डॉ. नेहा भटकर
इंद्रधनुष्य
☆ शब्दशारदा शांताबाई… ☆ डॉ. नेहा भटकर ☆
शब्दशारदा शांताबाई!!
आज १२ ऑक्टोबर… शब्दशारदा शांताबाई शेळके यांचा हा जन्मदिवस
– – आणि यंदा त्यासोबतच आलेल्या शारदीय नवरात्री पर्वणीचे निमित्त साधून, शांताबाईंच्या चतुरस्त्र साहित्यिक कर्तृत्वाची व त्यांच्या निर्मळ रुपेरी व्यक्तिमत्त्वाची आठवण जागविण्याचा, हा एक छोटेखानी विनम्र प्रयत्न.
शांताबाई ज. शेळके नावाच्या, असामान्य प्रतिभेच्या, या अभिजात शब्दशारदेने सजवलेल्या विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक कृतींनी नटलेल्या प्रांगणातून नुसता फेरफटका मारणे हे देखील अत्यंत कठीण काम आहे, याची मला पूरती कल्पना आहे. हे यासाठी की शांताबाईंच्या साहित्य खजिन्यातून नेमकी कुठली जडजवाहीरं वेचावीत, याचा संभ्रम आणि गोंधळ हा उडणारच. खरे तर शांता ज. शेळके हे नाव माहिती होण्याच्या आधीच त्यांची गाणी आपल्या भेटीला आलेली असतात आणि हीच त्यांची आपल्याला झालेली पहिली ओळख. लहानपणी गणराज रंगी नाचतो… किंवा गजानना रे गणराया… या गाण्यांशिवाय गणपती उत्सव होऊच शकत नाही हे आपलं पक्क मत कधी होऊन जातं हे आपल्याला कळतही नाही. पुढे शाळेत गेल्यावर त्या भेटतात ते “पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकोळले नभ सोसाट्याचा वारा.. ” हे हुबेहूब पावसाळ्याचे शब्दचित्र घेऊन. जेव्हा पाऊस एकसारखी झड लागून सतत बरसत असतो तेव्हा ही पावसाळ्याची आवडती कविता नकळत गणगुणल्या जातेच. तरी पण या प्राथमिक शाळेत भेटलेल्या कवितेतूनही आपल्याला त्यांचं नाव काही ठाऊक नसतंच. आणि त्यांचं नाव कळतं ते त्याकाळी विविध भारतीच्या आकाशवाणी केंद्राकडून सादर होणाऱ्या सांजधारा आणि गीतगंगा या मराठी गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांमधून त्यांची गाणी ऐकतांना. पुढे ते नाव कितींदा तरी कानावर पडतच राहतं इतकं की त्या नावाची आणि आपली चांगलीच गट्टी जमते. त्यांची एकाहून एक सुंदर व वैविध्यपूर्ण गाणी ऐकताना आपण त्यांच्या प्रेमातच पडतो. त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि हो, प्रेम तर आधीच झालेलं असतं, वाटायला लागतो जेव्हा आपण त्यांना थेट टी. वी. वर (किंवा कोणाच्या नशिबात त्यांना प्रत्यक्ष भेटण्या ऐकण्याचा भाग्ययोग लाभला असेल तर अलाहिदा); वेगवेगळ्या मुलाखतींच्या कार्यक्रमांमध्ये बघतो आणि ऐकतो. दूरदर्शनवरील १९९० च्या सुमारास लोकसाहित्य आणि पारंपारिक लोकजीवनला उजाळा देणाऱ्या “रानजाई” नावाच्या एका माहितीपूर्ण मालिकेमध्ये त्यांची लोकजीवनासोबतची नाळ, त्यांचा अभ्यास आणि व्यासंग या सर्वांचा प्रेक्षकांना उलगडा होतो आणि त्याहुनही अधिक त्यांच्या ठायी असलेली विनयशिलता ठळकपणे जाणवते.
शांताबाईंचा जन्म शेळके कुटुंबात १२ ऑक्टोबर १९२२ मध्ये पुण्याजवळील इंदापूर येथे एका सुविद्य कुटुंबात झाला. त्यांची बालपणीची काही वर्षे पुण्याच्या आसपासच्या मंचर, इंदापूर आणि खेड अशा खेड्यामध्ये व सोबतच वडिलांच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या नोकरीच्या गावीही गेलीत. भावंडांमध्ये त्या सर्वात थोरल्या. वयाच्या नवव्याच वर्षी त्यांच पितृछत्र हरवलं. पुढील शिक्षणासाठी त्या महाराष्ट्राचं संस्कृती, कला आणि विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये हुजूरपागा शाळा आणि नंतर एस. पी. कॉलेज मध्ये दाखल झाल्या. मराठी आणि संस्कृत या दोन विषयांमध्ये त्यांनी एम्. ए. केलं आणि त्या मुंबई विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांना त्याच वर्षी सुरु झालेलं न. चि. केळकर सुवर्णपदक खुद्द तात्यासाहेब केळकर यांच्या हस्ते प्रदान केलं गेलं व सोबतच त्यांनी चिपळूणकर पारितोषिकही पटकावले. कॉलेज शिक्षण संपल्यानंतर लगेचच सुप्रसिद्ध नवयुग साप्ताहिकात उपसंपादकाची भूमिका स्वीकारली आणि या योगे त्यांना महाराष्ट्राचं अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते करत असतांनाच त्यांची योगायोगाने मंगेशकरांसोबत ओळख झाली. मंगेशकर कुटुंबीयांसोबत विशेषतः पं हृदयनाथ व लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासोबत सिनेमाची गाणी करताना त्यांचा झालेला परिचय आणि पुढे त्या परिचयाचं मैत्रीत रूपांतर झालं आणि त्यातून वेगवेगळ्या गाण्यांच्या रूपाने उत्तमोत्तम कलाकृती रसिक जणांसाठी निर्मिल्या गेल्यात. हे सर्वश्रुत आहे. त्यांनी सुरुवातीला काही वर्षे मुंबईच्या रूईया कॉलेज आणि नंतर महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापकी केली. त्यांचा पहिला कवितासंग्रह “वर्षा” हा १९४७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाला. त्यांनी तो त्यावेळी गाजत असलेल्या रविकिरण मंडळातील त्यांचे आवडते कवी माधव ज्युलियन, यांना समर्पित केला.
लहानपणी त्यांचा खेड्याशी आलेला संबंध आणि पुढे पुण्यासारख्या अत्यंत नागर संस्कृतीत वावरल्यामुळे त्यांचे साहित्य अत्यंत कसदार, व्यापक, तितकेचं मोहक आणि समृद्ध झाले. त्याला ग्रामीण जीवनमानाचा ओलावा, लोक साहित्यातील लोकगीतांची व लोककथांची सुंदर किनार, लय आणि नाद आहे. शांताबाईंनी काय नाही लिहिलं हा प्रश्नच आहे. बालसाहित्य, समीक्षा, आत्मकथन, कथा, ललित लेख, कविता, गाणी अनुवाद ईत्यादी. त्यांचं मराठी सोबतच संस्कृत, हिदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व होतं. त्यांनी अमेरिकेत स्त्रियांच्या हक्कांविषयी सजग असलेल्या विदुषी लीसा मे अल्कॉट यांच्या सुप्रसिद्ध इंग्रजी “लिटील वुमेन” या कादंबरीचा मराठीमध्ये “चौघीजणी” या नावाने अनुवाद केलायं. महाकवी कालिदासकृत मेघदूत या महाकाव्याचं मराठी रूपांतरही त्यांनी केलयं आणि ते लोकांच्या पसंतीसही उतरले. जागेची मर्यादा लक्षात घेता त्यांच्या इतर अनेक साहित्यकृतींचा उल्लेख करण्याचा मोह, कितीही इच्छा असली तरी टाळते आहे. तरीपण त्यांच्या “धूळपाटी” या अत्यंत वाचनीय आत्मकथनपर पुस्तकाचा नामोल्लेख केल्या वाचून राहवत नाही. त्यांच्या बरोबरीच्या प्रत्येक, अगदी त्यावेळीचे नावाजलेले बंगाली संगीतकार सलील चौधरींपासून ते नंतरच्या तरुण पिढीतील सलील कुलकर्णींपर्यंत सर्वच संगीतकारांनी शांताबाईंच्या शब्दांवर स्वरसाज चढवलायं. वेडात मराठे वीर दौडले सात.. , काटा रुते कुणाला आक्रंदतात कुणी.. , हा माझा मार्ग एकला… यासारखी कितीतरी गंभीर प्रवृत्तीची गाणी लिहिणाऱ्या शांताबाई, ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरूभुरू… शारद सुंदर चंदेरी राती… सारखी हलकी फुलकी उडत्या चालीची गाणी पण लिहितात व इंग्रजी सिनेमाचं समीक्षणही करतात याच नवल आणि कौतुकही वाटतं. समुद्राचा वारा अंगावर न घेतलेल्या शांताबाई वेगवेगळ्या बाजांची अत्यंत लोकप्रिय कोळीगीते रचून जगाला चकीत करतात. शुर आम्ही सरदार… , वेडात दौडले वीर सात.. मराठी पाऊल पडते पुढे… सारखी स्फुरण चढवणारी गाणी, लोभसवाणी नाजूक शब्द बांधणीची कोकणी भाषेतील गाणी जशी महानंदा सिनेमातील फुलाफुलांक पुशीत आयलो तुजे माजे प्रीतीचो गाव.. किंवा मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश.. अशी अनेक वळणांची गाणी त्या सहजपणे लिहीतात. शांताबाई बी. ए. ला शिकत असताना त्यांना आवडलेला एक संस्कृत श्लोक, पुढे त्याचं जीवनाची यथार्थता सांगणारं, मूळ संस्कृत श्लोकाच्या अर्थाला जराही धक्का न लागू देता, एक सर्वांग सुंदर अजरामर गीत होईल याची कदाचित त्यांना देखील कल्पना नसेल. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी.. या अत्यंत सुमधुर, अर्थवाही, सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध केलेल्या, तितक्याचं कठीण चालीच्या या गीताचा जन्म एका संस्कृत श्लोकातून झालायं तो असा.
आजचे प्रथितयश संगीतकार सलील कुलकर्णी, त्यांच्या लपवलेल्या काचा, या पुस्तकात लिहीतात, की मराठी भाषा जर चितारायची झाली तर ती कशी असावी, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणतात की त्यांच्या डोळ्यापुढे चित्र येतं ते शांताबाई शेळके यांच. शांताबाई म्हणजे सुती साडीचा डोक्यावरून घेतलेला पदर, भरदार कपाळावर ठळक मोठं कुंकू, डोळ्यांवर चष्मा व चेहऱ्यावरचं कायम प्रसन्न, सोज्वळ, निरागस हास्य. हाच चेहरा नव्हे का माझ्या माय मराठीचा. शब्दांची शोधाशोध करायची त्यांच्यावर वेळच येत नव्हती. गाठीशी असलेल्या समृद्ध शब्द भांडरातून केवळ शब्द तेवढे निवडायचे. याची पुष्टी करताना त्यांनी एक प्रसंग सांगितला. बेला शेंडें यांनी गायलेल्या आणि सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचा अल्बम करताना त्यांनी शांताबाईंना, त्यांची एक कविता अल्बम साठी देण्याची विनंती केली असता; त्या म्हणाल्या लिहिलेली कशाला आता मी इथे आहे ना, तर तुम्ही चाल बनवा आणि मला त्या चालीचा भाव सांगा, मी त्यावर शब्द देते आणि लगेच आर्जवी भाव असलेलं गाणं झालं सुध्दा, “माझ्या मना रे ऐक जरा, हळवे पणा हा नाही बरा.. ” त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू समोर येतो तो असा की, “जिवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे… ” या अत्यंत भावस्पर्शी गीताबद्दल स्वतः शांताबाई सांगतात की गीतातील जिवलगा हा शब्द माझा नसून हृदयनाथ मंगेशकर म्हणजेच बाळचा आहे. हा त्यांच्या मनाचा खुलेपणा आणि मोठेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक झळाळी देतो व सोबतच त्यांच्या प्रतीचा आदर आणखी शतगुणीत होतो. वयोपरत्वे माणसातील लोपणारी निरागसता “लोलक” या कवितेच्या रूपाने यांनी मांडली. ती वाचतांना त्यातील नितळ, सोज्वळ निरागस भावना मनाला स्पर्शून गेली. तसेच त्यांची “पैठणी” ही कविता वाचताना आजीच्या प्रेमाचा, भक्तीचा आणि एकंदरीतच तिच्या संपूर्ण संसाराचा पट डोळ्यासमोरून सरकतो अन् मनात एक मायेचा पाझर. झिरपतो. हायकू हा जपानी काव्य लेखनाचा प्रकार सुद्धा शांताबाईंनी लीलया पेलला. आईने त्यांच्यावर केलेले निसर्ग प्रेमाचे संस्कार त्यांच्या कवितांमधून आपल्याला जागोजागी भेटत असतात. याची पावती देणारं हे छोटंसच हायकू बघू या. “देवळातली प्रचंड घंटा नाद करेना धजू, तिच्या कडेवर गाढ झोपले, एकच फुलपाखरू”
आयुष्यात त्यांनी काही सन्मानाची पदे भूषवलीत आणि त्यांच्या अफाट प्रतिभेला सलाम करत त्यांच्या वाट्याला काही गौरवाचे क्षणही आलेत. त्यापैकी काही इथे नमूद करावेसे वाटतात. त्यांनी चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ साली आळंदी इथे संपन्न झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश… या गाण्यासाठी सूर सिंगार हा पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग), १९९६चा ग. दि. माडगूळकर गीतलेखन पुरस्कार, मराठी साहित्यातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं. अशा या शब्दशारदेने आयुष्यभर केवळ शब्दांचीच पूजा बांधली. त्यांनी त्यांच्या दैवताला आळवतांना जय शारदे वागेश्वरी… हे भक्ती, बुद्धी आणि सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना असलेलं अत्यंत सुमधुर गीत देवी शारदेच्या चरणी वाहिलं. अशा ह्या मराठी भाषेच्या कंठातील मोत्यांच्या तन्मणीतून एक पाणीदार मोती ६ जून २००२ रोजी ओघळला आणि एका शब्दयात्रेचा जिवंतपणीचा प्रवास संपुष्टात आला. अभिजात मराठीच्या आसमंतात शांताबाईंच्याच शब्दात सांगायचं झालं तर “असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे. अगदी खरंय शांताबाई, या अथांग शब्दसिंधु कवेत घेऊन मिरवणाऱ्या या शब्दशारदेसमोर आम्ही नतमस्तक आहोत.
┉❀꧁꧂❀┉
© डॉ. नेहा विनोद भटकर
अमरावती
मो ९९७५०३०६२७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





