सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्रीमती यास्मिन शेख
💐 अ भि नं द न 💐
श्रीमती यास्मिन शेख … काल दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी काल वयाची शंभरी पार केली. त्यांना ई-अभिव्यक्ती साहित्य मंचाकडून आदरपूर्वक प्रणाम आणि मनःपूर्वक असंख्य शुभेच्छा.
मराठी भाषेबद्दल, विशेषतः व्याकरणाबाबत त्यांना खूप आत्मीयता आहे हे तर सर्वज्ञातच आहे. त्या संदर्भात त्यांनी केलेल्या आणि अजूनही करत असलेल्या कामाचा अल्पसा आढावा प्रस्तुत करत आहोत.
पूर्व प्रकाशित आलेख
👉 मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
आजच्या अंकात वाचूया सुश्री शोभना आगशे ची प्रस्तुती वय ??? फक्त शंभर वर्षे….
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ वय ??? फक्त शंभर वर्षे… ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆
श्रीमती यास्मिन शेख नेहमीच म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. ज्या राष्ट्राने तुम्हाला आसरा दिला, ज्याने तुमची स्वतःची ओळख पटवून दिली, त्या राष्ट्राची भाषा हीच मातृभाषा असते.’
कागदोपत्री, वैचारिक किंवा वैज्ञानिक लेखनासाठीची मराठी ही प्रमाण भाषाच असली पाहिजे याबद्दल त्या आग्रही आहेत. भावभावना पोहोचवण्यासाठी बोली भाषा अवश्य असावी; पण त्यामध्येही इंग्रजी शब्दांचा वापर टाळला पाहिजे, याबाबतीत त्या ठाम आहेत. मराठीच्या दुर्दशेसाठी आपण सारेच कारणीभूत आहोत असे त्या मानतात. त्यावरच्या उपायांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला. व्याकरणावरील त्यांची पुस्तके ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्द लेखनकोश’ आदर्श मानली जातात. अतिशय रूक्ष वाटणारा हा विषय त्यांनी सहजतेने उलगडून सोपा केला. त्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
आजही तेवढ्याच जोमाने त्यांचे लेखन-वाचन सुरू आहे. वर्तमानपत्रात व्याकरणाचे सदर लिहितात. ‘अंतर्नाद’ मासिकात व्याकरण सल्लागाराच्या भूमिकेत भरीव कामगिरी करून उच्चतेचा एक मापदंड प्रस्थापित केला आहे. मुद्रिते तपासताना सकारात्मक राहून सतत कार्यमग्न राहणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे. आज वयाची शंभर वर्षे पार करताना शरीराबरोबरच त्यांच्या प्रसन्न, नम्र मनाचेही कौतुक वाटते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण अफलातून स्मरणशक्ती यांची दैवी देणगी त्यांना लाभल्याचे पुन्हा पुन्हा जाणवते. स्वतःच्या हाताने लिहिण्यातील आनंद त्यांना अनेक वर्षे लाभो. त्यांनी हाती घेतलेली ही व्याकरणाची दिंडी घराघरांत जावो आणि यास्मिन शेख यांना नव्या उमेदीने जगण्याचे बळ देवो.
दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी वयाची शंभरी पार केली. त्यांना हार्दिक शुभेच्छा. 💐🙏
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







