मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ किती देखणी गांधारी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? किती देखणी गांधारी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

भावगीत (वर्ण संख्या सोळा यती आठव्या अक्षरावर)

शालू नेसलं शिवारं काठ त्याचे जरतारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

कांगोण्याची फुले छान चांदण्याच आकाशीच्या

सप्तरंगी उमलल्या कळ्या पहा टनटनीच्या

झाली कुंपणं साजरी शिवाराला राखणारी

बा़धाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

चार पाकळ्याचे फूल गुच्छागुच्छाने उमले

तिच्या मोहक गंधात मन माझेही रमले

वैद्य आहे ही जालीम खोड मूळं पाने सारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

पायवाट नागमोडी दिसतात गोड फुले 

लक्ष वेधती साऱ्यांचे पुष्पगुच्छ पहा डुले

रंगपंचमी चालली हिरव्या पानात न्यारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

रानामध्ये पिकं डोले बांधावर रंग सारे

किती मस्तीत वाहती शिळ घालणारे वारे

शेतीमाती चैतन्याने रंगरूपे सजणारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

नववधू माती झाली तिला साज घाणेरीचा 

फुला फुलांनी सजला हिरवा पदर तिचा 

फुलावर विसावती फुलपाखरांची स्वारी 

बांधा बांधावर आली किती देखणी गांधारी

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ थुई थुई थुई थुई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

?️?  चित्रकाव्य  ?️?

? थुई थुई थुई थुई…  ? ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

थुईथुई थुईथुई नर्तन याचे मोतीच सांडती

थयथय थयथय पाऊस धारा तुफान मांडती

गडगड खडखड धडधडधडधड ढगांचे भांडण

थरथरथरथर कापती धारा अंगणी सांडती…

कडकडकडाड बिजली नाचे ढगांना कापते

चाबूक घेऊन हाती आपुल्या जलद चोपते

धडाडधूम त्या ढग पालख्या धावत सुटती

मोती मोती जिकडे तिकडे सरीच ओघळती…

 *

थेंब टपोरे पाणीदार ते चमचम करती

डेरेदार ती झाडे सारी अलगद झेलती

न्हाऊन निघती निथळत सारे आनंदे डोलती

तृणपाती नि उंच माड ते प्राशन करती…

 *

सळसळ सळसळ नागीण धावे फुफाट ते पाणी

सरसर सरसर पाऊसधारा गाती पहा गाणी

मध्येच थरथर मध्येच गरगर वारा ही नाचतो

शिरशिरी येई अंगावरती तुषार उडवितो..

 *

खेळ चालतो मोर नाचतो झाडे ही नाचती

ये रे ये रे भिजव अंगी पावसास सांगती

जिकडे तिकडे पाऊस धारा पाऊस पसारा

लहरी राजा मध्येच नाचत टपटपती गारा…

 *

खडखड दडदड पत्रे वाजती पक्षी भेदरती

निथळती झाडे पानाआड ती आसरा शोधती

भिजून चिंब ओले अंग वसुंधरा ओली

जिकडे तिकडे कलकल कलकल ओलीच

ती बोली…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काय असेल सुखाचे रहस्य? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? काय असेल सुखाचे रहस्य?  ? श्री आशिष  बिवलकर ☆

दोघांच्या जीवनात,

जरी अंधाराचा वनवास |

भरवतात एकमेकांना,

प्रेमाने सुखाचा गोड घास |

*

तिमिर ही लाजला,

पाहून उजळलेले हास्य |

विचारात पडला,

काय असेल सुखाचे रहस्य |

*

ना दिसला त्यास,

न्यूनतेचा त्यांच्या चेहऱ्यावर भाव |

अंधार जरी असला,

विश्वासाने चालला संसाराचा डाव |

*

काळा रंग सोडला,

दुसरा रंग नाही जीवनात |

आनंदाचे सप्तरंग,

कोठून आले या वर्तनात |

*

संघर्ष जरी असला पदोपदी

आपुलकीचा आहे त्यात विसावा |

चाचपडणाऱ्या जीवनात,

आशेचा किरण असाच दिसावा |

*

आंधळ्याच्या गायी,

म्हणे देव राखतो |

सत्कर्माची फळे,

आनंदाने चाखतो |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ (अ) शांती दूत! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ (अ) शांती दूत! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

शांतीदुताच्या अस्तित्वावरून

जणू युद्ध पेटले

अहिंसेचे पुजारी हाती

शस्त्र धरू म्हणू लागले

*
स्वर्गी भगवान महावीर

अश्रूपात करू लागले 

महानगर पालिकेने

आता कबुतरखानेच झाकले

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जिवलग मित्र सारे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जिवलग मित्र सारे ? श्री आशिष  बिवलकर ☆

जन्माला जरी आलो एकटा,

मित्रांनी नाही जाणवून दिले एकटेपण!

अनेक सुख दुःख आली,

हाक न मारता धावून आले सारेजण!

*
बालपणी खेळी एकत्र दमलो,

तारुण्यात मौजमस्तीत रमलो!

तिसरा अंक येईल तेव्हा येईल,

वर्तमानात एकमेकांसाठी जमलो!

*
कधी जरी उदास वाटे मनाला,

डोळे पाहून मनातले सारे वाचतात!

कष्ट करून यश मिळते तेव्हा,

माझ्यापेक्षा तेच आनंदाने नाचतात!

*

आर्थिक प्रगती पुढे मागे असे,

तुलना सुखाची कुणा अंतरी नसे!

एकाच कट्ट्यावर एकत्र सारे बसे,

निखळ मैत्रीचा भाव हृदयात वसे!

*

आयुष्यभर साथ दिलीत,

भावनांचा केला नाही कधी धंदा!

अमरपट्टा नाही घेऊन आलो,

जाईन तेव्हा मित्रांचाच मिळू दे खांदा!

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ राखीचा धागा ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? राखीचा धागा  ? श्री आशिष  बिवलकर ☆

दगडांच्यात आयुष्य,

दगडाचा बसायला पाट!

पारणं डोळ्यांचं फिटलं,

पाहून रक्षाबंधनाचा थाट!

*

रस्ता बनवता बनवता,

मुलं बाळं वाढती रस्त्यावर!

सणवार त्यांनाही असतात,

पण हक्काचे कुठे नाही घर!

*

विंचवासारखे बिऱ्हाड,

फिरे गावोगाव पाठीवर!

पोटासाठी मोलमजुरी,

नशिबाने बांधल्या गाठीवर!

*

रंक असो वा राव,

भावा बहिणीत तेवढीच ती ओढ!

आपल्या आपल्या परीने ते,

साजरा करती सण आनंदाने गोड!

*

राखीचा धागा,

सोन्याचा असो वा रेशमचा!

मनगटाला शोभे,

भाव दोघांच्या मनी आपुलकीचा!

*

औक्षणाचे ताट नसले तरी,

नेत्रज्योतीने बहीण करते औक्षण!

रक्षण कर छोट्या भाऊराया,

तुझे प्रेम तिच्यासाठी जगी विलक्षण!

*

चिंधी बांधे द्रौपदी,

हरी धावला तिच्या रक्षणाला!

रक्ताचे नव्हते नाते,

जागला चिंधीच्या बंधनाला!

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खरंच हे असं कसं झालं… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खरंच हे असं कसं झालं ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

ज्योतीबा एक बरं झालं 

अन सावित्रीला शिकवलं 

तुम्ही सावित्रीचे शिक्षक

तिने पोरींना शिकवलं 

*

सावित्रीबाईंचा अभिमान

गातो आम्ही तुमचे गान

पोरींच्या शिक्षणावर देतो

मुलांबरोबरीने सतत ध्यान

*

पण – – 

पोरी शिकल्या शहाण्या झाल्या

पैसे कमवायचे मशीन झाल्या

घर.. पोर.. सासू सासरे

करियरच्या अडसर झाल्या

*

जेवण मागवून खाता येतं 

पार्सलवर जेवण येतं 

जबाबदारीस वेळ नाही

आणि कुटुंबही छोटं होत जातं 

*

करियरमधे आईपण अडचण

तिथं गर्भाशय भाड्याने घेणं 

ज्यांच्यासाठी कमवायचं 

ते केअर टेकरवर सोपवायचं

*

विचार करून थकून गेले

खरंच हे असं कसं झालं 

सावित्री तूच सांग बाई आता 

आमचं कुठे काय चुकलं….

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गुलबक्षी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गुलबक्षी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

तिन्ही सांजेला दिसते झाडा झाडावर नक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

*
वेळ अजबच हिची श्रावणात बहरते

भादव्यात गणेशाच्या अंगावर लहरत

चंद्रकंठ म्हणतात चंद्रप्रकाश हा रक्षी

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

*

देशामध्ये विदेशात आहे खूप हिची ख्याती

संध्या मालती होऊन नित्य बहरत जाती

कधी गुलाबी पांढरी वेधतसे जणू लक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी 

 *

कोणी जांभळी चमेली, बहुरंगी निशाचर

कुठे असरुमा नामे कुठे सूर्यास्त सुंदर

मधु कण हिच्यावर गोळा करी मधुमक्षी

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

 *

कुठे रात्रीची ही राणी आणि गोधुली गोपाल

हिच्या संगतीत रमे सानथोर किती काल

शांत निशांत वेळेला सूर्य चंद्र हिच्या कक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी 

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सोनचाफा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “सोनचाफा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

तेजस्वी रुप पाहता

मन मोहरुन गेले 

अंतरीच्या वेदनांचे

सुगंधी फूल झाले.

*

मकरंद गोड हृदयी

मज मोह आवरेना

देखणे इतके फूल

मज तोल सावरेना

*
भाव गंध दरवळ 

मज ध्यास सोडवेना

हळूच स्वल्प न्याहळे

परी दूर लोटवेना

*

सद् विचार मानवी

अवीट या चाफ्यापरी 

अलगद स्पर्श होता

सुगंध ओंजळभरी 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ब्रम्हानंदी ऐसी लागली टाळी ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ब्रम्हानंदी ऐसी लागली टाळी  ? श्री आशिष  बिवलकर ☆

वेड लावलेस पांडुरंगा,

चरचरात तूच दिसावा |

पंढरीच्या वाटेवर ऐसा,

सुखे निद्रा गोड विसावा |

*
आकाश घेतले पांघरूण,

अंथरुण झाली धरणी |

शेजारी बैसली वृंदा,

हरी सुखाची पेरणी |

*

गात्र जरी थकली आता,

ओढ तुझी पायांत आणते बळ |

झरझर पाऊले पडतात,

चाखाया हरी दर्शनाचे फळ |

*

अठ्ठावीस युगं तू उभा,

पुंडलिकाच्या त्या विटेवर |

संसार जगाचा हाकतोस,

दोन्ही हात ठेऊन कटेवर |

*

वैष्णवांचा सोहळा रंगे,

चंद्रभागेच्या वाळवंटी |

तहान भूक विसरून,

लेकरं माऊलीच्या भेटी |

*

चालून चालून पडल्याजागी 

ब्रम्हानंदी ऐसी लागली टाळी |

अशा वेड्या भक्तांची पायधूळ,

सखा पांडुरंग लावतो कपाळी |

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares