श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०२
☆ पाळ तोच वारसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मोहजाळ भोवताल पोसलेस माणसा
सर्व राहते इथे नको करूस लालसा
*
रूप देखणे तरी अशांत चंद्र वाटतो
टाळतोय नेत्र धूर्त पाहतोय आरसा
*
मोह टाळ चादरीत मागतोस काय तू
ओंजळीत दान घे पुरेल एवढा पसा
*
वादळात का तुला असे उदास वाटते
दाखवून दे जगास तू कुठे असा तसा
*
दान धर्म पुण्य कर्म सागतात धर्म हे
त्यातलाच पंथ एक थोर होय खालसा
*
माणसास या इथे गुलाम तू करू नको
नेक काम कर असेच पाळ तोच वारसा
*
ठेच लागली म्हणून थांबणे नको इथे
वागणे असेच ठेव वाहतो झरा जसा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




