गौरी गाडेकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ त्या बिल्वपत्रातील एक पान…! – लेखिका : कल्याणी केळकर बापट ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर

आचार्य प्र. के. अत्रे 

तेरा ऑगस्ट. ही तारीख जणू साहित्यिकांसाठीच फुरसतीने काढलेली खास तारीख. ह्या दिवशी साहित्यातील रथी महारथी म्हणून प्रसिद्धीस पावलेले प्र. के. अत्रे, विश्राम बेडेकर आणि बालकवी ठोंबरे ह्यांची प्रकर्षाने आठवण करणारी तारीख. ह्या साहित्यातील बिल्वपत्राची जयंती 13 ऑगस्ट लाच. ह्या तिघांवर ही एकाच पोस्ट मध्ये लिहायला गेल तर ती पोस्ट न होता पुस्तकच होईल. म्हणून आज फक्त अत्र्यांविषयी.

 बरेचदा असं म्हंटल्या जातं, असं समजल्या जातं की सहवासाने प्रेम लाभतं, अनुभवातून आवड निर्माण होते त्यामुळे आपल्याला आपल्या काळात असणा-या कलाकारांबद्दल प्रेम वाटतं, आपल्याला त्यांच्या कलाकृती आवडतात. मग कधीतरी लक्षात येत आपल्या आधीही खूप चांगल्या कलाकृती घडून गेलेल्या आहेत, खूप चांगले व्यक्तीमत्व घडलेले आहेत फक्त त्या व्यक्तीमत्वांचा, त्यांच्या कलाकृतींचा आपला अभ्यास नसल्याने, त्यांच्या कलाकृतींची आपल्याला नीट ओळख न झाल्यामुळे त्याविषयी आपली आवड ही विकसीत झालेली नसते.

असेच एक झुंजार, अफलातून व्यक्तीमत्व म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. बरोबर माझ्या जन्माआधी एक वर्ष हे इहलोकीला गेलेले. त्यामुळे ह्यांच्याविषयीच्या, ह्याच्या लेखनाविषयीच्या सगळ्या गोष्टी वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकायला मिळायच्या किंवा ह्यांच्या लेखनातून उलगडत जायच्या. आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे गडकरी नसते तर त्यांची जडणघडण झाली नसती आणि तात्यासाहेब कोल्हटकर नसते तर गडकरी घडले नसते. आज आचार्यांची जयंती. दर्जेदार साहित्य म्हणजे नेमकं काय हे ह्या सगळ्या लेखक मंडळींनी आपल्याला त्यांच्या साहित्यातून दाखवून दिलं.

कल्याणी केळकर बापट

प्र. के अत्रे ह्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचे अवघ्या काही शब्दांत वर्णन म्हणजे अशक्यप्राय गोष्ट. अत्रे म्हणजे एक मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, एक हाडाचे शिक्षणतज्ञ, एक दर्दी चित्रपटनिर्माते, एक बेडर वृत्तपत्रकार, एक घणाणते वक्ते आणि एक धुरंधर नेते. इतक्या सगळ्या गोष्टी एक एक करीत एकाच व्यक्तीत एकवटल्या असतील तर खरच ते व्यक्तीमत्व “झाले बहुत होतील बहूत परि ह्या सम हाच “ह्या प्रकारचे. त्यांना जाणणारे लोक म्हणायचे अत्रे म्हणजे गडगडाट, कर्दनकाळ आहेत.

आचार्यांचा जन्म सासवड (जिल्हा पुणे) ह्या गावचा. सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बी. ए. , बी. टी. , टी. डी. पर्यंत शिक्षण. नंतर पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. शिक्षणक्षेत्रानंतर पुढील पाऊल राजकारणात. पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते. जवळपास १९३३ पासून त्यांनी नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही शिरकाव केला. १९३९ नंतर मुंबईला स्थलांतर केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता ह्या क्षेत्राशी नाते जोडून साप्ताहिक नवयुगपासून त्यांनी ह्याची सुरवात केली आणि नंतर मात्र अखेरपर्यंत ते वृत्तपत्रक्षेत्रातच राहिले.

त्यांनी प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणांच्या कवींचे व त्यांच्या कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे.

नाटककार अत्रे घडल्याचा प्रभाव त्यांची साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा व लग्नाची बेडी ही नाटके बघितल्यानंतर आपल्याला लगेच जाणवतो. घराबाहेर व उद्याचा संसार ही त्यांची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत.

.. १९६० नंतरच्या दुसऱ्या कालखंडातील त्यांची महत्त्वाची नाटके म्हणजे “तो मी नव्हेच”, “डॉक्टर” ही होत. सत्यसृष्टीतील खळबळजनक घटनांवर ती आधारलेली आहेत.

त्यांच्या लेखनात चरित्रं, प्रवासवर्णने, श्रध्दांजलीपर लेख, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख, विविध भाषणं तसेच शालेयविषयक अभ्यासक्रमासाठी लिहीलेले लेख ह्यांचा समावेश आहे. महात्मा फुले, पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त, समाधीवरील अश्रू, केल्याने देशाटन, अत्रे उवाच, ललित वाङ्‌मय, हशा आणि टाळ्या ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत. त्यांच्या नवयुग वाचनमाला व सुभाष वाचनमाला यांनी-विशेषत: पहिल्या मालेने-मराठी भाषासाहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत एक आदर्शच निर्माण केला. मी कसा झालो? हे त्यांचे वाङ्‌मयीन आत्मशोधन होय. अत्र्यांनी आपले संपूर्ण जीवन खूप कल्पकतेने लिहून त्यास मराठी आत्मचरित्रपर साहित्यात विशेष महत्वाचे स्थान मिळवून दिले. कऱ्हेचे पाणी या पाच खंडांतील विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा त्यांनी सांगितली आहे.

अत्र्यांच्या स्वतंत्र वृत्तपत्रव्यवसायाचा आरंभ साप्ताहिक नवयुगपासून झाला. गडकरी विशेषांक व दिवाळी अंकाच्या संपादनाची धुरा ह्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांनी जयहिंद नावाचे सायंदैनिक व तुकाराम नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. परंतु स्वतःच्या अपत्याप्रमाणे त्यांनी स्वतः सुरू केलेल्या दैंनिक मराठा चे ते अखेरपर्यंत संपादक राहिले.

१९४४ मध्ये समीक्षक मासिकाच्या गडकरी विशेषांकाचे व दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले. १९४७–१९४८ या वर्षांत जयहिंद नावाचे एक सायंदैनिकही त्यांनी चालविले. तुकाराम नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. दैनिक मराठाचे ते अखेरपर्यंत संपादक होते.

हे सगळे करतांनाच त्यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळविला व चित्रपट निर्मिती सुरू केली. धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होत. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक मिळाले.

लोकांनी उचलून धरलेली त्यांची खासियत ही खरी वक्तृत्व व वृत्तपत्र क्षेत्रात. त्यांचे वक्तृत्व हशा व टाळ्या यांनी गाजत असे.

नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन, दहावे मराठी पत्रकार-संमेलनआणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी भुषविली होती.

अशा ह्या हरहुन्नरी, विवीध क्षेत्रात निपुण असलेल्या अवलियाचे मुंबई येथे 13 जून 1969 ला निधन झाले. त्यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र श्रध्दांजली.

 

लेखिका : कल्याणी बापट (केळकर)

बडनेरा, अमरावती,  9604947256

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted