श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सियाचीनचे वाघ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 – – कर्नल विजयंत कुमार आणि शिपाई सरदार सिंग!

सुमारे ७६ किलोमीटर्स लांबी आणि सुमारे २ ते ८ किलोमीटर्सची रुंदी असलेल्या एखाद्या भूभागाची किंमत ती कितीशी असणार? किंमत प्रचंड आहे… ८६९ जीव!

हा काही जमिनीचा सामान्य तुकडा नाही. इथं जर पाय रोवून उभं नाही राहिलं तर काहीच काळात ती जागा शत्रू गिळून टाकेल… आणि मग आणखी आत येईल आपल्या भूभागाचा लचका तोडायला! म्हणून एवढी मोठी किंमत चुकवून आपले लोक इथं लढत असतात.. शत्रूशीही आणि इथल्या हवामानाशीही. समुद्रसपाटीपासूनची उंची ५७५३ मीटर्स म्हणजे १८८७५ फूट. ज्या ऋतूला आपण साधारणपणे उन्हाळा म्हणतो त्या दिवसांत इथं सपाटीवर तापमान १० अंश असते… त्याचवेळी तिथून सुमारे १८०० फूट उंचीवर हेच तापमान शून्याखाली २० ते कितीही खाली जाते! ही सियाचीनची अल्पशी ओळख.

इथं माणूसच काय पण कोणताही प्राणी जिवंत राहूच नये, असा जणू निसर्गाने चंगच बांधलेला आहे. पण देशाच्या सीमांचं रक्षण करण्याच्या कार्यात निसर्गाला तोंड देण्याशिवाय पर्यायच नाही ठेवलेला आपल्या शत्रूने. १९८४ मध्ये पाकिस्तान आपल्या या हद्दीत घुसण्याच्या मार्गावर असतानाच अगदी काहीच दिवस आधी ऑपरेशन मेघदूतने बाजी मारली! सियाचीनच्या बर्फाच्छादीत प्रदेशावर १९७९ मध्ये भारतीय सैन्याचे पर्वतारोही अधिकारी ब्रिगेडीअर श्री. नरेंद्र कुमार यांनी एखाद्या गरुडाच्या नजरेसारखी तीक्ष्ण नजर फिरवली… त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भूभागावर पाकिस्तान आक्रमण करू शकतो… त्यांनी या कठीण तापमानात अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि अत्यंत सविस्तर अभ्यास करून अहवाल दिला! १९८४ मध्ये भारताने सियाचीनवर पावलं रोवली! कुमार साहेब सियाचीनचं वर्णन ‘एक प्रचंड लांबीचा श्वेतसर्प’ असा करतात!

पण इथं केवळ ताबा मिळवून चालणार नव्हतं… तो टिकवणेही महत्त्वाचे होते. १९८४ मध्ये मात खाल्लेल्या पाकला इथं पोहोचायला त्यांच्या बाजूने केवळ काही तासच पुरू शकतात. भारताला मात्र इथवर पोहोचायला काही दिवस लागतात. सियाचीनवर लष्करी अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचा आपला रोजचा खर्च आहे सुमारे सहा कोटी. पाकिस्तानला यामानाने अगदी कमी पैसे पडतात! त्यामुळे आपण एक क्षणही दुर्लक्ष केले की ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात… टपून बसलेल्या कोल्हया-कुत्र्यांसारखे. अर्थात पाकिस्तानचे सैनिकही या प्रयत्नांत मोठ्या प्रमाणात दगावलेले आहेत… दोन्ही देशांचे मिळून सुमारे दोन-अडीच हजार लोक सियाचीनमध्ये दगावलेले आहेत!

सियाचीनमध्ये जगणे किती कठीण आहे, यावर शेकडो पानांचा प्रबंध लिहिता येईल. आणि याही स्थितीत तिथे लढणा-या आपल्या भारतीय सैनिकांपैकी एका आपल्याला अज्ञात असलेल्या एका सैन्याधिका-याची आणि एका जवानाची ही कथा… ३० एप्रिल, १९८९ रोजी सियाचीनवर घडलेली.

पाकिस्तानच्या हद्दीत त्यांनी उंचावर म्हणजे Point 6400 वर एक Observation Post (सैन्यचौकी) निर्माण केलेली होती. ६४०० ही तेथील त्या पर्वताची फुटांमधली उंची तिथून ते आपल्या सैन्यावर नजर ठेवून त्यांच्या तोफखान्यास सूचना देत गोळीबार करण्यास साहाय्य करीत. ही चौकी तिथून हटवल्याशिवाय आपला धोका कमी होणार नव्हता. इथं हल्ला करण्यासाठी साधनसामुग्री पोहोचवणे सोपे व्हावे म्हणून हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा तयार करणे गरजचे होते. या तयारीनिशी आपले २, डोग्रा रेजिमेंटचे वीस सैनिक वर निघाले. त्यांचे युवा अधिकारी कॅप्टन विजयंत कुमार यांना जिथे helipad बनवायचे होते, त्या जागेवर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उतरवण्यात आले… आपले सैनिक वर पोहोचेपर्यंत विजयंत साहेब तिथे एकटेच होते… त्या भयावह थंडीत. आणि वरून पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार होण्याची अगदी खूपच शक्यता असतानाही! आपले सैनिक खालून रस्ता तयार करीत करीत वर चढत येत होते… जागोजागी दोर बांधावे लागतात… शिड्या लावाव्या लागतात! तापमान होते उणे ३५ पेक्षाही कमी. विजयंत साहेबांनी हेलीकॉप्टर साठी योग्य जागा शोधून ठेवली. आपले सैनिक तिथवर पोहोचले. ११ एप्रिल रोजी निघालेले हे दल तिथे चार दिवसांनी पोहोचले. आणि त्यांनी तिथे एक चौकी निर्माण केली… helipad तयार केले. आणि २१ एप्रिल रोजी तिथे हेलीकॉप्टर उतरवण्याचा प्राथमिक सराव करण्यात आला… यशस्वीरीत्या!

काहीच दिवसांत या ठिकाणी आपले सशक्त सैन्यचौकी कार्यान्वित झाली. इथल्या चौकीत एकावेळी केवळ चार सैनिक आणि एक अधिकारी राहू शकत एवढीच जागा होती. पाकिस्तान्यांच्या दृष्टीस ही गोष्ट पडणार नाही, असे शक्यच नव्हते. त्यांनी घाई-घाईत एक योजना आखली आणि आपल्या या चौकीवर हल्ला करण्यासाठी हेलीकॉप्टरला खाली दोरीला लटकावून एक अधिकारी आणि काही सैनिक इथवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतू या भागात हेलीकॉप्टर उडवणे ही खूप कौशल्याची बाब असते. त्यांचे हेलीकॉप्टर हवेतच थांबले आणि खाली कोसळू लागले. त्यांनी दोर कापून त्यांच्या सैनिकांना नशीबाच्या भरवशावर सोडून ते निघून गेले! हे सैनिक नेमके पडले ते भारतीय चौकीच्या खालच्या बाजूला! ते खाली गेले असते तर आपल्या सैनिकांच्या टप्प्यात आले असते. त्यांनी एक रस्ता शोधला आणि त्यांनी एक योजन आखली… आपल्या या चार सैनिक असलेल्या चौकीवर खालून वर चढून येत अचानक हल्ला करायची!

या चार सैनिकांसाठी बर्फात खड्डे घेऊन खंदक तयार करण्यात आले होते. या खंदकावर रायफली ठेवून सैनिक उभे असत. या रायफली थंड पडू नयेत म्हणून पायांजवळ केरोसीनचा स्टोव्ह पेटता ठेवावा लागतो.. अन्यथा हत्यारे गोठून जातात… आणि फायरींग करू शकत नाहीत.!

चार सैनिक आणि एक अधिकारी अशी पाच जणांची तुकडी. दोघा सैनिकांनी दोन तास पहारा द्यायचा… तोवर इतर तिघे जण आराम करतील… असे आळीपाळीने करायचे अशी व्यवस्था होती.

सायंकाळची वेळ. कॅप्टन विजयंत कुमार साहेबांचा buddy अर्थात साहाय्यक सैनिक लान्स नायक प्रेम सिंग साहेबांशी गप्पा मारतो आहे… म्हणाला, ”साहेब, मला मुलगा झाल्याची बातमी कालच समजली! ” यावर विजयंत साहेबांनी त्याचे अभिनंदन केले… आणि इथून खाली गेल्यावर पार्टी करण्याचे निश्चित केले! तेवढ्यात शिपाई सरदार सिंग आणि लान्स नायक कमलेश्वर आपली पाळी संपवून चौकीत परत आले… सरदार सिंग यांनी आपल्या पायांतील बूट काहीवेळा उतरवले आणि तंबूतील स्टोवच्या उष्णतेवर ते पाय शेकू लागले! आता उरलेल्या दोघांना पहा-यावर जायचे होते! त्यानुसार प्रेमसिंगही पहा-यावर गेले… आणि त्यांनी शत्रूला पाहिले… दुश्मन… दुश्मन! अशी आरोळी दिली… सरदार सिंग हत्यार घेऊन अनवाणी पायानेच बाहेर धावले… आणि बर्फातून धावत जात त्यांनी चौकीवर चालून येणा-या शत्रूवर अचूक हल्ला चढवला… इकडे पहा-यावर नुकत्याच परतलेल्या प्रेमसिंग यांची गन अजून थंड असल्याने फायर होतच नव्हती… ते जबर जखमी झाले. सरदार सिंग यांनी प्रेम सिंग यांना तिथून उचलून मागे आणले… तंबूत ठेवले… आणि त्यांच्याकडची काडतुसे घेऊन पुन्हा बाहेर धाव घेतली… तीन दुश्मन उडवले… आणि त्याच प्रयत्नात खांद्यावर गोळी लागून जखमीही झाले.

इकडे एका क्षणात कॅप्टन विजयंत कुमार साहेबांनी कृती केली… चौकीत घुसले आणि तिथे असलेले rocket launcher हाती पेलले… आणि या चौघा-पाच जणांच्या दिशेने फायर केले… यावेळी शत्रूही गोळीबार करीत होता… पण कॅप्टन साहेबांनी त्याची पर्वा केली नाही!

Rocket launcher च्या एका गोळ्याने काम फत्ते केले… ते पाचही जण मागे फेकले गेले… आणि कुठे खाली दरीत गेले समजले नाही! याच दरम्यान आपले तिन्ही सैनिक खंदकात पोहोचले… त्यांनी तिथे गरम करण्यासाठी ठेवलेल्या हत्यारांचा वापर करण्यास सुरुवात केली… जोरदार गोळीबार सुरु केला… तिथले पहाड या आवाजांनी एकदम सावध झाले! एरव्ही तिथे इतर आवाज विरळाच असतात. हा आवाज अर्थातच इथून ५०० मीटर्स खाली असलेल्या सैन्य तुकडीने ऐकला होताच. त्यांना वाटले आपली ही चौकी गेली… कारण विजयंत साहेब खाली रेडीओ मेसेज देण्याच्या स्थितीत नव्हते… ते जिथून पाकिस्तानी सैनिक वर चढून आले होते त्यांच्या दिशेने सुमारे पाचशे मीटर्स पर्यंत चालत गेले होते. जाताना कमरेला दोर बांधून घेतला… कारण वाटेत कुठेही बर्फाचा चिंचोळा खड्डा असू शकतो… अंधार होता… त्यांनी खाली वाकून पाहिले तर तिथे दोर लावलेला होता… आणि तो दर हेलाकावे खात होता… अर्थात खालून आणखी काही सैनिक वर येण्याच्या प्रयत्नात होते! कॅप्टन साहेबांनी दोर कापून टाकला…!

इकडे चौकी आणखी एका बाजूने पाच पाकिस्तानी बर्फात सरपटत सरपटत हल्ला करण्यास पुढे सरसावले… आपली पहा-याची पाळी संपवून तंबूत माघारी आलेल्या शिपाई सरदार सिंग यांनी आपली चांगली तापलेली गन अचूक डागत त्यांना ठोकले!

इकडे खालून वर पाहणा-या आपल्या सैनिकांना वाटले की आपल्या चौकीवर हल्ला करून ती पाकने जिंकून घेतली आहे.. आणि आता ते आणखी मागे म्हणजे आपल्यापर्यंत येतील! त्यांनी जिथे कॅप्टन साहेबांनी rocket launcher डागले होते, त्या जागेचा संदर्भ घेत खालून तोफा डागण्याची तयारी केली होती… तेवढ्यात कॅप्टन साहेब तंबूत परतले… त्यांनी खाली रेडीओ मेसेज केला… हलो… विक्टर हिअर! आमचा 

खाली हा मेसेज ऐकणा-या अधिका-यांचा क्षणभर त्यांच्या आवाजावर विश्वासच बसला नाही… कारण त्यांनी त्या चौकीवर तीन बाजूंनी झालेला गोळीबार पाहिला होता!

सुदैवाने आपला गोळीबार सुरु होण्याआधीच कॅप्टन साहेबांनी संदेश पोहोचवला आणि मोठा अनर्थ टळला… कारण बोफोर्स तोफेचा गोळा जिथं पडतो त्या जवळचा कित्येक मीटर्सचा परिसर भाजून निघतो! यावेळी पाक तोफखानाही जागा झाला… आणि त्यांनी गोळे डागायला सुरुवात केली… आपल्या बोफोर्स या रात्री हजार वेळा कडाडल्या!

कॅप्टन विजयंत यांच्या तुकडीच्या जागी मग खालून नऊ सैनिक आणि एक अधिकारी अशी सुसज्ज तुकडी निघाली… परंतू तोफांच्या मां-यामुळे त्या परिसरातील बर्फाचे कडे पिचकले गेले होते… असाच एक मोठा हिमनग निसटला आणि त्यात आपले हे नऊ सैनिक आणि सुभेदार भागसिंग हुतात्मा झाले… त्यांचे देह ताब्यात येण्यास महिना-दीड महिना लागला… ही किंमत असते सियाचीनमधल्या लढाईची!

वर मदतीस येणारी दुसरी तुकडी येण्यास अजून अवकाश होता. विजयंत साहेब आणि त्यांचे चार सैनिक आता अधिकच सावध राहू लागले… झोप विसरली गेली. दोन तीन दिवस सतत खूप बर्फ पडले… पाच फूट उंचीचा बर्फ साठला… डोळ्यांच्या पापण्यांवर जर डोळ्यांतून येणा-या पाण्याचा थेंब थांबला… की त्याचे बर्फात रुपांतर होते… पापण्यांवरील ते गोठलेले बर्फ बोटांनी चुरा करून काढून टाकले तरच समोरचे दिसणार!

या दरम्यान या चौकीतील सर्वांनाच हिमबाधा झाली… तिघांची हातांची बोटे कापून काढावी लागली.. एक सैनिक हुतात्मा झाला… विजयंत साहेबांच्या पायांना जखमा झाल्या… त्या ब-या होण्यास खूप कालावधी जावा लागला!

सहा एप्रिल रोजी हवामान थोडे सुधारल्यावर कॅप्टन विजयंत आणि इतरांना खालच्या मुख्य तळावर आणण्यात आले. तेथे त्यांचे खूप जोशात स्वागत करण्यात आले! शिपाई सरदार सिंग आणि कॅप्टन विजयंत कुमार या दोघांनाही वीर चक्र सन्मान जाहीर करण्यात आला.

पाकिस्तानी चौकीला शह देण्यासाठी हाती घेतल्या गेलेल्या या सैन्य कारवाईला ऑपरेशन आयबक्स असे नाव दिले गेले होते. आयबक्स हा बर्फाळ प्रदेशात राहणारा मेंढासदृश प्राणी असून डोंगराच्या अगदी नव्वद अंशाच्या उभ्या भिंतीवर नीडरपणे चढून जाण्यासाठी हा प्राणी वाकबगार आहे.

पुढे या भागातून दोन्ही देशांनी मागे जावे असा करार झाला होता. पाकिस्तान करार पाळण्याच्या बाबतीत कुप्रसिद्ध असल्याने आपले सैन्य इथे चोवीस तास सज्ज असते!

कॅप्टन विजयंत कुमार यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. पण या मोहिमेदरम्यान गमावलेल्या दहा सैनिक आणि एका अधिका-याच्या आठवणी त्यांना आजही सतत भेडसावत असतात!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted