उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग २ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

☆☆☆☆

(दिवे झगमगू लागले होते. काही पुरुष मंडळी खाण्या-पिण्याची मजा घेत होते. आया आपल्या मुलांना घेऊन निघून गेल्या होत्या. झोपाळे आता रिकामेच झुलत होते. त्यांचं किलबिलणं अजूनही हवेत गुंजत होतं. ती निघाली.) इथून पुढे – –

अभिजीतला ती प्रथम कधी भेटली होती बरं? कॉलेज-कॅंटीनमधेच. समुद्रकिनारी एक शहाळ्यात दोन स्ट्रॉ घालून आणी पिणं. नारळवाला तेव्हा हसला होता. त्यावेळी मोबाइल नव्हते. पण या स्मृतींच्या आल्बममध्ये किती सुंदर फोटो होते. तिथे जणू काळ थांबून राहिला होता. अभिजीतने उडवलेलं पाणी अजूनही तिला भिजवत राहिलं होतं॰ तिचं पहिलं चुंबन, सुंदर रंगी-बेरंगी फुलपाखरांप्रमाणे उडत उडत तिच्या कोमल ओठांवर अशा तर्‍हेने बसलं होतं, की तिचे डोळेच बंद झाले. देहात एका मधुर शिरशिरीचा तिला अनुभव येत राहिला. डेथ क्लिनिंगची पहिली अट हीच आहे की डेथ इज़ अ सेलिब्रेशन ऑफ लाइफ! रिकाम्या बाकावर पटकन काही तरी ठेवून निघावं, तशी ती लगेचच बागेतून बाहेर पडली आणि रेस्टॉरन्टमध्ये जेवून घरी परतली.

सकाळी बाल्कनीत चहा पिता पिता ती विचार करू लागली, ‘हा डिनर सेट मी कुणाला देऊ? कुणाला दिला आणि ते नको म्हणाले तर? आज-काल या क्रोकरीत काही नावीन्य राहिलेलं नाही. ’

डोअर बेल वाजली. आज वर्तमानपत्र उशिरा आली होती. दार उघडलं, तर शेजारच्या मालतीताई होत्या.

‘काल माझा वाढदिवस होता. मुलाने केक आणला. आता या वयात असला वाढदिवस म्हणजे… साठ वर्षं झाली. पण मुलं म्हणाली, ‘पार्टी करायचीच! ’ माझी बहीणही आणंदहून आली आहे. आपल्यालाही बोलावलं होतं, पण आपण बाहेर गेला होतात. केक जरूर खा… ‘

‘बाहेरूनच निघून जाणार? आत या ना! ’

‘पण मला स्वैपाक…

‘फार नाही. फक्त पाच मिनिटे… ‘

‘मालती आत आली. डायनिंग टेबलवर केक ठेवत म्हणाली,

 ‘नीलाताई आपल्या उंधियचा स्वाद अजून माझ्या जिभेवर आहे. ’

नीला लगेचच स्टुलावर चढली. कपाट उघडलं.

‘हा डिनर सेट आपण घेऊन जाल? ” आपल्या घरात तो उपयोगी पडेल, असं मला वाटतं.

मालतीला आश्चर्य वाटलं. ‘अरे, इतका सुंदर, डिसेंट डिनर सेट… ’

नीलाने एक प्लेट तिच्या हातात ठेवत म्हंटलं, फिक्या हिरव्या रंगावर पानांचं सुरेख डिझाईन. मालती पुन्हा पुन्हा बघू लागली.

‘पण खूप महाग असेल ना! मला इतका खर्च करणं अवघड आहे. ’

‘पैशाचा काही प्रश्नच नाही मालतीताई! हा आपल्यासाठी मुद्दाम खरेदी केलेला नाही. त्यामुळे याला वाढदिवसाची भेट असंही म्हणता येणार नाही. पण आपण जर याचा वापर केलात, तर मला खूप आनंद होईल. आपला परिवार मोठा आहे. त्यामुळे आपल्याला याचा उपयोग होऊ शकेल! ’

मालतीला जरा संकोच वाटला. ‘पण असाच कसा घ्यायचा मी? ’

‘का नाही? मी आपल्याला हा सेट खुशीने देते आहे. अभिजीतसुद्धा जिथे असेल, तिथे खुश होईल! ’

मालती घाईघाईने निघाली. ‘ आपले खूप खूप आभार ताई. विनय लगेचच पळत येईल आणि घेऊन जाईल. ’

विनय खरोखरच पळत आला. ओठया उत्साहान वर चढला. ‘`लव यु आंटी! ’

म्हणत वर चढला. पिशवी भरली आणि ती घेऊन गेला.

त्यानंतर वेळ आली घरातल्या भांड्यांची. भाजी मार्केटच्या जवळ फुटपाथवर एक कुटुंब पालेभाज्या, फळभाज्या विकत होते. तिथल्याच झोपडीत रहात होते. एकत्र जेवण घेत होते. अ‍ॅल्युमिनीयमची मोडकी तोडकी भांडी, स्वस्त प्लेट्स तिने तिथे बघितल्या होत्या. दूधपाक, ऊंधियु या सारखे पदार्थ, ती ज्यात शिजवायची, ती पातेली मोठी मोठी होती. नंतर तिने चौकीदाराला बोलावले. एक मोठी थैली भरली. रिक्शा बाजारात गेली, त्यावेळी सगळीजण जेवणाच्या तयारीत होते. नीलाने मोठी थैली तिच्याजवळ ‘ही ठेवा’ म्हंटलं. ‘ घ्या. याचा उपयोग करा. वापरा. विकू नका. ’ कुटुंबातल्या बायकांनी थैली जवळ ठेवली, ‘आपण म्हणाल, त्याची शपथ घेऊन सांगते, हे आम्हाला सोन्या-रुप्यासारखं आहे. हे कसं विकू आम्ही. भांड्यांवाचून आमचं खूप अडत होतं.

सगळे तिच्या पाया पडू लागले. ती घाईघाईने तिथून निघाली. रात्री प्रियमला फ़ोन लावला. ‘ तुम्हा सगळ्यांची आज आठवण येतेय. याल ना? नाही… मी काही आजारी नाही. फक्त तुम्हा सर्वांना भेटावसं वाटतय. एवढंच! ’

निशांत-प्रियम दोनच दिवसात आली. ‘काय झालं आई? ’

नीलाने बंद असलेली बेडरूम उघडली. ‘ही तुमची खोली आहे. इथे खूप काही गोष्टी पाडलेल्या आहेत. शिवाय ड्रॉईंगगरूमच्या शोकेस भरलेल्या आहेत. तुला जे उपयुक्त वाटतय, ते घेऊन जा. ‘

‘असं का आई? ’

‘आता मला या सगळ्याचा काय उपयोग? इकडे ये. ‘ नीला प्रियमला आपल्या खोलीत घेऊन गेली.

‘या कपाटात जरीच्या आणि कांजीवरमच्या साड्या आहेत मी काही आता त्या नेसणार नाही. तू तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या लग्नात नेसू शकतेस’

प्रियमने सगळा गठ्ठा उचला. ‘माय गॉड! सो ब्युटीफूल. मी यातून ड्रेस बनवले, तर तुम्हाला चालेल ना! ’

‘हो! पण एक अट आहे. मला फोटो पाठवावे लागतील. ’

“आई लव यु, लव यु! ’’

निशांतने काही पुस्तके आणि दोन-चार छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आणि निरूपयोगी वस्तूंचा ढीग लावला. दोन –चार दिवस खुशीने एकत्र राहून त्यांनी निरोप घेतला.

हळू हळू घर रिकामं होऊ लागलं. अभिजीतला निरोप दिल्यानंतर त्याचे कपडे, इतर छोट्या-मोठ्या वस्तू तेव्हाच तिने अनाथाश्रमात देऊन टाकल्या होत्या. तरीसुद्धा टेबलाच्या एका ड्रॉवरमध्ये शूज आणि चपलांचा खजिना सापडला.

घर आता मोकळेपणा अनुभवत होतं. थेंक्स विशाखा सुब्रह्मण्यम, माझ्या जीवनातील नव्या अध्यायासाठी थॅंक्स अगेन. अंजूला बोलावलं. घराची चांगली साफ-सफाई करवून घेतली॰ तिलाही उरल्या सूरल्या गोष्टी देऊन टाकल्या.

अनेक गोष्टी गोळा करून घेतल्या. जीवनातील ब्याऐंशी वर्षाचा काळ तिने चांगला गुंडाळून घडी करून ठेवला.

आता शेवटचा एकच तंतू तोडायचा राहिला होता.

रीचाचे दागिने इथेच होते. ती काहीच न घेता गेली होती. तिने एकप्रेमाचं, मायेने ओथंबलेलं पत्र रीचाला लिहिलं आणि दागिन्यांच्या बटव्यात ठेवलं. मी गेल्यावर कदाचित ती इथे येईल आणि हे पत्र तिला पोचेल, अशी तिने मनोमन प्रार्थना केली. अजूनही काही मूल्यवान दागिने तिच्याकडे होते. प्रत्येक दिवाळीत सोन्या-चांदीची काही ना काही वस्तू अभिजीत त्यांना द्यायचा. ती तर गेली कित्येक वर्षे एक सोन्याची साधी चेन, कुड्या आणि बांगड्या याशिवाय दुसरं काही घालायची नाही. हे दागिने विकून महिलाश्रमासाठी कॉम्प्युटर खरेदी करावा, असं तिच्या मनात आलं.

तिजोरी रिकामी झाली. शेवटी एक छोटीशी बारकी थैली उरली. थैली कुठली? पोटलीच. आपल्या मांडीवर ती घेऊन, ती किती तरी वेळ बसून राहिली. अभिजीतने आणि तिने एक-दुसर्‍याला लिहिलेली पत्रे, सिनेमाची तिकिटे, विवाहापूर्वी एक रात्र ज्या रेझॉर्टमध्ये ते राहिले होते आणि मधुरजनी साजरी केली होती, त्या रेझॉर्टचं बील, सगळं त्या रेशमी बाटव्यात होतं. स्मृतिकोशात संचित केलेलं होतं. काय नव्हतं त्यात? सगळच होतं. जीवन, रूसवे-फुगवे, समजावणी, हसू आणि थोडेसे आसूसुद्धा. वस्तूंचं ‘डेथ क्लीनिंग’ केलं जाऊ शकतं, पण त्या आठवणींचं काय? त्या तर आगदी व्यक्तिगत. तृष्णेसारख्याच. कुणाला देता येणार नाहीत. काळजाच्या कुपीत सजवून ठेवलेल्या. हृदय दिसतं. काळजाचं काय? कुणी पाहिलय? तरीही त्याच्या प्रतिफळाची प्रतीती येतेच..

घराकडे नजर वळली आणि सुटकेचा अनुभव आला. मुक्तीचा खोलवर श्वास घेतला. असंख्य वस्तूंच्या जीवनाचं दडपण आलं. विशाखा सुब्रह्मण्यम लिहिते, ‘रिमूव्ह ध एक्सेस बॅगेज फ्रोम योर लाइफ एंड फिल फ्री. ’ जणू एखाद्या कारावासातून ती मुक्त झाली. मायेचे आवरणं बाजूला सरले, त्यामुळे परमानंदाचा चेहरा प्रगट झाला.

तिने बॅग पॅक केली. काळजीपूर्वक रेशमी पोटली त्यात ठेवली. मालतीताईंना चावी दिली. ‘माझ्या मुलाचं लग्न आहे. मी दोन महीने काही येणार नाही. आपल्याला गरज लागेल, त्याप्रमाणे माझ्या घराचा जरूर उपयोग करा. ’

त्या नीलाच्या गळ्यात पडल्या. भावनावेगाने रडू लागल्या.

ती ट्रेनमधे बसली, तेव्हा तिच्या मनात विचार आला, एका नवीन प्रवासाची सुरुवात. वयाच्या कुठल्याही थांब्यावरून सुरुवात करता येऊ शकते.

ऋषिकेशच्या गेस्टहाऊसमधील छोट्याशा कॉटेजमध्ये तिने आपली बॅग ठेवली. मन प्रसन्न होतं. चारी बाजूला मखमली गवत. तिथून थोड्या अंतरावर वन्यप्रदेश सुरू होत होता. गंगातट फारसा लांब नव्हता. बेडरूममध्ये मोठ्या फ्रेंच विंडोज़ होत्या. खाली लगेचच बगीचा होता. जसा काही बगीचा तिच्या खोलीतच होता आणि सुगंधित फुले तिला गंधलेपन करत होती.

थोड्या अंतरावर दुसर्‍या कॉटेजमध्ये एक कुटुंब आपल्या मुला-बाळांसह आलं होतं. भोजनाच्या वेळी रोज भेटणं होत असे. बोलणंही होत असे. खूप गप्पा झाल्या. बरोबर फिरले. म्युझियम पाह्यलं. वेगवेगळ्या मंदिरांचं आर्कीटेक्चर बघताना मजा वाटली आनंद झाला.

नंतर एका संध्याकाळी ती लक्ष्मणझूल्यावर गेली. गंगेची आरती एवढ्यातच संपली होती. तिच्या महाआरतीची स्पंदने वार्‍यावर वहात होती आणि खाली जान्हवी वहात होती. हळू हळू अंधार पडत चालला होता. गंगेच्या धारेत असंख्य दिवे झगझगमगत होते. हे दिवे जल प्रवाहात तरंगत – झुलत दूरवर जाऊन जलसमाधी घेत होते. त्याच्यामागे आणखी एक दिवा. मग त्यामागे आणखी. ही शृंखला खंडित होत नाही. हासुद्धा जसा काही या प्रवाहमान धारेचा एक जलबिन्दु.

ती खाली उतरून गंगेच्या पायर्‍यांवर आली. तिथे आता आरतीची गर्दी नव्हती. मंदिरातील घंटारवाने हवा तरंगित होत होती. इतक्यात एक मुलगा पळत पळत तिच्याजवळ आला.

“मैया, बस एकच दिवा राहिलाय. घ्या ना! वीस रुपयात देतो. प्लीज… ’’त्याने फुलांनी भरलेया द्रोण समोर ठेवून तिचा पदर धरला. ‘घ्या. मैया, पंध्रा रुपयालाच देतो. ’

नीलाने द्रोण घेतला. फुलांच्या खाली रेशमी पोटली ठेवली. दिवा लावला. खाली जलप्रवाहात तरंगण्यासाठी ठेवून दिला.

‘मैया, असं नाही करायचं. गंगाजल माथ्यावर ठेवा. ’

ती हसली.

‘तू खूप शहाणा आहेस. मोठं झाल्यावर पंडित होणार का? ’

‘हो. इथेच पाट लावून बसेन. बाबाच्या पाठशाळेत जातो ना! ’

नीलाने शंभर रुपयाची नोट त्याच्या हातात ठेवली. त्याचं तोंड उघडच राहिलं. ओरडत तो नीलाला चिकटला. तिने प्रेमाने त्याला हलकीशी चापट मारली.

‘चल. सोड. आपण जेवायला कुठे तरी जाऊ या. बोल. कुठे जाऊया? ’

दोघे हसले. नीलाचा दिवा थोडे अंतर जाऊन समाधिस्थ झाला. नीलाने नमस्कार केला. आई, तुझ्या चरणी सर्वस्व अर्पण.

‘चल मैय्या, सांभाळून हा! ’ मुलाने तिचा हात धरला आणि तो घाटाच्या पायर्‍या चढू लागला.

— समाप्त —

☆☆☆☆

मूळ लेखिका – वर्षा अडालजा – मोबाइल: 9833076673

हिन्दी अनुवाद – डॉ.रजनीकान्त एस.शाह – मोबाइल: 9924567512

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted