श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 289
☆ श्रावण होऊ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
दीन उपाशी त्याच्यासाठी जेवण होऊ
पालनकर्त्या बापासाठी श्रावण होऊ
*
ह्या कष्टाळू रांगा पाहुन बरे वाटते
मुंग्यांसाठी थोडासा साखर कण होऊ
*
उघड्यावरती विकार त्याची लाज वाटते
त्याच्यासाठी अलमारीचा रे खण होऊ
*
शेतामधली माती घेतो अंगावरती
निर्मळ होण्यासाठी त्याचा साबण होऊ
*
फाटक्याच या पोत्यामधुनी कष्ट सांडती
गोणपाट हे शिवण्यासाठी दाभण होऊ
*
ब्राह्मण होता राक्षस होता विद्या होती
केवळ विद्या घेण्यासाठी रावण होऊ
*
भाळावरचे कुंकू झालो भाग्यवान मी
आज प्रियेच्या हातावरचे गोंदण होऊ
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




