस्कृत?
अस्खलित?
की स्वतःचे समर्थ शब्द असूनही त्यांचा उपयोग करण्याचे कष्ट न घेणारी?
उत्तर आपल्या रोजच्या वापरातूनच ठरणार आहे.
श्रीगणेशा कुठून?
दुसऱ्याच्या चुका शोधण्यापासून नव्हे.
स्वतःपासून.
एक शब्द योग्य लिहिणे.
एक वाक्य नीट रचणे.
एक अनावश्यक परभाषिक शब्द टाळणे.
पाठवण्यापूर्वी आपले लिखाण पुन्हा वाचणे.
इतके केले तरी आरंभ झाला.
भाषेचा स्तर एखादी व्यक्ती एकटी ठरवत नाही.
लक्षावधी सामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारातून भाषेचा स्तर घडत असतो.
म्हणूनच भाषेचे भवितव्य आपल्या हातात आहे.
आज शुद्ध मराठी ऐकून आपल्याला आश्चर्य वाटले.
उद्या असे मराठी ऐकून आश्चर्य वाटू नये.
शुद्ध मराठी बोलणारा माणूस विशेष वाटू नये;
शुद्ध मराठी बोलणेच स्वाभाविक वाटावे.
ही अपेक्षा अवास्तव नाही.
त्यासाठी इच्छा हवी.
हव्यास हवा.
वाचन हवे.
भाषाज्ञान हवे.
शब्दसंपदा हवी.
विवेक हवा.
आणि सर्वांत महत्त्वाचे—
स्वतःपासून आरंभ करण्याची सिद्धता हवी, संकल्प हवा!
व्याकरणातील ऱ्हस्व–दीर्घ, ‘न’–‘ण’, ‘स’–‘श’–‘ष’, लिंग, वचन, विभक्ती, काळ, शब्दप्रयोग, म्हणी, वाक्प्रचार आणि शब्दसंग्रह यांसारख्या विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलता येईल.
पण त्यापूर्वी एक गोष्ट मनात रुजली पाहिजे—
आपली भाषा शुद्ध असावी, अशी इच्छा.
कारण भाषाशुद्धी ही दुसऱ्याला सुधारण्यापासून नव्हे, स्वतःला सुधारण्यापासून सुरू होते.
आणि म्हणूनच—
चूक होणे शक्य आहे; स्वाभाविक आहे.
पण चूक तशीच ठेवणे हा अपराध आहे.
आणि भाषा शुद्ध ठेवण्याचे दायित्व—
ते आपलेच आहे.
तोपर्यंत नमस्कार!
🙏🏻🙏🏻🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
२४ सप्टेंबर २०२६
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






आद. दिवाकर जी, नमस्कार, मराठी भाषे विषयक छान लेख. आम्ही तीन पिढ्यां पासून मध्यप्रदेश मधे राहतोय. घरात अजूनही भाषा संस्कृति जोपासून ठेवली. एक गोष्ट फार कळकळीने सांगायची, मराठी भाषा पण संस्कृतनिष्ठ भाषा पण काळाच्या प्रवाहात अनेक शब्द उर्दू, फारसी चे शिरले नि त्यांना नित्य व्यवहारात जागा मिळाली (उदाहरणार्थ काही शब्द मी वहीत लिहून सुध्दा ठेवलेत) हे सुधरवायला हवं. दुसरे, भाषा लिहितांना मात्रा- दीर्घ, ह्रस्व, यथा दिपक, मंदीर, निलम इ. या चुका होतात हे लक्षात घ्यायला हवं.
मी सामान्य माणूस, भाषेचा शुध्दते करिता काही वाटतं म्हणून हे विचार प्रकट केले.