मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆ 

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमी सारखी ओरडली, “काय आहे भाजीला?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,….” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले”

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी” – भाजीवाली

“पन्नास पैशाला दे, चार घेते” – आई

“नाय जमणार मावशी “- भाजीवाली

“मग राहू दे”  – आई

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन” – भाजीवाली

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते” – आई

“नाय जमणार” – भाजीवाली

.. आणि पुन्हा गेली

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवली का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन , मग सैपाक, मग जेवण” – भाजीवाली. 

“थांब जरा. बस इथं. मी आले” म्हणत, आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात तिला आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळं दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू  एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिले.”*

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

—-“ व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये”…. 

 

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने…) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

घरात परतत असू………. च्या पुढे?

आजीने केलेले ताजे लोणचे आमटी भात तोंडल्याची भाजी खाताना जेवणाची मजा येत असे. तसे पूर्वी भाकरी पोळी कमीच दोन्ही वेळा भातच असे. भाकरी संध्याकाळी तांदळाच्या गरम गरम आजी पंगत बसली की करत असे त्या भाकरी सोबत नारळाची लसुण व लाल तिखट, किंचीत आंबट घातलेली चिंच मीठ साखर आणि पाट्यावर वाटलेली चटणी लज्जतदार लागे.

असे करत रात्रीची जेवणे झाल्यावर, अंथरुणं पडतं फार उन्हाळा व उकाडा वाढला की मागच्या दारी घातलेल्या तात्पुरत्या मांडवात बिछाने घालत वार्यावर झोप लगेच येई काही वेळा गप्पा रंगत. मोठा मामा भुताच्या गोष्टी सांगत असे. त्यामुळे सुरुवातीला उत्कंठा वाटे पण नंतर बोबडी वळे. गिर्हा, जखीण, मुंजा, अशी काहीतरी नाव असत रात्रीच्या वेळी ते अधिकच भयप्रद होई. मग अंगाचे मुटकुळे करून डोक्यावर पांघरूण घेऊन डोळे गच्च मिटले जात. सकाळ कधी होई ते कळत नसे.

सकाळी उठून प्रात:र्विधी आवरण्याची घाई असे. तोंड धुण्यापासून सर्व मागच्या हौदावर जाऊनच करावे लागे. हल्ली सारखी घरातल्या घरात बेसिन नळाला पाणी अशी सोय नव्हती. शौचालाही खूप लांब घरापासून पाचशे फूट अंतरावर जावे लागे. पत्र्याची चौकोनी बांधलेली बंदिस्त खोली मागे चर पाडलेला असे. लहान मुलांसाठी लांब लाकडे टाकून केलेली तळात चर असलेली व्यवस्था म्हणजे त्याला ठाकुली म्हणत.

हौदात पाणी येण्याकरता विहिरीवर रहाट असत. मोठे लाकडी चक्र त्यावर सुंभा च्या दोरीने आडवे बांधलेले पत्र्याचे डबे किंवा मातीचे पोहरे म्हणजे मडके असे. त्या चक्राचा लांब दांडा विहिरीच्या बाहेरच्या बाजूला असे त्याला ही लाकडी चक्र जोडलेले असे आणि वरून खाली उभा खांब जमिनीत उभा केलेला असे. त्या खांबाला दुसरा एक आडवा बांबू जोडून ते जोखड बैलाच्या पाठीला बांधत बैलाच्या डोळ्यावर झापड बांधलेले असे मग त्याला जुंपले की तो गोल गोल फिरत राही.म्हणजे चाकांना गती मिळून रहाट फिरू लागे तसतशी एक एक पोहरा विहिरीत सर सोडलेल्या माळे वरून पाण्यात बुडे व भरून निघून रहाटावरून उलट होत वरच्या बाजूला जोडलेल्या पत्र्याच्या पन्हाळात उलटा होऊन पाणी पडे ते पुढे सिमेंट बांधलेल्या दांड्या तून थेट वेगाने हौदाकडे वाहू लागे मग टाकी भरून घेतली जाई

त्याच पाण्याने खाली गुरांना पाणी प्यायची टाकी असे तीही भरे मग या दोन्ही टाक्यांची तोंडे गच्च कपड्याच्या बुचाने रोखली जात आणि पाणी नारळ पोफळीची जी बाजू त्यादिवशी पाणी सोडायची असेल तिथे सोडले जाई. याला शिपणं करणे असे म्हणत. हे रोजचं काम आणि प्रत्येक घरातून सकाळच्या वेळी चालू असे.रहाटाचा कुईsss कुईsss आवाज येणे ठरलेलेच असे.

वेगवेगळ्या ऋतूत तेथे वेगवेगळी मजा असे उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे फणस जाम कोकम, पोह्याचे पापड याची मज्जा असे कोकम फळे आणून फोडून टाकून  बियांचा गर एका पातेल्यात जमा होई. वरची टरफले साखर भरून बरणीत ठेवली जात मिठ ही घातले जाई मग त्याला भरपूर रस सूटे. रस ओतून घेऊन त्यात प्रमाणात पाणी साखर मीठ घातले, थोडी जिरेपूड की झालं कोकम सरबत तयार हे ताज्या फळाचे सरबत अप्रतिम चवीचे लागे उन्हाळ्यात तखलीकीने कोरडा पडलेला घसा शांत होई

जाम हे किंचित पांढरे हिरवी झाक असलेले भरपूर पाण्याचा अंश असलेले फळ प्यास लागलेली शमन करत असे. एखादा दिवस पापड करण्याचे ठरे. लाकडी उखळीत पोह्याचे पीठ तिखट मीठ हिंग पापड खार पाणी हे प्रमाणात घालून मुसळाने कुटले की पापडाचा गोळा तयार होई, काही वेळेला कांडपिणी असत त्या कुटून देत मग मावशी, आई, आजी व मी मोठे मोठे पोळपाट घेऊन सरासरा पापड लाटत असू. मावशीचा लाटण्यावर खूपच हात चाले मग कोण जास्त पापड लाटतो अशी शर्यत ही लागे. असे पापड उन्हात घालून वाळल्यावर खाण्यातली मजा काही औरच असे. ताकातले हि पापड आजी चविष्ट करीत असे. तसे पापड आता मूळ चवीचे खायला मिळत नाहीत. हल्ली त्याला (authentic) म्हणतात. 

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषेचा सुंदर आविष्कार☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ मराठी भाषेचा सुंदर आविष्कार☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

तुझ्यासाठी आज फक्त 

पावसाचा शृंगार केलाय—- 

 

इवल्याशा थेंबांचा 

कंबरपट्टा विणलाय—–। 

 

टपोऱ्या थेंबांचे 

डूल घातलेत कानात—– 

 

मोठ्ठ्या सरीची 

मोहनमाळ घातलीये गळ्यात—-। 

 

लवलवणाऱ्या हिरवाईची 

काकणं भरलीत हातात—–

 

टपटपणारया पागोळ्यांचा 

नाद गुंफलाय घुंगरात——-।

 

चमचमणाऱ्या बिजलीची 

चंद्रकोर रेखलीय कपाळावर—–

 

आणि सावळया मेघांची 

काजळरेषा पापणीवर——।

 

सप्तरंगी इंद्रधनू 

ल्यायलेय अंगभर—– 

 

वाऱ्याचा सळसळाट 

घुमतोय पदरावर——। 

 

तुला आवडतं ना म्हणून

मातीच्या सुगंधाचं 

अत्तरही माखलंय—–

 

अन गोजिरवाणं श्रावणफूल 

केसात माळलंय——।

 

बघ तरी सख्या——

 

तुझ्यासाठी 

आज 

नखशिखांत 

पाऊस 

बनून 

आलेय———!!

. .

काय सुंदर अविष्कार आहे, मराठी भाषेचा. . !!

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित

? विविधा ?

☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित ☆

उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात…!

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा…!

कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा, त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे, त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते…!

आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले.  स्वयंपाकघर  काय अन्  देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली…!

मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत…!

पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति – रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहिजेत…!

रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणारं कुणीतरी पाहिजे…

मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं… चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला…!

घरात कुणीतरी मोठं पाहिजे हो…!

एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं…

खरंच घरात कुणीतरी मोठ पाहिजेच…!

पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर.. आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर..  लिंबू-मिरचीला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन..  एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबडं मुख असू दे की कमी ऐकू येणारे कान.. कसं कां असेना पण सांगसवर करणारं …

घरात कुणीतरी मोठं पाहिजेच…!

ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.. त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात…!

त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच…!

घरात मोठं कुणीतरी पाहिजेच हो….!

 

✍ साभार – व्हाट्सएप्प  

संग्राहक : सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

मग घरात प्रवेश मिळे…… च्या पुढे?

मामाच्या घरापुढे सारवलेलं अंगण असे. आठ दहा उंच दगडी पायर्या चढून गेले की घराच्या लांबी इतका पुढे खांब असलेला (हल्लीचा व्हरांडा) जवळ जवळ ५० फुट लांब ओटीच्या बाहेर पडवीचा भाग आणि मग चौकोनी ओटी, त्यावर गादी, तक्के अशी बैठक असे. भिंतीत बरेच कोनाडे होते. या कोनाड्यात धाकटे मामा, ‘बुगुबुगु’ असा तोंड घालून,नंदीबैलाचा आवाज काढीत. तो आत घुमत असे. मी लहानपणी त्या ‘बुगुबुगु’ आवाजाला घाबरत असे. डाव्या अंगाला एक दार आहे. तेथे आत बापूंच माजघर आहे, त्या माजघराला हे नाव पडले होते. पूर्वी एकत्र कुटुंब असे, त्यातल्या एकाचे नाव असेल. ओटीवर उजवीकडे काळ्या पॉलीशचे पितळी चकत्या असलेले दर्शनी दार, त्यातून प्रवेश केला की मोठ माजघर, एकीकडे उजव्या हाताला लागतो लाकडी बांधलेला झोपाळा. समोर स्वयंपाकघरात जायचे दार, डाव्या हाताला देवघर त्याच्या समोर मागच्या पडवीत जायचे दार दाराच्या आत छोटीशी ओटी सारखी जागा व समोर उतरले की पुन्हा घराच्या लांबी एवढीच मोठीच्या मोठी पडवी एका बाजूला नारळ ठेवलेले असत, भिंतीवर कोयताळे असे. त्यात निरनिराळे कोयते असत. समोरच बाहेर पडायचे दार टाकीकडे वाडीत जायला यायला. इकडे उजवीकडे चुली घातलेल्या होत्या. तेथेच पडवीत शिंकाळे टांगलेले होते. त्यात नारळ फोडला की उरलेल्या कवडी बागेतून आणलेल्या भाज्या केळीचे फाळके ठेवलेले असत. पडवीला अर्धीभिंत व त्यावर गजाचे उघड्या भिंतीवर रोवलेले मोकळे ढाकळे आवरण, ज्यातून मुक्तपणे हवा खेळे. त्यामुळे त्यावेळी फ्रीज नसले तरी नारळ भाजी हवेच्या गारव्यात टिकून राही. अलीकडल्या भिंतीला घुसळखाम्बा म्हणजे साईचे ताक साधे ताक घुसळण्यासाठी केलेले. दोन भिंतीतील हुक त्याला अडकवलेल्या दोऱ्या, त्यात रवी उभी करून बरणीत सोडायची व दुसरी दोरी रविला गुंडाळायची आणि दोरीची दोन टोके मागे पुढे ओढली की रवी अलगद ताकात फिरून लोणी चट्कन येई हे एक यंत्र म्हणाना कां? सोपं सुटसुटीत! पुढे गेल्यावर उजवीकडे दार होते बाहेर पडायला त्याच्याबाहेर सुम्भाच्या दोरीच्या शिंकाळ्यात छोटे मातीचे मडके टांगलेले असे. त्यात दात घासायला ‘कणे’ ठेवलेले असत. कणे म्हणजे भाताच्या वरची निघालेली फोलपटे, जाळून त्यांची केलेली राखुंडी, दात घासण्यासाठी व भांडीही स्वच्छ करण्यासाठी वापरत असत. तेथून बाहेर पडले की समोरच बांधलेला मोठा सिमेंटचा हौद आहे. तो सतत विहिरीच्या पाण्याने भरलेला असे. पाणी घ्यायला पितळी तपेल्या असत. किंवा छोट्या पत्र्याच्या बादल्या असत. एका बाजूला मोठी धोंड आडोसा केलेली, नारळाचे झाप विणून त्त्याला लावलेले असत. त्याने गोठा, घरे शाकारली जात. हे झाप विणायला बायका रोजंदारीवर येत असत. नारळाच्या हिरव्या झावळ्या काढून त्या चटई सारख्या विणल्या जात. ती एक उत्कृष्ठ कला होती. आता कितपत टिकून आहे माहित नाही. 

हौदाच्या उजव्या अंगास पाणी तापवायला चूल घातलेली असे. जळण वाडीतले भरपूर असे. नारळाची चोड, (अखंड नारळ सोलून निघालेली साल) नारळाच्या वाळलेल्या झावळ्या इतर काटक्या असत. पाणी काढून धोंडीवर बादलीत आणायचं भर घालायची की अंघोळीची तयारी व्हायची लहानपणी आजी कौतुकाने न्हायला घाली रिठ्याने केस धुवायची शिकेकाईनेही असे. किती जपले तरी थोडे तरी पाणी डोळ्यात जाई व डोळे चुरचुरत. पण आजीने घातलेली कौतुकाची अंघोळ या लाडावलेल्या नातीला मनापासून आवडे. 

माजघरातून उजव्या हाताला दार होते ते दुकानाच्या पडवीत उघडे. तेथेच लागून जिना होता, घराच्या माळ्यावर जायला, दुसरा आतून डाव्या बाजूला बापूच्या माजघराजवळ होता. पूर्वी खेडेगावातलं किराणा मालाचं दुकान आजोबा चालवत असत. म्हणून त्या पडवीला कायमचे नाव दुकानाची पडवी असे पडले. लाकडी झोपाळ्याच्या उजव्या हाताला बाळंतीणीची खोली होती. आणि एरवीची आजी आजोबांची खोली असे. त्यात महत्वाचे अंगावरचे डाग, रक्कम इत्यादी ठेवलेले असे. 

समोरच्या बाजूस स्वयंपाकघाराचे दार होते. आत प्रवेश करताच उजवीकडे दाराच्या बाजूला मांडणी. डावीकडे माजघराच्या भिंतीला भिंतीत कपाट, आणि पूर्वेच्या भिंतीला खाली दोन चुली, बाजूला वैल हि होता. पडवीच्या भिंतीला पाण्हेरे ( पाण्याचे हंडे , पिंप ठेवायची जागा) तेथे बाजूला हात धुवायला छोटी मोरी होती. बाहेर जायचे दाराच्या उजव्या हाताला भिंतीतले फडताळ असा हा स्वयंपाकघराचा सरंजाम. तेव्हा पितळी ताटे, वाट्या, भांडी, वापरायची पद्धत होती. ताटांना कल्हई लावली जाई.

आम्ही मुंबई हून आल्यावर घरात प्रवेश केल्यावर पहिले हौदावर (टाकी) जाऊन हात पाय धुवत असू. मग चपला घालून मामाच्या वाडीत भिरी भिरी हिंडून वाडीभर प्रत्येक झाडा पानांचे निरीक्षण करत असू. बोटीतून आल्याने डोळ्यात व डोक्यात सतत एकतास हलणारे फिरणारे पाणी पाहिल्याने काहीवेळ डोक्यात फिरल्यासारखी जाणीव होत राही. वाडी पाहतानाही असेच फिरल्यासारखे होई, पण सर्व नजरे खाली घालून आम्ही जेवायची हाकाटी आल्यावर घरात परतत असू.

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

 

श्रावण महीना सुरू झाला की आपल्या सणांची सुरवात होते आणि नकळतच मन गिरगावात पिंगा घालायला लागते.

नाग पंचमी, राखी पौर्णिमा ह्यानंतर आठवड्यानी येणारी गोकुळाष्टमी हा सण गिरगावकर मोठ्या उत्साहाने आणि जोशाने साजरा करत. 

१९६३ सालचे ‘ब्लफमास्टर’ सिनेमा मधील शम्मी कपूरचे गोविंदयाचे गाणे हे गिरगावातील मांगलवाडीत चित्रित झाल्याने 

गिरगावातील गोविंदयाला खूपच प्रसिद्धी मिळाली. संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी हे तेंव्हा गिरगावात रहात असल्याने त्यांनी गिरगावातील गोविंदयाचे हुबेहूब चित्रण करून गिरगावातील गोविंदयाचे जगभर दर्शन घडविले. 

गिरगावात गोविंदा हा प्रत्येक वाडीमध्ये साजरा होत असे. प्रत्येक वाडीची गोविंदा टोळी ही आपल्या वाडीच्या हंड्या फोडल्या कि आपल्या आजूबाजूच्या दुसऱ्या वाडीच्या हंड्या फोडायला बाहेर पडत असत. ‘गोविंदा आला रे आला मडकी सांभाळ ब्रिजबाला’ तसेच ‘एक दोन तीन चार, XXX दादाची पोरे हुशार’ असे गात आणि नाचत गल्लोगल्ली फेरफटका मारला जायचा. तेंव्हा गिरगावात दादा लोकांची कमी नव्हती. जो गोविंदयाला जास्त पैसे देईल त्याचे नाव जोडले जायचे. हे करताना डावा  हात पुढच्याच्या पॅन्टला धरून, कमरेत वाकून, उजवा हात हलवत एक एक पाऊल  ठराविक लयीत टाकला जायचा. ह्याचे चित्रणही ब्लफमास्टरच्या गाण्यामध्ये व्यवस्थित केले आहे. त्या गाण्याच्या चित्रीकरणात मूळचे गोविंदा खेळणारे दिसत आहेत. हाल्फ पॅण्ट आणि बनियन ह्यावर गोविंदा बाहेर पडत असे. वाडीतील काही जण नेवैद्य म्हणून फळांचे ताट नाहीतर गोड  शिरा असे गोविंदा समोर ठेवत असत. गोविंदावर सर्व बाजूनी पाण्याचा वर्षाव केला जायचा. त्यामध्ये एखादयाकडून गरम पाणी अंगावर पडल्यास, अजून पाणी टाकण्याची मागणी केली जायची. ‘तुमच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा’ असे मोठ्याने ओरडून वाडीतील रहिवाश्याना अजून पाणी टाकण्यास उद्युक्त केले जायचे. काही टवाळ मुले लांबूनच पाण्याचे फुगे मारायचे. ते फुगे मारण्यात एवढं तरबेज असत कि ज्याला फुगे लागायचे त्याला कळायचेही नाही कि फुगे आले तरी कुठून. वरून होणारा पाण्याच्या फुग्यांचा मारा चुकवत वाडीच्याबाहेर पडणे म्हणजे एक मोठे दिव्यच असे. 

पूर्वी गोविंदा हा राष्ट्रीय सण म्हणूनच मानला जायचा आत्तासारखे राजकीय सणाचे स्वरूप त्याला नव्हते. त्यामुळे टी शर्ट आणि मोठ्या बक्षिसांच्या थैल्यांचे आमिषही नव्हते. 

काही मोठ्या वाड्यांचे गोविंदा बरोबर एक सीन ही असे. एका ट्रक मध्ये वाडीतल्याच मुलांना चेहऱ्यावर रंग लावून पुराणातील एखाद्या प्रसंगाचे दर्शन घडत असे. नंतर काही राजकीय घडामोडींचे किंवा त्यावेळेच्या ज्वलंत घडामोडीचे विषय घेऊन सीन बनवले जायचे. 

बहुतेक हंड्या ह्या तीन ते चार थराच्या असायच्या. पूर्वी हंड्यांमध्ये उंचीची स्पर्धा नव्हती. हंड्या फोडून थोडे फार जे काही पैसे मिळायचे त्यामधून सगळ्यांना वडापाव मिळाला तरी बरे वाटायचे आणि जर काही जास्त प्रमाणात पैसे मिळाले असतील तर रात्री भुलेश्वरच्या कन्हैया ह्याच्या किंवा किका स्ट्रीटच्या पाव भाजीच्या गाडीवर त्याचे सेलिब्रेशन होत असे.  

त्याकाळी गिरगावात ठाकूम – माकूम, ढोल – ताशा हि वाद्य जाऊन कच्छी बाजा आणी ढोल हा जास्त वापरात येत होता. १९५१ च्या अलबेला सिनेमात संगीतकार सी रामचंद्रांनी त्याचा पहिला वापर हा भोली सुरत ह्या गाण्यासाठी केला होता. 

कच्छी बाजा आणि ढोल ह्याशिवाय गोविंदयाला पूर्णत्व मिळत नसे. तसे वाजवणारे खूप जण होते पण सनईवर अबूभाई आणि पोंक्षे, विजय चव्हाण, इब्राहिम, परश्या असे मोजकेच प्रमुख ढोल वाजविणारे ठरवायचे असले कि वर्गणी जमवण्यावर जोर द्यायला लागायचा. त्यासाठी वाडीतले सगळे एकवटून कामाला लागायचे. एकदा का गोविंदयाच्या दिवशी कच्छी बाजाचा आवाज यायला लागला कि आपोआप वाडीतले सगळे जमा होऊन आणि आपसूक टोळी तयार होऊन गोविंदा नाचायला सुरवात होत असे. कधी कधी दोन गोविंदा समोरासमोर आले आणि त्यामध्ये वरील दिग्गज वाजवणारे असले कि जुगलबंदी हि व्हायचीच आणि ऐकणाऱ्यांसाठी आणि नाचणाऱ्यांसाठी तो एक आयुष्यभरासाठी आठवणींचा ठेवा असायचा. 

पूर्वी राजेश खन्ना रहात असलेली ठाकुरद्वारच्या कोपऱ्यावरची सरस्वती निवास येथेच एक उंच हंडी बांधली जायची. ती हंडी फोडायला लालबाग, उमरखाडी असे लांबून गोविंद्याच्या टोळ्या येत असत. एखादा गोविंदा ती हंडी फोडायचा प्रयत्न करतोय असे समजले कि पूर्ण ठाकूरद्वारचे चारही रस्ते खचाखच भरून जायचे. प्रत्येकजण एक विलक्षण अनुभूतीचा साक्षीदार होण्यासाठी धडपडत असे. पहिले तीन थर आरामात लावले जायचे. चौथ्या थरापासून थरार चालू होयचा. पाचवा थर हा फक्त दोन  जणांचाच असायचा. प्रत्येकाचे श्वास रोखले जायचे. पाचव्या थरानंतर हंडी फोडायला दोन एक्के का तीन एक्के म्हणजे एकावर एक असे दोघे का तिघे लागतत ते ठरायचे आणि हंडीला कसाबसा फोडणाऱ्या गोविंदाचा हात लागायचा आणि हंडी फोडली जायची. हंडी फोडणारा आणि सगळे थर लगेच हळूहळू सावरत खाली यायचे आणि एकच जल्लोष व्हायचा. कच्छी बाजा जोरात वाजायला लागायचा आणि नुसता गोविंदाच नाही तर सगळेच जोशात नाचायला लागायचे. हंडी फुटल्याचे एक वेगळेच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायचे. संध्याकाळ पर्यंत सगळीकडे असेच उत्साहाचे वातारण असायचे. सकाळपासून गजबजलेला गिरगाव रात्रीमात्र शांत आणि थकलेला असायचा पण तो एका दिवसापुरताच कारण दुसऱ्यादिवशी पासून लगेच गणेशोत्सवाच्या तयारीला गिरगावात सुरवात व्हायची. 

अजूनही गिरगाव सोडून गेलेला गिरगावकर गोविंदयाच्या दिवशी एकतर गिरगावातील गोविंदयाला हजेरी लावतो नाहीतर जेथे असेल तेथे गिरगावचा माहोल बनवून गोविंदा साजरा करतो. पण त्याचे मन मात्र गिरगावातच घिरट्या घालत रहाते हे ही तितकच खरं.

       

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर ☆ 

जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:

?

कृष्णा,

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

—–दुर्गा भागवत.

संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुर्दम्य ! ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? विविधा ?

☆ दुर्दम्य ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

हो!! ब्यायशी वर्षं पूर्ण झाली अलिकडेच! दोन-चार दिवसांपूर्वीच. मुलांनी अगदी झोकात वाढदिवस साजरा केला! या वयापर्यंत पौर्णिमेचा चंद्र हजार वेळा येऊन गेलेला असतो आयुष्यात, असं म्हणतात. मी काही एवढं गणित मांडून बसत नाही. खूप नातेवाईक, मित्र सुद्धा आले होते शुभेच्छा द्यायला. खरंच कौतुक वाटतं सगळ्यांचं.

खरं म्हंजे आता डोळे दमलेत.  नजर अर्धीमुर्धी शिल्लक आहे. भुरकट, मळकट दिसतं सगळं. डोळ्यांना पाणी येत रहातं सारखं सारखं. पण अंदाजपंचे माणूस ओळखतो!

आं? काय? काय म्हटलंत? काऽऽऽन होय!! आता काय सांगणार कानांचं?? एव्हांना  तुम्हालाही कळलंच असेल. आता काप गेले आणि भोकं ऱ्हायली! तुम्ही बंड्या म्हणायचं आणि आम्ही खंड्या ऐकायचं!! इतकंच! हा हा हा!

दांत कधीच गळून पडलेत. बोळकं झालाय् तोंडाचं. पण हिरड्या इतक्या टणक, की काहीही चावून खातो! अगदी  पोळी-भाकरी सुद्धा. दाणे खावेसे वाटले, तर कुटून खातो. पण कुटाला दाण्याची चव नाही. कोवळ्या बारिक चिंचा सुद्धा खातो. दांत नसल्यामुळे ते आंबायचा तर प्रश्नच नाही. काय ते? कवळ्या नां? केल्यात ना. पण मला त्या कवळ्यांचं तंत्र कधी जमलंच नाही. पुढे देखिल जमेल असं वाटतं नाही. बोलतांना तोंडाच्या बाहेर पटकन उडी मारेल की काय, अशी भीती वाटते! आणखी म्हणजे कवळीच्या आतमधे कण अडकतात अन्नाचे आणि हिरड्यांना टोचतात!! मग जेवतांना कवळी तोंडाबाहेर काढायची,  मिचमिच्या डोळ्यांनी बघत  फडक्याला पुसायची आणि पुन्हा तोंडांत कोंबायची – म्हणजे इतरांना घाण वाटते!! आणि आपल्याला स्वतःला सुद्धा. घाण पण आणि लाज पण! असो.

कवळी म्हटल्यावर एक गंमतीची मजा आठवली. आम्ही तिसरी-चौथीत असतांना आम्हाला वाठारे या नांवाचे एक वयस्कर पण हिंस्त्र मास्तर शिकवायला होते. यम परवडला! एकदा ते बोटीने मुंबईला चालले होते. त्यांना बोट लागली. बोटीच्या काठावरून समुद्रात उलटी  करतांना त्यांची कवळी सुद्धा समुद्रात पडली! फजितीच की! नंतर मास्तरांच्या तोंडाच्या चिपळ्या झाल्या. आम्हाला खूप मजा वाटायची. पण हसायची भीती! आता आज तो सण साजरा करतो!

हा हा हा!!

हात-पाय ना? ते तर कायमचेच संपावर गेलेत! भारी दुखतात!! कोणाला सांगणार तेल लावून चोळायला? हल्ली लोकांना नसतो वेळ! मग आपलं आपणच लावायचं! पायांना जरा बरं वाटतं आणि हातांना चांगला व्यायाम होतो! बोटं दुखतात बऱ्याच वेळा हातांची. पण आपल्या हाताचा पंजा कॉटवर पालथा टाकून त्याच्यावर आपलंच बूड टेकून पाच-दहा मिनिटं बसलं ना की बरं वाटतं, असा मला शोध लागलाय्!

स्मरणशक्ती तशी ठीक आहे. जुनं जुनं अजून सगळं आठवतं. पण नवीन विसरायला होतं. समोरच्याचा चेहरा काहीसा लक्षात असतो, पण त्याचं नांव जाम आठवत नाही! एखादं पुस्तक आणायला कपाटाच्या खोलीत जातो, पण खोलीत गेल्यावर आपण इथे कशाला आलो होतो, हे जंग जंग पछाडूनही डोक्यात येत नाही! अशा वेळी पूर्वी मी स्वतःवरच चिडायचो. पण आता माझं मलाच हसायला येतं!

पण हे तर आता असंच चालायचं. यंत्राचे भाग झिजायचेच. निकामी व्हायचेच. असो. पण काही वेळा माझं मलाच आश्चर्य वाटतं. नीट, निरोगी जगायला आवश्यक असलेल्या गोष्टी नसून सुद्धा, मी ब्यायशीची वेस ओलांडली. यानं मी तर अचंबितच होतो!

एक गोष्ट मात्र खरी. आज मितीपर्यंत आजारपण असं कधी आलंच नाही. हा नशिबाचा भाग. कधी तरी सटीसामाशी सर्दी होते. पण मी बिंधास गोळी घेतो. गोळी घेतली तरी सर्दी जायला दोन-तीन दिवस जातातच, हे गृहितच धरायचं.

मन आणि बुद्धी अजून शाबूत असावी असं वाटतंय्! काय सांगावं? स्वतःला स्वतःचाच भास नसेल ना होत? कधी कधी मनांत विचार येतो –

शंभरी गाठेन कां?

काही माहीत नाही!

कोणालाच माहीत नसतं!!

शंभरी गाठण्याची दुर्दम्य इच्छा वगैरे काहीही नाही. आज्ञा आली की आनंदानं प्रस्थान ठेवायचं!

गाडी जोपर्यंत स्वतःहून चालत आहे तोपर्यंत चालावी.

ढकलायची वेळ येऊ नये. तशी वेळ येणार असली तर तिन स्वतःहूनच स्तब्ध व्हावं, अशी मात्र

दुर्दम्य इच्छा आहे!

ॐ शांती.

? ? ?

 

©  श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 1 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 1 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

भव्य जलाशयावर हळूहळू चालली आमची आगबोट,

पाणीच पाणी चहूकडे पाहुनी 

उरात धडकी राहिली भरुनी 

पण, मामाच्या गावाला जायचं आहे 

आंबे फणस खायचे आहेत, सुट्टीची मज्जा घ्यायची आहे म्हणून डोळे मिटून बोटीत बसायचे धक्का यायची वाट पहायची उतरल्यावर श्वास सोडायचा, हुंदडायचा, ध्यास घ्यायचा, सुट्टीचा आनंद लुटायचा, डोळेभरून निसर्ग पहायचा आणि महिनाभर मुक्काम ठोकायचा कोठे तर मामाच्या गावाला अलिबाग जवळच्या लहानशा ‘थळ’ गावात! 

दरवर्षी मे महिन्याशी शाळेला सुट्टी लागली की वेध लागायचे थळला मामाकडे जाण्याचे अलिबाग पासून तीन मैलावर असलेले लहानसं खेडं! कौलारू घरे नारळ पोफळी, आंब्या फणसाची झाडं दूरवर असलेली शेतं. विहिरीवर पाण्यासाठी रहाट, थोडसं पशुधन असे हे मामाचं गाव! 

आम्ही रेल्वेने मुंबईच्या आमच्या उपनगरातील घरातून निघून मसजीद बंदर स्थानकावर उतरत असू, मग व्हीक्टोरियात बसायचो भाऊच्या धक्यावर जायचं असायचं. तेव्हा व्हिक्टोरिया हे घोडा जुंपलेले टांग्यासारखे वहान होते. मागे वर उंच छत असलेली बग्गी त्यात दोन तीन माणसे मावत. पुढेही एक दोघ बसत. त्याच्या पुढे मग गाडीवान आणि जुंपलेले घोडे अशी ही खूप लांबलचक असलेली एखादी शाही बग्गीच ! पुढे दोन्ही बाजूस दिवे असत. याच छत पुढे ओढून बंदही करता येई, (आता ही व्हिक्टोरिया इतिहास जमा झाली आहे ) मग आमची सवारी भाऊच्या धक्याला पोहचायची. आई बोटीचे तिकीट काढत असे, आम्ही बोटीत प्रवेश करत असू. चहुबाजूला अरबी समुद्राचं ‘अबब’, पाणी बघून बालवयात माझ्या उरात धडकीच भरायची! एकदाचा बोट निघायचा भोंगा, भूsss भूsss करत वाजला की बोट धक्का सोडून पुढच्या समुद्रावर हळूहळू चालू लागे. समुद्राचे पाणी कापत कापत. हालत डोलत हेलकावे खात बोटीची संथपणे रेवसच्या दिशेने वाटचाल चालू असे. आता प्रवासाच्या मध्यावर बोट पोह्चायच्या बेतास आली की दुरूनच, मधोमध असलेला, ‘काशाचा खडक’ दिसू लागे, मग मन धास्तावून जाई. काशाच्या खडका जवळून बोट जाऊ लागली, की तेथे जणू समुद्र खवळल्यासारखाच होई, आणि मग बोट खूपच हेलकावे खाऊ लागे, माझ्या बालमनात भितीने घाबरगुंडीची वलये गोळा होत, उरात धडकीतर भरेच, मग आईला बिलगून बसू लागे. त्या खडकाजवळ काही वर्षांपूर्वी रामदास बोटीला जलसमाधी मिळाल्याची भयकथा अनेकदा आई, मामाने सांगितल्यामुळे, मी मनात त्या काशाच्या खडकाची धास्तीच घेतली होती. त्यामुळे ती समुद्रातील अपघाती जागा पार करून बोट पुढे गेल्यावर, लहान असतानाही मी सुटकेचा निश्वास सोडत असे. राहिलेले, थोडे अंतर भीती, उत्कंठा, आणि पोहचण्याची अधीरता यात पार पडे. आणि आता आलीच जवळ जमिनीवर उतरायची जागा, उतरल्यावर हायसं वाटे, आणि तो मनावर त्यावेळी भयाने ग्रासलेला प्रवास संपे.

हळूहळू चालत आम्ही, बसच्या थांब्यावर जात असू. या बस पूर्वीच्या पद्धतीच्या होत्या, त्यांचे प्रवासी बैठकी चा भाग मागे सोडून, पुढचा चालकाचा भाग, पुढे तोंड काढल्यासारखा इंजिनाचा भाग असे. आता सारख्या चपट्या तोंडाच्या बस नसत. पूर्वीची लौरी (ट्रकही) असेच असत. मग स्थानापन्न झाल्यावर, आमची वटवट चालू असे, मोटार सुरु होई, रस्त्याची अवस्था खेडेगावातील त्यावेळच्या स्थिती प्रमाणेच होती. आचके दचके खात बस चालत असे, आणि मग आई दटावे, “ बोलू नका, बोलता बोलता जीभ दाता खाली येऊन चावली जाईल,”  त्या भीतीने आमची वटवट कमी होई.

कंडक्टरला थळ आगार, सांगितलेले असे थळचा फाटा आला की बस मुख्य रस्त्यावरून आत वळे. उजवीकडे दत्तदेवळाची दत्ताची डोंगरी मागे टाकली की पुढे गेल्यावर डावीकडे तळं येई पुन्हा पुढे गेल्यावर बाजाराकडे जायचा रस्ता व आत देवीचे देऊळ! मग बरीच दोन्ही बाजूची वाड्या घरे मागे पडत. नंतर आलचं मामाचे घर. होळीवर उतरत असू. होळी म्हणजे दरवर्षीच्या रस्त्याच्या बाजूला होळी पेटवली जाई. म्हणून त्या जागेला म्हणायची पध्द्त होळीपाशी उभे आहेत तेथे उतरले आहेत वैगरे म्हणजे ती जागा होळीची असे. 

बस थांबताच आम्ही टुणकन उड्या मारून पळत घराकडे जात असू. आत जायची घाई असे. पण आजी व मावशी थांबून ठेवत. थांबा, “तांदूळ पाणी ओवाळायचे आहे!” लांबून प्रवास करून आल्याने बाहेरची बाधा होऊ नये म्हणून हा उपचार होऊन मगच घरात प्रवेश मिळे.

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares