श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # २९९
☆ आरास डोळ्यांची… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
अशी आरास डोळ्यांची
केली काजळ घालून
आनंदाच्या क्षणी सुद्धा
आली आसवे धावून
*
स्वच्छ झाला हा आरसा
डोळे निघाले धुऊन
त्याने डोळ्यात पाहिले
दिले स्वतःला झोकून
*
शुष्क ओठ पाकळीला
अश्रू घेतो हा चाटून
त्याला ओठाने टिपता
गेली लाली ही पुसून
*
ओंजळीत तो सुगंध
आला झाकून घेऊन
वेलीवर काही फुले
गेला होता उधळून
*
कार्य संपता फुलांचे
फुले जातात वाळून
काल शीर्षस्थानी होती
आज दिलेली फेकून
☆
अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





