कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 258 – विजय साहित्य
☆ लोहगड…! ☆
☆
सह्याद्रिचा, सांगाती हा, बुलंद गड हा भारी.
मावळ प्रांती,मुख्य दुर्ग हा,
शिवसृष्टी साकारी…! ||धृ.||
*
पर्यटकांचा, दुर्ग साहसी
दम लागे चढताना
द्वारसमुही,लोहगडाची शिल्पकला बघताना
पर्वत राजी, नाणे मावळ
निसर्ग चवरी ढाळी
मुंबई पुणे,मार्गावरती,
लोहगडाची स्वारी…! १
*
गणेश आधी,मग नारायण हनुमानी दरवाजा.
अवघड वळणे,वाट चढाची
नाही गाजावाजा.
गड मजबूती,लोहगडाची,
,बुरुज बांधणी खासी.
विश्व मान्यता,पहा मिळाली,
दुर्गांच्या संसारी…!२
*
मालवलीच्या गिरीकंदरी,
दगडांची तटबंदी.
गायमुखाचा, चौक आगळा
पायवाट स्वच्छंदी.
प्राचीन गुहा,पाणी टाके ,
डोंगर यात्रा नामी.
शिरी गडाच्या, वाट अनोखी
विंचू काटा वारी…!३
*
सोळा कानी, बाव गडावर,
लीन जाहला माथा
सर्पाकारी,वाट गडाची,
ऐतिहासिक गाथा.
गड मध्याला,भुयार खासे,
शिवशौर्याची नांदी.
निजामशाही पासून सोबत
लोहगडी संचारी..!४
*
बुरूजावरुनी, दिठी देतसे
आवकजावक मात्रा.
गड मैत्रीची, जोड मनोहर
करूया चालत यात्रा.
वितंड गड वा, कठीण गड ही
भाजे बेडसे लेणी.
संबळ गड हा, स्वराज्य भूषण
विसापूर शेजारी..! ५
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





