श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “नाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“अरे नाना तिसरी घंटा दिलीयं बरं!… तो रंगमंचावरचा मखमली पडदा आता हळूहळू मागे मागे सरकू लागलाय.. नटसम्राट नाटकाचा आता अखेरचा तिसऱ्या अंकातील शेवटचा प्रवेशाला सुरवात होतेय… आणि तो झाला कि… अरे ऐकतो आहेस ना?… मग उठ बरं तुझ्या त्या भावसमाधीतून… ठाऊक आहे हे नटसम्राट नाटकाचा प्रयोग जेव्हा जेव्हा आपण निरनिराळ्या गावातून करतो त्यावेळी सगळं थिएटर रसिक प्रेक्षकांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असतं आणि आणि तुझ्या त्या आप्पासाहेब बेलवलकरांची भाव व्याकुळ भुमिकेने तर तिथला सारा माहोल मंत्रमुग्ध होऊन बसलेला असतो… तुझी ती संंवादाची फेक, ते अखंड चालणारे संवाद, तुझ्या बोलण्यातलं कारुण्य, तुझी देहबोली, तो मूर्तीमंत अभिनय आणि आणि नाटकातील तुझ्याच दोन्ही मुलां बद्दल असलेला तो सात्विक संताप… त्यात तुझी कावेरी, तुझं जीवाभावाचं नि प्रेमळ सरकार असं मध्येच तुला सोडून निघून गेल्यानं तुझा सैरभैर झालेला स्वभाव… किती किती म्हणून अभिनायाचे कंगोरे नाना तू दाखवत गेलास… नाटक संपल्यावर तो पडदा सरकत येऊन रंगमंच झाकला गेल्यावरही प्रेक्षकागृहातला प्रेक्षक बसल्या जागी्च दिग्मुढ होऊन जायचा.. तेव्हा नाना तू स्वत: आणि या नाटकातील अभिनय करणारी नट मंडळी आपण सगळे पुन्हा रंगमंचावर येऊन विनम्र अभिवादन करून सांगताना त्यांना भानावर आणावं लागायचं.. रसिक मायबाप हो, नटसम्राट नाटकाचा प्रयोग समाप्त झालेला आहे आणि पुढील दुसऱ्या कार्यक्रमासाठी हा रंगमंच रिकामा करून द्यायला लागणार आहे… नटसम्राट नाटकाचं गारूड प्रेक्षकांच्या मनावर अजूनही उतरायला तयार नसतं आणि प्रेक्षक आपल्या भावाकूल मनाला मुरड घालत जड अंत करणाने पाय ओढत प्रेक्षकगृहातून बाहेर पडतात…
संपूर्ण तीन तासाच्या या नटसम्राट नाटकाने तिथे आलेला प्रेक्षक विषण्ण अवस्थेत बाहेर पडत असतो हीच आपल्या या नाटकाची उत्तुंग यशाची पावती आपल्याला सगळी कडे मिळत असते… आणि त्याच वेळी तू तिकडे कोपऱ्यात जाऊन आपले डोळ्यात तरारले आसू मात्र कुणाच्याही लक्षात येणार नाही असं पाहून नकळत बोटांनी पुसत असतोस… बाकी कुणाचं लक्ष असो वा नसो पण मी मात्रं त्यावेळेस तुझ्याकडे आवर्जून पाहत असतो… हे दर प्रयोगाला न चुकता हमखास घडतच असतं… मी तुझ्याकडे पाहतो हे एकदा तुझ्या लक्षात आलं आणि तू मला कसनूसं हसून म्हणालास ( ते हसणं तुझं नैसर्गिक होतं… खरा खुऱ्या नानाचं) काय पाहतोस असा माझ्याकडे… अरे या नाटकाच्या प्रयोगात मी नाना आप्पासाहेब बेलवकरची भूमिका करत नसून… माझ्यात ते आप्पासाहेब बेलवलकरच प्रकट होतात… माझा मीच राहत नाही आणि नाटक संपल्यावर त्यांचा संचार उतरतो तेव्हा मला समोर भारलेले प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करताना दिसतात तेव्हा भानावर येतो… माझ्या अभिनयाला ते दाद देतात असे वरंवरं दिसणाऱ्याला वाटतं… पण मी कुठेच नसतो त्यात… मी असतो त्यावेळी इथं कोपऱ्यात आसू पुसत त्या नटश्रेष्ठ आप्पासाहेब बेलवकरची क्षमा मागत… त्यांच्या जीवनचरित्राचे असा चारलोकाच्यां समोर रंगमंचावर त्यांच्या दूर्देवाच्या दशावताराचे धिंडवडे दाखवल्याचा बाजारीपणा मांडून आपली कलेची हौस फेडून घेण्याच्या गोंडस नावाखाली, आपले पोट भरून घेण्याचा स्वार्थीपणा केल्याबद्दल… मला आठवतंय नाना, एकदा तू मला म्हणाला होतास… आपण आता नटसम्राट करायचं थांबवूया… मला त्याचा अलिकडे खूपच त्रास होतोय… नि तसं वयाच्या मानानं त्या भुमिकेला आता माझ्याकडून म्हणावा तसा न्याय देणं होत नाही… त्यातील त्यांची झालेली ती फरफट माझ्याच्याने अभिनयात आता आताशा उतरावयाला खूपच जड जातयं… तेव्हा प्रेक्षकांनी कंटाळून नाटकाकडे पाठ फिरविण्यापेक्षा आपण ज्या उंचीवर नटसम्राट नेऊन ठेवलयं तिथूनच विराम घेऊया… प्रेक्षाकांनी विचारू देत… का?
आताच का थांबवत आहात नटसम्राट? हि प्रयोगाची पावनगंगा अशीच अखंड वाहत राहू दे… आणि हिच ती वेळ योग्य ठरेल सगळ्या जनमानसात या अभिजात नाट्यकृतीची अक्षय छबी राहण्याची… मी एक निर्माता या नात्याने तुझ्या सच्चा कलावंताची ही मागणी योग्य वाटली त्यास तयार झालो ते फक्त हा आजचा शेवटचा नटसम्राटचा प्रयोग करून थांबयचा मी घेतलेला निर्णय तुला सांगितला… आणि त्याप्रमाणे आजचा प्रयोग तितकाच रंगतदार बहारदार झाला… न भूतो न भविष्यती.. तिसऱ्या अंकाचा हा शेवटचा प्रवेश सुरू होण्याचा काही अवधी राहिला असताना नाना तुला कसली गाढ भावसमाधी लागली… मी विंगेतून तुला हाका मारतोय पण तू काहीच उत्तर न देता त्या खुर्चीत मान टेकवून… आणि आणि त्याच क्षणी मात्र ती तुझ्या डोक्यावरची काळी टोपी खुर्चीवर घरगंळून खाली खाली आली…
अरे नाना उठ जागा हो… हा क्लायमॅक्स चा प्रवेश म्हणजे तुझा हातखंडा असतो… आणि त्यात ते तुझं ब्रुटस् यू टू हे वाक्य म्हणजे काळीज चिरत जाणारं… ते ते तेव्हढं एकदा कानावर पडू दे म्हणजे आमच्या सगळ्यांचे कानं नि डोळे तृप्त होतील… उद्या लोक नक्कीच म्हणतील झाले बहू, होतीलही बहू.. पण असा आप्पासाहेब बेलवलकर पुन्हा रंगमंचावर पाहायला मिळणार नाही… तेव्हा नाना उठं… तो तिसऱ्या अंकातील तिसरा नि शेवटचा प्रवेश राहिलाय… आम्ही तुझी कधीची वाट पाहतोय…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






