श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ झुळुक… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

नक्की भेटू पुन्हा.. ” असे तो म्हणून गेला

क्षणभर आला, मनभर पण दर्वळून गेला

खळखळ हसला, बोललाच; पण डोळ्यामधुनी

बरेच काही कळून आला.. छळून गेला

 *

थांबायाचे नव्हते त्याला कसे म्हणू मी?

रेंगाळुन, वळणावरती तो वळून गेला

 *

त्यालाही अन् मला वाटले खुशाल सारे

जाताना माझ्यासम तो हळहळून गेला

 *

झुळकीसम आलीस, पुन्हा गेलीस तशी तू

झुळकीने त्या जन्म पुरा वादळून गेला

 *

युद्ध संपले तरी छुपे हे हेर भोवती

नकोस समजू धोका सारा टळून गेला

 *

जरा कुठे निर्धास्तपणे मी होतो चालत

तोच’ नाग पाचोळ्यातुन सळसळून गेला

 *

अजुन पेंगते रात्र सुगंधी कुशीत त्यांच्या

पुनवेचा तो चंद्र कधीचा ढळून गेला

 *

बहर होऊनी येता तू, मी कसा मोहरू?

वाट तुझी बघण्यात बहर हा जळून गेला

 *

किती विदारक चित्र अरे त्याच्या दु:खाचे

दुःखाश्रू शत्रूचा ही ओघळून गेला

 *

अता शांतता.. निवांतता.. अन् प्रसन्नता ही

उत्कट पाऊस मघाशीच कोसळून गेला

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments