कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २६८ – विजय साहित्य
☆ जननी घराची…! ☆
(वृत्ताचे नाव – दिंडी, वृत्त प्रकार – मात्रावृत्त, वृत्त मात्रा संख्या – १९, मात्रांची विभागणी – ९ + १०)
☆
चार शब्दांची, मिळे साथ जेव्हा
शोध कवितेचा,लागलाय तेव्हा.
छंदात पाया, खणविला कवीने
वृत्तांत तिजला,बसविले खुबीने. १
*
गणांच्या समुहा, नवे रूप आले
छंदात रमता, स्वयें संत झाले
काव्यात रमता,पदी पंत आले
वाद्यात रमले,आणि तंत झाले. २
*
जनांची कविता जनी बोलताना
रसिकांस ठेवी हृदी नांदताना
सौंदर्य आले, कवींच्या घराला
अर्थात रमली,गृही शब्दबाला. ३
*
ओवीत आली, घरातील माया
लागली कविता,घरे गाजवाया
कधी जोजविले, मुला नादवीले
भुपाळीमधुनी,घरा जागवीले.४
*
गीतात आली,घरंदाज नारी
जीच्या दर्शनी,घराला उभारी
अशी ही कविता,नवे नाम घेते
नव्याने कविता, नवे धाम देते.५
*
नाना प्रकारे, घरे जोडताना
वैश्विक झाली, मने वाचताना
रमे कल्पनेत, तिथे मुक्त झाली
बंधाविना ती,जगण्यासी आली.६
*
कविताच आहे,मने जोडणारी
जननी घराची, घरे बांधणारी
शोधात जाता,घरांच्या तिच्या रे
कविता मनाच्या,तळाशी पहा रे.७
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





