श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 291
☆ घरास जखमा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आता पुन्हा नव्या तू देतो कशास जखमा
आधीच ठणकणाऱ्या होती चिरास जखमा
तू ठोकले घराला होते अनेक पाचर
केलेस वार इतके झाल्या घरास जखमा
पाण्यास वीज देते झटके अनेक वेळा
ही वीज कडकली अन केल्या ढगास जखमा
त्या आळ तर स्वतःवर घेण्या तयार नाही
शस्त्रा मधून कायम देतात त्रास जखमा
का वाटतात जखमा कोणा हव्या हव्याशा
काही इथे गुलाबी असतात खास जखमा
निर्जीव जे जगी या नाही म्हणे छळत हा
नव्हता जिवंत तो तर तरिही शवास जखमा
निर्भेळ दूध होते झाले असे कसे हे
हे दूध फाटले का झाल्या दुधास जखमा
शुल्लक जरी किटक हा देहास फार डसतो
छोट्या अनेक येथे देतोय डास जखमा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




