मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विसर्जन… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? विसर्जन…? श्री आशिष  बिवलकर ☆

विसर्जन करून आलो,

मखर भासते सुनेसुने |

उडाली रंगत सजावटीची,

भरलेले घर वाटे उणे उणे |

*
मन झाले अस्वस्थ,

चलबिचल झाली मनाची |

लक्ष पुन्हा जाई मखराकडे,

आठवण येते गणाची |

*
सजल्या मखरात,

उरला शंख आणि वाळू |

बाप्पा गेला गावाला,

कटू सत्य हे कसे टाळू |

*
नवा दिवस उजाडेल,

सुरु होईल राहटगाड |

घड्याळाचा काटा,

धावेल मागे जीवापाड |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ या अवघड वाटेवर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? या अवघड वाटेवर…? श्री आशिष  बिवलकर ☆

 

डोईवर पाट धरला,

अंत:करण झाले जड |

वाट विसर्जनाची,

चालणे झाले अवघड |

*

भाव दाटले मनी,

नयनी अश्रू धारा |

आसवांनी भिजून माझा 

गेला देह सारा |

*

धीर देती मंडळी,

हात ठेवुनी पाठीवर |

सोबत त्यांची हवी वाटते 

या अवघड वाटेवर |

*

पार्थिव रुपी बाप्पाचे,

जरी आज विसर्जन |

भक्तीभावाने भरलेले,

असेल नित माझे मन |

*

निरोप देतो तुम्हा आता,

जुळले माझे दोन्ही कर |

आमंत्रण आम्हा सर्वांचे,

पुढल्या वर्षी या लवकर |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ यामिनी भाळे निशिगंधावर… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? यामिनी भाळे निशिगंधावर…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रजनीगंधा उमलून आली 

सुगंध चोहिकडे 

भिरभिर भिरभिर फुला फुलावर

फुलपाखरू बागडे

*
यामिनी भाळे निशिगंधावर

धवलांगी चांदणं कांती 

चषक भरावे अत्तर घेऊन 

निसर्गातली प्रसन्न शांती 

*
चंद्र म्हणाला चांदणं टिकल्या 

धरणीवर का गेल्या 

सुगंध घेऊन निशिगंधाचा 

जणू सुवासिनी सजलेल्या 

*
धवल चंद्रिका शृंगाराने

खुणावते वाऱ्याला

आला आला बहर फुलांचा 

पुष्पगुच्छ घेऊन आला

*
गंधकुपी ती हळूहळू उघडे

कलिका खुलवत येतो

सुगंध मजला वेड लावतो 

अत्तरफाया देतो

*
हार तुऱ्यातच शोभा याची 

जिकडे तिकडे दिसतो 

गजर्‍यामध्ये, प्रभु चरणावर 

निशिगंध सुखावून हसतो

*
शब्द देऊनी मला म्हणे तो 

कर माझ्यावर कवने 

या जगताने ऐकावी या 

गुलछडीवरची स्तवने

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रेमाची आरास… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रेमाची आरास… ? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

पदकमलाच्या सौंदर्याला, पैंजणांचा कडा गं..

माथ्याच्या मधोमधी, कुंकवाचा टिळा गं..

*
दरवाजाच्या उंबऱ्यावर, वाट पहाते वेडी गं..

सांजवेळी व्याकुळ सजनी, माळून गजरा सजली गं..

*
नेसली साडी हिरवी, हातात छननन बांगड्या गं..

अंगणी झुल्यावर राधा, मोहन होईल बावरा गं..

*
येता धून बासरीची, हरखून ती जाते गं..

गीत होईल ती त्याची, तो तिचा आलाप गं..

*
प्रेमाच्या त्या पाऊलखुणा, ओल्या मातीचा सुगंध गं..

फुललेल्या त्या फुलांमध्ये, प्रेमाची आरास गं..

*
ती बाहुली होऊन सावली, रंग केशरी उधळी गं..

भेट होता त्या वेड्यांची, चंद्र तारे खुलले गं..

*

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बाप्पा.. दे यांना सद्बुद्धी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बाप्पा.. दे यांना सद्बुद्धी..  ? श्री आशिष  बिवलकर ☆

 

टिळकांनी केली उत्सवाची प्रथा |

पारतंत्र्य व्यथा | सोडवाया ||१||

*
उद्देश सरळ | समाज जागृती |

स्वातंत्र्य स्विकृती | जनतेत ||२||

*
दूरदृष्टी त्यांची | स्थापली मंडळं |

लढण्यास बळ | एकजूट ||३||

*
मिळाले स्वातंत्र्य | आली लोकशाही |

सार्वभौम ग्वाही | भारतात ||४||

*

दुर्दैव सणाचे | बदलला काळ | 

फासे हरताळ | वर्तनाने ||५||

*

मिरवणुकीत | डीजेचा आवाज |

मंडपात माज | सद्यस्थिती ||६||

*

बिब्बा म्हणे बाप्पा | दे यांना सद्बुद्धी |

उत्सव समृद्धी | वाढवाया ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खरे लंबोदर कोण ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ खरे लंबोदर कोण ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

क्रोध तव मुखावर दिसतोय 

आम्हां भक्तांना गणराया,

चार पाच तासांचा प्रश्न आहे 

तुम्हां सभामंडपी विराजाया !

*
दुखू जरी लागले तुमचे पाय

नाही त्याला काही ईलाज,

नेहमी पावसाळ्यात “रस्ते”

सोडतात स्वतःची “लाज!”

*
बुद्धी वाटतांना सकलजनां 

मुद्दामच वगळता “त्यांना, “

फक्त विसरू नका म्हणता,

कधीच “दामाजी पंतांना !”

*
दरवर्षीच्या पावसाळ्यात 

करोडो खड्ड्यात जातात,

हिशोब नाही त्यातले किती 

“लंबोदरात” गडप होतात !

*
त्रास सोसा आता दरवर्षी

करतो विनंती माफी मागून,

अठ्यात्तर वर्ष झाली तरी 

लंबोदर त्यांचे भरे ना अजून !

लंबोदर त्यांचे भरे ना अजून !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नैवेद्य – कवी : A. K. मराठे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नैवेद्य – कवी : A. K. मराठे ?  प्रस्तुती –  सुश्री नीलांबरी शिर्के 

“दाखवता” की “अर्पण करता” 

त्यावर सारं अवलंबून 

शब्द वापरताना सुद्धा 

एकेक अक्षर वापरा जपून ll

*
तुम्ही नैवेद्य “दाखवलात” 

तोही फक्त सुख “दाखवेल” 

प्रेमभराने अर्पण केलात

तोही सुख ढीगभर पाठवेल ll

*

नैवेद्याच्या पानावरती

काय वाढता गौण असतं

कसं वाढता त्याच्यावरती

देवाचंही प्रेम बसतं ll

*

एक वाढा, एकवीस वाढा

मोदक तो खातो थोडाच

त्याला फक्त भावाची भूक

त्याला वरणभातही गोडाच ll

*

घरातल्यांना, पै पाहुण्यांना

जसं वाढता आग्रह करून

तसाच त्याचा नैवेद्य वाढा

मनात प्रेम, भक्ती भरून ll

*

बाप्पा आणखी वाढू का

खा आणखी थोडं तरी

आग्रहाने म्हणून बघा

त्यालाच म्हणतात भक्ती खरी ll

*

दहा दिवसात एकदा तरी

असा नैवेद्य “अर्पण” करा

“मोद”कांची तुमच्यावरती 

वृष्टी करील खात्री धरा ll

कवी : AK (काव्यानंद) मराठे, कुर्धे, पावस, रत्नागिरी

 9405751698

प्रस्तुती : नीलांबरी शिर्के 

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “देव चिंतामणि आले हो अंगणी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – देव चिंतामणि आले हो अंगणी – ? ☆ श्री सुहास सोहोनी

🌹

भाद्रपद मास, चतुर्थीचा दिस

सज्ज स्वागतास, स्वर्ग साती

हासत नाचत, गायन करीत

आले गजानन, गणपती…

🌹

आले हो अंगणी, देव चिंतामणी

सुखाची पर्वणी, नेत्रा वाटे

काय वर्णू रूप, काय वर्णू तेज

भाषा शब्दकळा, थिटी वाटे…

🌹

मेखला कटीस, घुंगरू पायात

नादबद्ध लय, साधतसे…

स्थूलाचे सौष्ठव, नयनी मार्दव

अंतरी लाघव, नांदतसे…

🌹

नृत्य दर्शविते, लालित्य पदांचे

शुंडा आणि कर्ण, हिंदळती…

प्रसन्न चित्ताने, हासर्‍या मुद्रेने

आनंदाची फुले, उधळिती…

🌹

एका हाती पुष्प, कमळाची शोभा

तेज परशूचे, दुजातुन

तृतीय करात, मोदक प्रसाद

लाभे आशीर्वाद, चौथ्यातुन…

🌹

गृहासि आमुच्या, लावावे चरण

हर्षोल्लासे तुम्ही, गणराया

कृपेचा कटाक्ष, राहो आम्हावरी

असो द्या स्मरणी, देवराया…

🌹

सानुल्या मूषका, भार वहाण्यासी

देता बळ तुम्ही, गजेंद्राचे

गौरिपुत्रा तैसी, द्यावी शक्ति आम्हा

आणायास राज्य, सद्धर्माचे…

🌹

©  श्री सुहास सोहोनी 

दि. २७-०८-२०२५

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुदाम्या खरंच भाग्यवान आपण ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुदाम्या खरंच भाग्यवान आपण  ? श्री आशिष  बिवलकर ☆

स्वर्गातल्या रोजच्या कामाला

कंटाळून भगवंताने मारली दांडी |

भगवंत अवतरले सुदाम्यासंगे

बघायला भूतलावरची दहीहंडी |

*
कुठे जावे विचार करून

आले दोघेही मुंबापुरीत |

आपला जयघोष ऐकून

हायसे वाटले या नगरीत |

*
भगवंत आश्चर्याने म्हणाले

कोणाचे प्रयत्न चालले अथक |

सुदामा हसत हसत उत्तरले

हे मुंबईतले गोविंदा पथक |

*
दही हंडी का रे टांगली 

त्यांनी इतक्या उंचावर |

पुढाऱ्यांनी महत्वाकांक्षेचे

लावलेत इथे थरावर थर |

*
मडक्यात काय घातलंय 

दही का नुसतेच पाणी |

व्यासपीठावरच्या मंडळीनीच

आधीच मटकवलंय लोणी |

*
अरे त्या कोण नाचताहेत 

तिथे त्या सुंदर गौळणी |

सेलिब्रिटी तारका डोलती 

डीजे वरची कर्कश्य गाणी |

*
लोणी नाही तर मिळेल का 

थोडंसं दूध अन् दही |

जीएसटी लागलाय आता 

प्रश्न विचारता तुम्ही काही |

*
सुदाम्या भाग्यवान आपण

द्वापार युगातच सरलो |

कलयुगात नामस्मरणासाठी

पोथीतच नाममात्र उरलो |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आत्मघात! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आत्मघात! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

कौरवांनी वागण्याचे

ताळतंत्रच सोडले

देशहिता सोडूनीया

वैरी हिताशी जोडले!

*

कौरवांची कूटनीती 

परकियांना धार्जिणी

बंद मुठीचे मागे मनगट

सांगेल यांना का कुणी!

*

 घरातल्या चोरवाटा

 वैऱ्यास का हे दावती

 आत्मघात करुनी हे

 कळे न काय साधती???

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares