सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

पाकिस्तानात हळदीचा कार्यक्रम अन् पुरणपोळीचा बेत..

‘धुरंधर’मुळं ‘बलुचिस्तान’ जगाच्या नजरेत आलेलं. ‘बलोच’ शब्दाचं सर्चिंग शतपटीनं सोशल मीडियावर वाढलेलं. मात्र, हेच बलुचिस्तानी गेल्या अडीचशे वर्षांपासून शोध घेताहेत आपल्याच मावळ प्रांताचा.. कारण तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या समूहाला पाकिस्तानात ओळखलं जातं ‘बलोच मराठा’ म्हणून. होय. अनोख्या इतिहासाची ही विचित्र वाटचाल डोळे विस्फारून टाकणारी.

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाचा ‘रहमान डकैत’ मूळ बलुचिस्तानातला दाखवलेला. कारच्या बॉम्बस्फोटात मरण्यापूर्वी संजय दत्तचा ‘एसपी अस्लम चौधरी’ फोनवर ‘ए बलोचऽऽ’ म्हणून दम देताना दिसलेला. यामुळं भारतीयांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तानबद्दल उत्सुकता वाढलेली. त्याचवेळी त्या प्रांतातल्या हजारो नागरिकांनीही या चित्रपटाच्या छोट्या -मोठ्या रिल्सवर कौतुकानं कॉमेंट देण्यास सुरुवात केलेली. यात सर्वाधिक संख्या ‘बलोच मराठा’ नावाची असलेली, कारण त्या मंडळींना ‘बॉलिवूड’बद्दल प्रचंड आकर्षण असलेलं. यातूनच आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याची धडपड स्पष्टपणे दिसून आलेली. या साऱ्याचं मूळ तब्बल दोनशे पासष्ट वर्षांपूर्वीच्या कहाणीत असल्याचं लक्षात आलेलं.

सन १७६१ साली ‘पानिपत’च्या युद्धानंतर ‘अब्दाली’ खजिन्याविनाच रिकाम्या हाती अफगाण प्रांतात परतला. त्याला युद्धात सैनिकांची मदत करणाऱ्या मीर नासीरखानला मोबदल्यापोटी त्यानं ‘बंदी दुश्मन’ सैनिकांना बलुचिस्तानात सोडलं. तेव्हा ती संख्या होती जवळपास वीस हजार. तेव्हापासून ते तिथंच राहिले. यातले बहुतांश मूळचे मावळ प्रांतातले. सुपीक-सधन मातीतले. त्यामुळं तिथं ओसाड वाळवंटात जगण्यासाठी त्यांना निसर्गाशी लढावं लागलं. आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांशीही संघर्ष करावा लागला. काळाच्या ओघात त्यांची ‘भाषा’ बदलली. ‘वेश अन् देश’ बदलला. ‘संस्कृती’ही बदलली. परंतु, आपल्या मूळच्या ‘चालीरिती’ मात्र त्यांनी हरवू नाही दिल्या. ‘बुगती’ अन् ‘मरारी’ जमातीचा भाग असलेले हे लोक आजही स्वत:ला ‘बलोच मराठा’ म्हणवून घेतात. सातारा राजधानीचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या नावानं ‘साहू मराठा’ अशी उपाधी हे ‘बुगती मराठे’ लावतात. पेशव्यांच्या संदर्भातूनही बरेच ‘पेशवानी‘ नावानं ओळखले जातात.

इराण, पाकिस्तान अन् अफगाणिस्तान सीमेवर आता त्यांची दहावी-अकरावी पिढी जन्माला आलेली. तरीही यांच्यात लग्नावेळी ‘हळदीचा कार्यक्रम’ रंगतो. आजही ‘तांदळाचं माप’ ओलांडूनच वधू-वराचा घरात प्रवेश होतो. अधून-मधून पुरणपोळीही करतात. सैन्यदलात नोकरी, शेती अन् व्यापार हे पोट भरण्याचं माध्यम. यातील बरेच उच्चशिक्षित आता पाकिस्तानच्या सरकारी अधिकारीपदीही कार्यरत. सोशल मीडियावर ‘मराठा ट्राईब’ नावाचा यांचा मोठा ग्रुप सक्रिय. यातील अनेक बलोच सदस्यांनी स्वत:च्या नावापुढं मोठ्या अभिमानानं ‘मराठा’ शब्द मिरवलेला. हा ग्रुप तयार करताना त्यांनी सुरुवातीला ‘मराठा’ शब्द टाईप केलेला. नंतर ‘मरहट्टा’ असा बदल केलेला. पुन्हा मूळ ‘मराठा’ शब्द वापरलेला. त्यामुळं ‘आपण मूळचे कोण आहोत’, हे त्यांना पिढ्यानपिढ्या माहीत असलं तरी ‘आपली नेमकी ओळख काय? ’ या गूढ प्रश्नाचा गुंता त्यांच्यासाठी अद्याप न सुटलेला.

तोंडात बलुची.. कानात मराठी – – – 

बलुचिस्तानातल्या ‘मराठा’ समुहाचा आजपावेतो कैक संदर्भग्रंथात उल्लेख आलेला. कैक कादंबऱ्यांची पानंही रंगलेली. यावर ‘बलोच’ नावाचा मराठी चित्रपटही निघालेला. याचे पटकथा-दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी जेव्हा या नावाची घोषणा केली, तेव्हा सर्वाधिक तिकडच्याच मंडळींनी सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद दिलेला. मात्र, त्यांना मराठी समजत नसल्यानं गोंधळ उडालेला. एका ‘बलुची’नं ‘यूट्यूब’वर विचारलेलं, ‘इस मुव्ही का नाम क्या? ’ तेव्हा महाराष्ट्रातल्या एकानं त्याची खिल्ली उडविली, ‘वाचल्याशिवाय कॉमेंट करतोय.. बेटे मौज कर दी. ‘ परंतु या बिच्चाऱ्याला काय माहीत की, विचारणारा उर्दू भाषिक. थेट इराण-अफगाणिस्तान बाँड्रीवरचा. तरीही पाकिस्तानातल्या त्या लोकांनी मोबाईलवर हा चित्रपट आवडीनं पाहिला. तोंडातली भाषा बलुची असली तरीही कानावर पडलेली मराठी कदाचित आपलीशी वाटलेली. योगायोगाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या नायिका स्मिता गोंदकर यांची कुलदेवताही थेट तिकडचीच. बलुचिस्तानातली हिंगलाज माता.

हिंगलाज देवी ते गडहिंग्लज!

पाकिस्तानातील ‘हिंगलाज देवी’चा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा. एकीकडे अरबी समुद्र, तर दुसरीकडे बलुचिस्तानातल्या हिंगोल नदीचं खोरं. किर्थर पर्वतरांगेतील दुर्गम गुहेत पुरातन मंदिर वसलेलं. इथंच स्थायिक झालेला ‘मराठा’ समुदाय दरवर्षी ‘नानी’ यात्रेत मोठ्या श्रद्धेनं सामील होत असलेला. याच हिंगलाज देवीच्या अनेक उपशाखा महाराष्ट्रात. अमरावतीत मोठं मंदिर. सोलापुरातही हिंगलाबिका नावानं सुप्रसिद्ध. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावाचं नावही तिच्यामुळेच पडलेलं. तिकडून आलेल्या बलुची हिंग व्यापाऱ्यांनी इथं पूर्वी देवीची प्रतिष्ठापना केल्याचं मानलं गेलेलं. लगतचा सामानगड किल्ला अन् हिंगलाज मंदिर यावरून ‘गडहिंग्लज’ नाव पडल्याची आख्यायिका.

थेट साताऱ्याशी नाळ..

‘धुरंधर’मध्ये रणवीरसिंगने रंगवलेला ‘हमजा’ पाहून अनेकांना कुलभूषण जाधव यांची प्रकर्षानं आठवण झालेली. त्यांना २०१६ साली भारतीय एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्ताननं अटक केलेली. यातही दोन गोष्टी किती नवलाच्या बघा. पहिली म्हणजे जाधव हे मूळचे साताऱ्याचे. आनेवाडीत त्यांचं जुनं घर. दुसरी म्हणजे त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी पकडलं बलुचिस्तानातच. तिथल्या तरुणांना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर. म्हणजे २६५ वर्षांनंतरही मराठा माणूस अन् बलुचिस्तान यांचा संबंध काही तुटता तुटेनासा झालेला. विशेष म्हणजे ‘बलाेच’ चित्रपटाचे दिग्दर्शक पवार हेही साताऱ्यातील कुडाळचेच. राहता राहिला विषय शौर्याचा. ‘धुरंधर’मध्ये ‘एसपी चौधरी’ला उडविणाऱ्या बलुची तरुणाचा प्लॅन अत्यंत चक्रावून टाकणारा.

– – – आलं का लक्षात? स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी बलुचिस्तानातल्या या समूहाला आजही पाकिस्तान सरकार का टरकून असतं ते. होय. हाच तो डीएनए. ‘स्वराज्य’साठी लढणाऱ्या ‘गनिमी कावा’चा. लगाव बत्ती..

लेखक : सचिन जवळकोटे

कोल्हापूर.

प्रस्तुती : सुलू साबणे जोशी 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments