श्री सुधीर करंदीकर

??

☆ “Nothing is impossible…” ☆ श्री सुधीर करंदीकर

दोन दिवसांपूर्वी काही कामाकरता शनिवार पेठेत गेलो होतो. मार्केटमध्ये फिरता फिरता एका स्टेशनरी दुकानापाशी पाय थांबले. डोक्यात विचार आला एक इंग्रजी टू मराठी डिक्शनरी विकत घ्यावी. म्हणजे रोजचा इंग्रजी पेपर वाचताना काही शब्द अडले तर पटकन डिक्शनरी मध्ये अर्थ बघता येईल. आणि रोज चार नवीन इंग्रजी शब्द पाठ करायचे असे पण ठरवून करता येईल.

इंग्रजी शब्दांचा अर्थ गुगल वरती पण बघता येतो, पण पेपर वाचताना / आंघोळ करताना / जेवताना / देवपूजा करताना / बाहेर वॉकिंग करायला जाताना / बायकोशी गप्पा मारताना, मी मोबाईल कधीच जवळ ठेवत नाही.

दुकानात गेलो आणि डिक्शनरी बद्दल विचारले. दुकानदारानी दोन डिक्शनरी दाखवल्या. दोन्हीची जाडी साधारण सारखीच होती, पण एकाची किंमत 150 आणि दुसरीची किंमत 75.

दुकानदार म्हणाले की 150 किंमत आहे ती आपली नेहमीची डिक्शनरी आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सगळे शब्द बघायला मिळतील. आणि 75 किंमत आहे ती डिक्शनरी नेपोलियनची आहे. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये Impossible हा शब्द दिसणार नाही. बाकी सगळे शब्द दिसतील.

माझ्या मनात विचार आला डिक्शनरी मध्ये इम्पॉसिबल शब्द पण नक्कीच पाहिजे कारण कधी पेपर मध्ये impossible शब्द आला, तर त्याचा अर्थ बघायला डिक्शनरी पाहिजेच ना.

मी 75 ची डिक्शनरी हातात घेतली आणि बघायला लागलो.

डिक्शनरी च्या मुखपृष्ठावर नेपोलियन चा फोटो होता आणि खाली लिहिलेले होते – 

ही नेपोलियनची डिक्शनरी आहे त्यामुळे यामध्ये Impossible हा शब्द नाही. कारण  Impossible म्हणजे अशक्य.

नेपोलियन म्हणायचे – 

  • जगामध्ये काहीही अशक्य नसते.
  • आणि हे साधण्याकरता प्रयत्न या शब्दाशी मैत्री करा,
  • मदत माग मदत तयार आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा,
  • ईश्वराचे नामस्मरण सतत सुरू ठेवा..

मी विचार केला – Impossible हा शब्द डिक्शनरी च्या आत ‘I’ या पानावर नसला, तरी काही हरकत नाही, कारण जरूर पडली तर पहिल्या पानावर या शब्दाचा अर्थ मला नक्कीच बघता येईल.

मी लगेच 75 रुपये दिले आणि डिक्शनरी घेतली.

दुसऱ्या दिवसापासून इंग्रजी पेपर उघडताना मी रोज डिक्शनरी बाजूला ठेवायला लागलो. आणि त्यामुळे रोजच डिक्शनरीच्या मुखपृष्ठावरचे आपोआपच वाचण्यात यायचे की – जगामध्ये काहीही अशक्य नसते. आणि हे साधण्याकरता प्रयत्न या शब्दाशी मैत्री करा, मदत माग मदत तयार आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, आणि ईश्वराचे नामस्मरण सतत सुरू ठेवा..

मला अगदी रोज या वाचण्याचा खूप फायदा होत आहे. आणि त्यामुळे रोजच्या, या न त्या कारणावरून – हे मला जमणार नाही, हे कसं करता येणार, हे शक्यच नाही, वगैरे वगैरे असे विचार मनामध्ये आता कधीच येत नाहीत.

अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी लगेच शक्य होतात, काही वेळा, थोडा वेळ लागतो. आपण न थांबता प्रयत्न चालू ठेवले, तर कधी दोन दिवस लागतात, कधी आठवडा लागतो, कधी जास्त पण वेळ लागतो, पण ठरवलेले काम होते हे मात्र पक्के.

अमुक अमुक मला करता येणार नाही असे आता मला कधीच वाटत नाही आणि त्यामुळे मन कायम उत्साही राहते.

चला तर मग, आपण सगळेचजण नेपोलियन यांचे स्मरण करून त्यांचे बोधवाक्य वाक्य – नथिंग इज इम्पॉसिबल, आपल्या आंतरमनामध्ये कोरूया, आणि मनामधल्या / स्वप्नामधल्या निरनिराळ्या आघाड्यांवरती विजय मिळवूया, आणि नेहमीच मिळवत राहूया….. आणि तो पण आनंदात आणि हसत खेळत.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
अ.ल. देशपांडे.उमरीकर, अमरावती.
0

वंदेमातरम् सुप्रभातम्

मी आता ती डिक्शनरी येथे मिळते का ते शोधतो.
कारण पुणे तिथे काय उणे ?
दुसरे असे की माझ्या लहान खोलीतील भिंतीवरील अनेक तसबिरीतील एक कमी करून तिथे नेपोलियन बोनापार्ट चा फोटो व त्या खालती तुमच्या लेखातील वाक्यं ठळक अक्षरात लिहून घेणार आहे.

Nothing is impossible.
चुरचुरीत लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन, सुधीर .