सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
वैशाखात बहावा तू …
सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
☆
चैत्र घेऊन रे आला तुझ्या सुवर्ण रुपाला
वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला
*
पोपटल्या पानामध्ये किरमीजी रे फुलोरा
नववधू भासतो रे हळदुला तुझा तोरा
राजवृक्ष म्हणती रे सोनवर्खिल्या तनाला
वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला
*
कधी किरीट सोनेरी कधी वाटे कानडुला
तुझ्या संगती सजला चैत्रगौरीचा रे झुला
पखरण झाडाखाली वसंत वैभव ल्याला
वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला
*
किरणात कोवळ्याश्या तव् रुपाचा बहर
सोन पिवळे झुंबर किती देखणे सुंदर
टपटप फुलवंती माझ्या खुलवते गाला
वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला
*
कर्णिकार झाला तू रे राम सीतेचा सांगाती
आरग्वध, आरेवत, व्याधीवत तुझी ख्याती
सुवर्णक नी स्वर्णांग म्हणती तुझ्या वृक्षाला
वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला
*
तुझ्या फुलमाळा मला शब्द सुर साथ देती
मंद सुगंधी झुळूक फुले कवेत रे घेती
गीत ओठावर येते संगीताचा नाद त्याला
वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





