श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय सैनिकांची आठवणीतली श्रीकृष्ण जन्माष्टमी! ☆ श्री संभाजी बबन गायके 

वर्ष होते १९९४. राजस्थानातील सुरतगढ येठून कुमाऊ रेजिमेंटची १७वी बटालियन नुकतीच पंजाबातील गुरदासपुर येथे येऊन स्थिरावली होती. या रेजिमेंटमध्ये दसरा आणि इतर सर्वच उत्सव अतिशय उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. पण बटालियन इथं आल्याच्या दिवसांत लगेचच कोणताही मोठा सण-उत्सव नव्हता. पण आमच्या परंपरा, आमचा उत्साह आणि आदरातिथ्य नेमकं काय असतं ते ब्रिगेड हेडक्वार्टरला दाखवून देण्याची सर्वांनाच घाई झाली होती. पण दसरा तर खूप लांब होता. युद्ध सेवा मेडलने सन्मानित असलेले आणि श्रीलंकेत भारतीय शांतिसेनेत मोठी बहादुरी गाजवलेले कर्नल लिंकन लुईस Andrews हे आमचे कमांडिंग ऑफिसर होते… या साहेबांनी आदेशच दिला… आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी दस-यासारख्याच जोशात साजरी करायची! या कार्यक्रमासाठी ब्रिगेडच्या मोठ्या अधिका-यांना आमंत्रितही करण्यात आले. पण ब्रिगेड कमांडर साहेबांना त्याच दरम्यान महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असल्याने ते येऊ शकणार नव्हते. पण बाकीच्या मोठ्या साहेब लोकांना कुमाऊ सैनिक (ज्यांना प्रेमाने ‘भुल्ला’ म्हणजे धाकटा भाऊ म्हणले जाते) ते कुणापेक्षाही कमी नाहीत, हे दाखवून देण्याची संधी सोडून चालणार नव्हतं!

लष्करातील प्रत्येक कृती ही नियोजनबद्ध आणि शिस्तीत पार पाडली जाते. मंदिरात दर्शनासाठी जायचे असले तरी शिस्तीत संचलन करीत जातात. या जाण्याला ‘मंदिर परेड’ म्हटले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी कर्नल साहेबांच्या नेतृत्वात आमची ‘मंदिर परेड’ निघाली. या विशेष समारंभासाठी आमच्या युनिटचे मंदिर खूप छान सजवण्यात आले. मंदिरात भजने म्हणायाला सुरुवात झाली. कर्नल साहेब हे बॉक्सर, धिप्पाड, उंचेपुरे… तेही त्यांच्या ‘विशेष’ आवाजात भजने गाण्यात सामील झाले! मी त्यांच्या अगदी मागेच बसलेलो असल्याने मला साहेबांच्या सांगीतिक ‘क्षमतेचा’(? ) चांगलाच अनुभव येऊ लागला… पण करतो काय? साहेब माझे वरिष्ठ आणि मी साधा लेफ्टनंट. शिवाय माझ्या शेजारी बसलेले कॅप्टन आर. के. अनुजही मला वरिष्ठ! त्यामुळे साहेबांच्या आवाजाबाबत एखादी गंमतीदार टिपण्णी करण्याची अनिवार इच्छा दाबून ठेवावी लागली! साहेबांना भजनाच्या मधल्या ओळी फारशा पाठ नसाव्यात मात्र ‘ब्रिज में आयो मेरे नंदलाला’ या धृपदावेळी साहेब अगदी टिपेचा सूर लावीत…!

११. ५९ वाजता भजने एकदम थांबली… देवाच्या जन्माची घटिका जवळ आली होती… एवढ्यात युनिटच्या भटजी साहेबांनी म्हणजे पंडितजी यांनी जोरदार आज्ञा दिली… ”मंदिर परेड… सावधान बैठ! ” एका क्षणात तिथे जणू हजार पुतळे आहेत.. असा भास होऊ लागला… अशी शिस्त असतेच आमच्यात!

पंडितजी Andrews साहेबांच्या समोर लेफ्ट-राईट करीत आले… आणि म्हणाले, ”रामराम, साहब! श्री कृष्ण जन्म की अनुमती चाहता हूं, श्रीमान! ”

यावर कोणाला काहीही वाटलं नाही… प्रत्यक्ष देवाच्या जन्मासाठी माणसाकडे परवानगी मागितली जात होती… एरव्ही इतरांना हे अत्यंत हास्यास्पद, गंमतीचे वाटू शकले असते. पण लष्करी शिस्तीनुसार सर्व प्रक्रिया अत्यंत इमानदारीत पार पाडले जात होती… साहेबांनीही उत्तर दिलं, ”रामराम, पंडितजी! अनुमती है! ” हे म्हणताना साहेबांचा चेहरा उजळून निघाला होता, डोळ्यांत चमक दिसत होती! एक ख्रिस्ती अधिकारी हिंदू सैनिक असलेल्या सैन्य तुकडीचे नेतृत्व करत होता आणि त्यांच्या सणांत मन:पूर्वक सहभागीही झाला होता! किंबहुना जन्माष्टमी साजरी करण्याची कल्पनाही त्यांचीच होती. भारतीय सेनेचे हेच तर वैशिष्ट्य आहे… धर्मावर, जातीवर, प्रांतांवर आधारीत सैन्य तुकड्या निर्माण होत असल्या तरी त्यांचे कमांडींग ऑफिसर्स, इतर काही ऑफिसर्स विविध धर्मांचे, जातींचे असू शकतात. इथले सर्व सैनिक एकमेकांचे बंधू, साहेब लोक पालक, आई-बाप अशी भूमिका असते. सैन्यतुकडी एक कुटुंब असते… सर्वसमावेशक, व्यापक अशा मोठ्या सैन्यकुटुंबाचा एक अविभाज्य भाग असते! इथल्या तमिळ, मल्याळी अधिका-यांची मुलं सफाईदार पंजाबी भाषा बोलू शकतात… कारण त्यांचे वडील शीख तुकडीचे ऑफिसर असतात… अशीच साखळी असते… भक्कम! सैन्य हाच धर्म… देशसेवा हेच कर्म.. पूजा!

झालं… साहेबांची अनुमती मिळाल्याबरोबर मंदिराच्या छताला लटकवलेला सजवलेला सुंदर पाळणा खाली घेण्यात आला… त्यात भगवान श्रीकृष्ण बालकस्वरूपात विराजमान होते… आज त्यांचा जन्म होणार होता! इशारा होताच मंदिरापासून दूर ठेवण्यात आलेल्या छोट्या प्लास्टिक स्फोटकाचा प्रतिकात्मक फटाका म्हणून बार उडवण्यात आला… श्रीकृष्ण जन्माचा क्षण साजरा करण्यासाठी… संपूर्ण मंदिर देवाच्या स्तुतीने भरून गेले… एकाच वेळी हजारभर सैनिक, त्यांचे अधिकारी भक्तीभावाने भजने गाऊ लागले… वातावरणात शिस्तबद्ध धर्मभावना आकार घेऊन स्थिर झाली होती!

तेवढ्यात मंदिरातला टेलिफोन खणाणला… ब्रिगेडीअर साहेबांना कर्नल साहेबांशी तातडीने बोलायचे होते… समजलं… की… साहेब प्रवासातून घाईघाईने ब्रिगेडमध्ये परतले होते… त्यांच्या कानावर कुमाऊ तुकडीत साज-या केल्या जाणार असलेल्या जन्माष्टमीबद्दल खूप भारी भारी गोष्टी गेल्या होत्याच… आता साहेब म्हणत होते… मी येऊ का? म्हणजे मी येतोच!

कर्नल साहेब आता थोडे गडबडले.. एकतर कृष्णजन्म होऊन गेला होता… आणि आता साहेब यायचं म्हणताहेत! श्रीलंकेत असताना तेथील शत्रू कर्नल साहेबांचे नाव कानांवर पडताच गार पडत असे… पण इथे साहेबांचाच गळा सुकला… कितीही झाले तरी त्यांचे बॉस भेट देण्यास यायचे होते… आणि मुख्य कार्यक्रम तर होऊन गेला होती… तरीही ते म्हणाले, ”हो, साहेब. या ना! आपले स्वागत आहे! ”

काही मिनिटांनी पंडितजी पुन्हा जोरात म्हणाले… ”मंदिर परेड, सावधान बैठ! ” पुन्हा हजार सैनिक जागेवर शांतपणे बसले! पंडितजी ब्रिगेड कमांडर साहेबांसमोर तसेच लेफ्ट-राईट करीत गेले… सफाईदारपणे त्यांना salute बजावला… आणि म्हणाले, ”रामराम, साहब! श्री कृष्ण जन्म की अनुमती चाहता हूं, श्रीमान! ”

आता या दुस-यांदा होणार असलेल्या जन्माची अनुमती ब्रिगेड कमांडर साहेबांनी दिली! घाईघाईत पुन्हा ताला टांगलेला पाळणा पुन्हा हळुवार खाली घेण्यात आला… पुन्हा फटाका वाजला.. पुन्हा भजने गायली जाऊ लागली!

सुजीचा हलवा प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणात तयार केला गेला होता, तो सर्वांनी पोटभर खाल्ला… आणि आमच्या या मंदिर समारंभाची शान असलेले सुबेदार गोपाल सिंग सोईन यांनी आमची जोरदार युद्धगर्जना केली… कालिका माता की जय! … एकाच वेळी हजार कंठ ही गर्जना करू लागले… परिसराच्याही अंगावर शहारे उमटले असतील!

कर्नल Andrews साहेबांनी हात जोडले, डोळे मिटले… आणि ते उद्गारले, ”जय राम सर्व शक्तीमान! ’ मंदिर परेड समाप्त झाली होती!

आम्ही सर्वजण मंदिराबाहेर आलो.. तेंव्हा कर्नल Andrews साहेब ब्रिगेड कमांडर साहेबांशी मोठ्या उत्साहात बोलत असलेले दिसले… त्यांच्या चेह-यावर खूप आनंद होता!

या दिवशी मी लष्करी जीवनातील एक मोठा धडा शिकलो… जर तुम्ही भारतीय सेनेच्या तुकडीचे अधिकारी असाल तर तुमच्या जन्माचा धर्म दुस-या क्रमांकावर राहतो… तुम्ही ज्या सैनिकांचे नेतृत्व करता, त्या सैनिकांचा धर्मच तुमचा पहिला धर्म बनून जातो. तुमच्या त्यांच्यासोबतच जगता आणि प्रार्थना करता आणि प्रसंगी प्राणही अर्पण करता… देशासाठी!

मुसलमान धर्मीय सैनिक असलेल्या तुकडीचा हिंदू अधिकारी जेंव्हा रमझान पाळतो, दुपारच्या कडक उन्हात त्याला देऊ करण्यात आलेला थंड लिंबाचा रस नम्रपणे नाकारतो… आणि हे पाहून तेथे उपस्थित असलेले अन्य सैन्य तुकड्यांचे अधिकारीही त्यांच्या त्यांच्या हातांतील लिंबाच्या रसाचे प्याले त्या अधिका-याच्या कृतीचा सन्मान म्हणून तसेच न पिता खाली ठेवतात… तेंव्हा लक्षात येते… आपण भारतीय सेनेत आहोत! मनात विचार येतो… कोण आहेत ही माणसं… कशाची बनली आहेत?

हीच माणसं म्हणजे भारतीय सेना एकाच वेळी धार्मिकही आहे आणि पुरोगामीसुद्धा. पाकिस्तान्यांना कित्येक वेळा धूळ चारणारी, चिन्यांच्या समोर नेटाने उभी राहणारी, सीमांचे रक्षण करताना जीवाची रोज बाजी लावाणारी, हजारो अतिरेक्यांना यमसदनी धाडणारी आणि त्या प्रयत्नांत प्राणांची कुर्बानीही देणारी भारतीय सेना कश्मिरात स्थानिक मुस्लिमांसाठी इफ्तारही आयोजित करताना दिसते. हाती स्वयंचलित शस्त्रात्रे धारण केलेली सुमारे बारा लाखाची खडी फौज, त्यांतील स्त्री-पुरुष सैनिक, अधिकारी ही निधर्मी सर्वसमावेशक परंपरा अखंड सुरु ठेवतील… ही जणू काळ्या दगडावरची पांढरी रेघच आहे!

सन्मान, बंधुभाव, एकात्मता, निष्ठा, विश्वास, धैर्य आणि नैतिकता म्हणजेच भारतीय सेना. जे सत्य आहे त्याचे पाठराखण करणारी… सत्याचे रक्षण प्रत्येकवेळी लेखणीतून, फलकांवरच्या मजकुरातून, मेणबत्त्या हाती घेऊन काढलेल्या पदयात्रांतूनच केले जाते असे नाही… हाती शस्त्र धरलेला सैनिकही सत्याच्या रक्षणार्थ उभा असलेला असावा लागतो!

कुणाही सांगेल भारतीय ध्वजात तीन रंग असतात… भगवा… पांढरा… हिरवा! पण यात एक चौथा रंगही आहे… जो डोळ्यांना दिसत नसला तरी आहे… तो रंग ऑलिव ग्रीन… भारतीय लष्करी पोशाखाचा रंग!

(हे भारतीय सेनेच्या १७, कुमाऊ रेजिमेंटचे मेजर गौरव आर्य (सेवानिवृत्त) यांनी लिहिलेल्या व २५ मे, २०१८ रोजी प्रकाशित केलेल्या एका लेखाचे स्वैर भाषांतर आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीबाबतीत त्यांच्या बटालियन मध्ये घडलेल्या एका प्रसंगाचे वर्णन करताना मेजर साहेबांनी एकूणच भारतीय सैन्याच्या उच्च दर्जाच्या नैतिक मानसिकतेचे मनोहारी दर्शन घडवले आहे. माहितीचे आणि लेखनाचे सर्व श्रेय मेजर गौरव आर्य (सेवानिवृत्त) साहेबांचे आहे.).

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted