श्री जगदीश काबरे

??

☆ अंकुर… ☆ श्री जगदीश काबरे ☆

एक पोरगं सतत प्रश्न करत होतं, हे असंच का अन तसेच का?

मी दम देऊन पाहिला… ते ऐकेच ना

मी धमकी दिली.. “नाही ऐकलंस तर शिक्षा करीन. “…. तरी ते विचारतच राहिलं.. शेवटी मी एक कानाखाली ठेवून दिली. पोरगं तिरमिरत जाग्यावर जाऊन बसलं… वर्गात भयाण शांतता.

मी मात्र खदखदून हसत होतो – – 

“कशी जिरवली एकेकाची… आता विचाराल का प्रश्न? आता कराल का चिकित्सा? हा हा हा हा हा!!”

…. मी गगनभेदी हसत होतो…

इतक्यात एक दुसरी पोर पुढं आली. म्हणाली, “तुमच्या हसण्याचं कारण समजलं नाही. “

तिला मधेच अडवत मी पुन्हा हसत राहिलो…

“ह्या ह्या ह्या, नाही समजलं ना… समजणारही नाही… मी रोज करेन तुमच्या प्रश्नांचे खून… छाटून टाकीन सर्व प्रश्नांच्या आवाजांचे देठ.. चिरडून टाकेन चिकित्सेचा प्रत्येक कोंब… हे असंच चालत आलंय.. अन

असंच चालत राहील… हाहाहाहाहा! “

पोर हसली अन् म्हणाली, “नीट ऐकून तर घ्या ना, तुमच्या हसण्याचा अर्थ आम्हाला समजला नाही असं नाही….. पण, मला प्रश्न पडलाय की बदलांना एवढं का घाबरता? का घाबरता प्रश्नांना? तुमच्याकडे यांची उत्तरं नाहीत हे स्पष्ट कबूल करा ना! ..

.. कबूल करा की, नवविचारांची भीती वाटते. तुम्ही नाही देऊ शकत आमच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं!

जे आहे ते तसंच राहील यावर आमचा विश्वास नाही. विवेकाच्या प्रवाहाला धरणांचा बांधही अडवू शकत नाही. आजवर कित्येकांना चूप बसवलंत तुम्ही, प्रश्न विचारला, चिकित्सा केली म्हणून धमक्याही दिल्या…

शिक्षाही केल्यात… अन् संपवलतही! पण आता बस्स!!

…. आता प्रत्येक आवाज उठेल.. आता प्रत्येकाला प्रश्न पडेल.. आता प्रत्येकजण वादात उतरेल.. प्रत्येकजण विवेकासाठी झगडेल…!

मी अवाक होऊन पाहत होतो….

मी कुणी फॅसिस्ट होतो..

अन ती कुणी विवेकवादी विचारांचा एक छोटासा अंकुर….!!

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted