श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 293
☆ बापाचं हृदय… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आता पुन्हा नव्या तू देतो कशास जखमा
आधीच ठणकणाऱ्या होती चिरास जखमा
*
तू ठोकले घराला होते अनेक पाचर
केलेस वार इतके झाल्या घरास जखमा
*
पाण्यास वीज देते झटके अनेक वेळा
ही वीज कडकली अन केल्या ढगास जखमा
*
त्या आळ तर स्वतःवर घेण्या तयार नाही
शस्त्रा मधून कायम देतात त्रास जखमा
*
का वाटतात जखमा कोणा हव्या हव्याशा
काही इथे गुलाबी असतात खास जखमा
*
निर्जीव जे जगी या नाही म्हणे छळत हा
नव्हता जिवंत तो तर तरिही शवास जखमा
*
निर्भेळ दूध होते झाले असे कसे हे
हे दूध फाटले का झाल्या दुधास जखमा
*
शुल्लक जरी किटक हा देहास फार डसतो
छोट्या अनेक येथे देतोय डास जखमा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





