श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १२५ आणि १२६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. १२५ – – –

अनाथां दिनाकारणे जन्मताहे ।

कलंकी पुढे देव होणार आहे ।

जया वर्णितां सीणली वेदवाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२५।।

अर्थ : परमेश्वर दीन अनाथ भक्तांसाठी अवतार घेतो. कलियुगात तो कल्की म्हणून अवतार घेणार आहे. अशा या परमेश्वराचे वर्णन करताना वेद सुद्धा थकले आहेत. तात्पर्य आपल्या भक्तांचा कैवारी असलेला परमेश्वर त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(कलंकी – कल्की अवतार)

विवेचन : आधीच्या श्लोकांमध्ये समर्थांनी नऊ अवतारांचे वर्णन केले आहे. त्या त्या अवतारात आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी परमेश्वराने अवतार घेतल्याचे आपल्याला दिसते. ‘ परित्राणाया साधूनां विनाशायच दुष्कृताम् ‘ हे त्याचे ब्रीदच आहे. म्हणून अनाथ दीन जनांसाठी तो अवतार घेतो. त्यांचे दुर्जनांपासून रक्षण करतो. परंतु अनाथ आणि दीन जन कोणते? आपण नेहमीच्या व्यावहारिक अर्थाने समजतो, ते नाहीत. अनाथ आणि दीन या शब्दांचा अर्थ इथे ज्यांना भगवंत हाच माझा नाथ आहे आणि भगवंताशिवाय अन्य आपले कोणी नाही असे वाटते ते असा अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळी भक्तांनी त्याची, ” हे भगवंता, आता मला तुझ्याशिवाय अन्य कोणी त्राता नाही ” अशा आर्ततेने आळवणी केली त्या त्या वेळी तो धावून आला. मागील श्लोकांमध्ये गजेंद्राचे उदाहरण, द्रौपदीचे उदाहरण अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत.

आताच्या काळात अन्याय, अत्याचार वाढला आहे. लोक खरा धर्म विसरले आहेत. लोकांच्या वागण्याबोलण्यात दांभिकतेचे प्रमाण वाढले आहे. राजसत्ता, शासनसंस्थेत भ्रष्टाचार, अनागोंदी वाढली आहे. अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा अगदी कळसाला पोचेल तेव्हा कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की रूपाने अवतार घेतील. या वेळी त्यांच्यासोबत अनेक सज्जन शक्ती देखील त्यांना त्याच्या कार्यात साहाय्य करतील. भगवंताच्या नऊ अवतारानंतर होणारा हा दहावा अवतार असेल. कल्की अवताराचे वर्णन पुराणात आले आहे. पुराणात वर्णन केल्यानुसार कल्की म्हणजे एक तेजस्वी ब्रह्मचारी योद्धा असून तो शुभ्र अशा अश्वावर स्वार झाला आहे. त्याच्या हातात तलवार आहे. त्याचे हे वर्णन हे सूचित करते की तो धर्माच्या रक्षणार्थ आणि कल्याणकारी अशा राजसत्तेची स्थापना करणार आहे. धर्माला हानी पोचवणाऱ्या दुष्ट शक्तींचा विनाश करणार आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे हा कल्की अवतार म्हणजे एका नव्या क्रांतीची सुरुवात असेल. अन्याय, अत्याचाराचे अंधकारमय युग संपून एका नव्या युगाची पहाट होईल.

ज्या ज्या वेळी समाजात अन्याय, अत्याचार वाढला आहे, राजसत्ता आणि शासनसत्ता भ्रष्ट झाली आहे अशा वेळी समाजात वेळोवेळी क्रांती घडून आली आहे. हा इतिहास आहे. अशा परिस्थितीत कोणीतरी अशी व्यक्ती जन्माला येते की तिच्या मागे सगळा समाज जातो. अशी व्यक्ती क्रांतीचे माध्यम ठरते. अशा व्यक्तीला समाजातील विधायक शक्तींचे देखील सहकार्य मिळते असाही अर्थ या ठिकाणी घेता येईल.

तात्पर्य, अशा भगवंताचे यथार्थ वर्णन करणे कोणालाही शक्य नाही. त्याचे वर्णन करताना प्रत्यक्ष वेद देखील शिणले आहेत. तर आपल्यासारख्या सामान्य जनांची काय कथा! तेव्हा दीन अनाथ होऊन म्हणजेच हे भगवंता, मला तुझ्याशिवाय कोणी नाही अशा भावनेने आपण परमेश्वराची भक्ती करावी. तो दीनदयाळू आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.

स्वसंवाद 

१. व्यवहारात माझ्याकडे सर्व काही असले, तरी ईश्वरासमोर उभे राहताना “तुझ्याशिवाय माझा दुसरा कुणीही त्राता नाही” अशी ‘अनाथ आणि दीन’ असल्याची अनन्य शरणागती माझ्या ठायी असते का?

२. आजूबाजूला वाढलेला भ्रष्टाचार किंवा दांभिकता पाहून मी केवळ हताश होऊन नकारात्मक विचार करतो, की कल्की अवताराला (सत्प्रवृत्तीला) साहाय्य करणारी एक ‘सज्जन शक्ती’ म्हणून माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो?

३. ज्याचे यथार्थ वर्णन करताना प्रत्यक्ष वेदही थकले, त्या भगवंताचे आकलन मी माझ्या मर्यादित बुद्धीने आणि अहंकाराने करण्याचा व्यर्थ प्रयत्न तर करत नाही ना?

 ४. संकटाच्या किंवा अन्यायाच्या अंधकारमय युगातही, भगवंत भक्तांचा कैवारी बनून एका ‘नव्या युगाची पहाट’ नक्कीच आणेल, हा अढळ विश्वास माझ्या मनात आहे का?

=====

श्लोक क्र. १२६ – – – 

जनाकारणे देव लीळावतारी ।

बहुतांपरी आदरे वेषधारी ।

तया नेणती ते जन पापरूपी ।

दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी ।।१२६।।

अर्थ : भक्तांच्या उद्धारासाठी भगवंत सहजपणे पृथ्वीवर अवतार घेतो. अत्यंत प्रेमपूर्वक तो नाना प्रकारचे वेष धारण करतो. परंतु जे लोक त्याला ओळखत नाहीत ते दुरात्मे, वाईट, भगवंताबद्दल सद्भाव नसणारे आणि पापी समजावे.

(लीळा – लीला/क्रीडा, बहुतांपरी – वेगवेगळ्या प्रकारे, आदरे – प्रेमपूर्वक, वेषधारी – निरनिराळ्या रूपात प्रकट होणे, नेणती – न जाणणारे, दुरात्मे – भगवंतापासून दूर गेलेले आत्मे, नष्ट – वाईट, चांडाळ – भगवंताबद्दल आदर नसलेला)

विवेचन : आधीच्या श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितले आहे की देव आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही. या श्लोकामध्ये भक्तांसाठी परमेश्वराचे एक महत्वाचे लक्षण ते सांगून ठेवतात. ती गोष्ट म्हणजे आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ अवतार घेणे ही भगवंताची लीला आहे. लीला या शब्दाचे दोन प्रकारे अर्थ आपल्याला घेता येतील. लीला म्हणजे चमत्कार आणि दुसरा अर्थ म्हणजे क्रीडा. एखादी गोष्ट अत्यंत सहजपणे करणे. भगवंतासाठी अवतार घेणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ” अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्यां त्यांसी. ” आपल्या पूर्वीच्या नऊ अवतारात त्याने वेगवेगळ्या प्रकारे देह धारण केला आहे. परंतु आपल्या भक्तांच्या साहाय्यार्थ वेगवेगळा वेष धारण करून त्याने त्यांना साहाय्य केले आहे. दामाजीपंतांसाठी त्याने विठू महाराचे रूप घेतले. एकनाथ महाराजांकडे त्याने श्रीखंड्या म्हणून पाणी भरले. जनाबाईला दळण दळू लागला. ‘ भक्त कैवारीया होसी नारायणा ‘ असा तो वेगवेगळ्या वेशात भक्तांचा कैवारी झाला. आणि हे सगळे त्याने कसे केले? तर समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे ” बहुतांपरी आदरे वेषधारी ” म्हणजे अत्यंत प्रेमपूर्वक. दयाळू, कृपाळू होऊन.

आपण सामान्य माणसे. आपल्याला फक्त दोनच गोष्टी करता येतात. आपले नित्यकर्म आपण करू शकतो. सत्कर्मे करून पुण्याचा संचय गाठी बांधू शकतो. संत मात्र आपल्या अवतारात दोन प्रकारच्या गोष्टी करतात. एक म्हणजे धर्माबद्दलची जागृती घडवून आणणे आणि समाजामधील सात्विकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. सर्व संतांनी ही कामे केली आहेत. पण परमेश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा तो या दोन गोष्टींव्यतिरिक्त आणखी एक तिसरी गोष्ट करतो. ती म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे पारिपत्य. “परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।” हे त्याचे ब्रीदच आहे.

आपल्या भक्तांसाठी तो नाना प्रकारचे देह धारण, वेष धारण करतो. त्याचे अनन्य भक्त त्याला ओळखू शकतात. परंतु दुर्जनांच्या कितीही सहवासात तो आला तरी अशी माणसे त्याला फक्त एक देहधारी व्यक्ती किंवा सामान्य माणूस समजतात. महाभारतात कुंती, अर्जुन, द्रौपदी, भीष्म आदींनी ओळखले होते की श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. परंतु दुर्योधन, शिशुपाल आणि अन्य दुराचारी राजे मात्र त्याचा उल्लेख शेवटपर्यंत ‘ गवळ्याचा पोर ‘ असाच करत राहिले. रावण देखील आयुष्यभर रामाची एक सामान्य मानव म्हणून हेटाळणी करत आला.

अशा परमेश्वराला किंवा त्याच्या अस्तित्वाला ओळखण्यास नकार देणाऱ्या दुष्प्रवृत्ती आजही समाजात आहेत. अशा लोकांबद्दल बोलताना समर्थांच्या मनात संतापाची भावना दाटून येते. त्यामुळे अशा लोकांचा उल्लेख ते दुरात्मा, दुराचारी, पापी, चांडाळ अशा प्रकारचे शब्द वापरून करतात. असे लोक स्वतः तर काही करीत नाहीतच पण इतर सत्प्रवृत्त आणि श्रद्धावान लोकांचाही बुद्धिभेद करण्याचे काम करतात. अशा लोकांना उद्देशून समर्थांनी वरील शब्द योजले आहेत. आपण अशा लोकांच्या फसव्या युक्तिवादाला बळी न पडता संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून परमेश्वराची भक्ती करावी हेच समर्थांना अपेक्षित आहे.

स्वसंवाद 

१. दामाजीपंत किंवा संत एकनाथांप्रमाणे, माझ्या आयुष्यातही भगवंत ‘नाना वेष धारण करून’ मला मदत करत असेल, तर त्याला ओळखण्याइतकी निर्मळ दृष्टी माझ्याकडे आहे का?

२. भगवंत माझ्यावर आणि जगावर अत्यंत ‘प्रेमपूर्वक’ (आदरे) कृपा करत असताना, मी मात्र दुर्योधनासारखा कोरडा आणि अविश्वासी दृष्टिकोन तर बाळगत नाही ना?

३. आजच्या काळात जे लोक श्रद्धेची किंवा सत्कर्माची खिल्ली उडवून ‘बुद्धिभेद’ करतात, त्यांच्या फसव्या युक्तिवादाला मी बळी पडतो, की माझा विश्वास संतांच्या शिकवणुकीवर अढळ ठेवतो?

४. ‘देव लीलावतारी आहे’, हे जाणून मी माझ्या जीवनातील संकटांना घाबरून जाण्याऐवजी, त्यामागील ईश्वराची ‘सहज लीला’ पाहण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक १२५ आणि १२६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted